डेलावेअर : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या द. अटलांटिक विभागातील डेलमार्वा द्वीपकल्पाच्या किनाऱ्यावरचे राज्य. क्षेत्रफळ ५,३२८ चौ. किमी. पैकी पाण्याखाली २०५ चौ. किमी. लोकसंख्या ५,४८,१०४ (१९७०). विस्तार ३८° २७’ उ. ते ३९° ४८’ उ. ७५° ३’ प. ते ७५° ४७’ प. यांदरम्यान दक्षिणोत्तर लांबी सु. १६० किमी. पूर्व–पश्चिम रुंदी सु. १६ ते ५६ किमी. दक्षिणेस व पश्चिमेस मेरिलंड आणि उत्तरेस पेनसिल्व्हेनिया ही राज्ये असून पूर्वेस डेलावेअर नदी व डेलावेअर उपसागर यांपलीकडील न्यू जर्सी राज्य आणि अटलांटिक महासागर आहे.

भूवर्णन : अटलांटिक किनारपट्टीतील या प्रदेशाची उंची १८ ते १३६ मी.पेक्षा अधिक नाही. विल्मिंग्टन व न्यूअर्क यांस जोडणाऱ्या रेषेच्या उत्तरेकडील प्रदेशच काय तो काहीसा डोंगराळ आहे. तेथे सेंटरव्हिसजवळ सर्वोच्च भाग १३४·७ मी. उंच आहे. राज्याच्या मध्याभागातून वायव्येकडून आग्नेकडील गेलेला एक उंचसा मातीचा कणा हाच पूर्वेकडे व पश्चिमेकडे वाहणाऱ्या प्रवाहांमधील जलविभाजक होय. पूर्व सीमेवरील डेलावेअर नदीची उपनदी क्रिस्तीना ही प्रमुख नदी असून नैर्ऋत्य भागातील नॅन्टिकोक नदी व द. सीमेवरील बिग सायप्रस दलदलीतून जाणारी पोकोमोक नदी या पुढे चेसापीक उपसागराला मिळतात. आग्नेयीकडील इंडियन नदी अटलांटिककडे जाते. येथे मुखाजवळ वालुकाभित्तीमुळे खारकच्छ उपसागर निर्माण झाले आहेत. राज्यात १४,३५० हे. गोड्या पाण्याच्या व ३३,२१० हे. खाऱ्या पाण्याच्या दलदली, किनारभागात उधानाच्या पाण्याने भरणारी दोन तळी आणि गोड्या पाण्याची ५० लहानमोठी तळी आहेत. डेलावेअर नदीचा खालचा भाग व डेलावेअर उपसागर येथील किनारी भाग दलदलीचा, तर अटलांटिक किनारा वालुकायुक्त असल्यामुळे दक्षिणेकडील लूइस सोडले, तर बहुतेक सर्व महत्त्वाची बंदरे डेलावेअर नदीच्या वरच्या किनारी भागातच आहेत.

मृदा : उत्तर भागात रेतीमिश्रित चिकण माती व दक्षिण भागात रेतीमिश्रित गाळमाती आढळते.

खनिजे :बहुतेक उत्तर भागात वाळू, रेती, खडीचा दगड, चुनखडी, पांढरा शाडू ही आहेत.

हवामान : पूर्वेकडील महासागराच्या सान्निध्यामुळे व हा प्रदेश द्वीपकल्पाचा भाग असल्यामुळे राज्यात अतेरेकी हवामान नसते. थंडी व उष्णताही बेताची असते. वार्षिक सरासरी तपमान १२·२° से. असते व सरासरी पर्जन्य ११५ सेंमी. आणि हिमवर्षाव सु. ३८ सेंमी. असतो.

वनस्पती व प्राणी : राज्याचा सु. ३५% प्रदेश वनाच्छादित असून पाइन आणि इतर मृदुकाष्ठ वृक्ष आहेत. क्वचित कोठे मूळचे कठिण काष्ठवृक्षही आहेत. हरीण व इतर लहान प्राणी आणि वने, दलदली व समुद्र यांच्या आश्रयाने उपजीविका करणारे पाणबदक व इतर जातींचे असंख्य पक्षी असून समुद्रकिनाऱ्याला शिंपले, कालव, खेकडे, शेवंडे व खताच्या उपयोगी मेनहेडन जातीचे मासे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. वन्य पशूंसाठी अभयारण्ये असून डेलावेअर उपसागराच्या काठची बाँबे हुक व प्राइम हुक राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.

इतिहास व राज्यव्यवस्था : १६१० मध्ये डेलावेअर उपसागराला व नंतर या प्रदेशाला व्हर्जिनियाचा तेव्हाचा गव्हर्नर डे ला वेअर यांचे नाव दिले गेले. १६३१ मध्ये डचांनी झ्वानेंडाएक (आताचे लूइस) येथे वसाहत केली पण आदिवासी इंडियनांनी ती नष्ट केली. १६३८ मध्ये काही स्वीडिश लोकांनी क्रिस्तीना नदीकाठी फोर्ट क्रिस्तीना (आताचे विल्मिंग्टन) येथे वसाहत केली, त्यांनी आणि डचांनी हा प्रदेश आलटून पालटून एकमेकांकडून जिंकून घेतल्यावर १६६४ मध्ये ब्रिटिशांनी डचांकडून तो जिंकून घेतला. पुन्हा अल्पकाळ डचांकडे राहिल्यावर मग तो पुन्हा इंग्रजांकडे आला. १६८१ मध्ये विल्यम पेन याने आपल्या पेनसिल्व्हेनिया प्रांताच्या संरक्षणासाठी राजाकडून तो मागून घेतला. १७०१ मध्ये डेलावेअरला नवी सनद मिळाली व न्यू कॅसल मध्यबिंदू आणि १९ किमी. त्रिज्या धरून काढलेला वर्तुळकंस ही या दोन राज्यांमधील विलक्षण सरहद्द आखली गेली. १७७६ मध्ये राज्य सर्वस्वी स्वतंत्र झाले. त्या वर्षी सीझर रॉडनी याने डोव्हरपासून फिलाडेल्फियापर्यंत रातोरात थेट घोडदौड करून राज्याच्या वतीने वसाहतींच्या परिषदेत स्वातंत्र्यघोषणेसाठी निर्णायक मत नोंदविले. स्वातंत्र्ययुद्धांत येथील लोकांनी मोठा पराक्रम गाजविला. १७८७ साली अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या घटनेवर पहिले शिक्कामोर्तब डेलावेअरने केले. तेव्हापासून याला ‘आद्य राज्य’ म्हणतात. ते संघराज्याच्या पहिल्या तेरा राज्यांपैकी एक होते. या राज्यांत गुलामांच्या आयातीला कायद्याने बंदी होती, निग्रोंबद्दल सहानुभूती असूनही बरेचसे बंडखोर नागरिक दक्षिणेच्या पक्षाचे होते. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धांत राज्याने आपला योग्य भार उचलला.

१८८७ च्या घटने अन्वये राज्यपाल, उपराज्यपाल व दोन खातेप्रमुख यांची निवड ४ वर्षांसाठी आणखी २ खातेप्रमुखांची २ वर्षांसाठी होते. विधानसभेवर ३९ प्रतिनिधी दर २ व १९ सेनेटर्स दर ४ वर्षांनी निवडून दिले जातात. अधिवेशने राजधानी डोव्हर येथे भरतात. कारभारासाठी राज्याचे न्यू कॅसल, केंट व ससेक्स असे तीन परगणे केलेले आहेत. न्यायालये सर्वोच्च, चॅन्सरी, उच्च व इतर अनेक प्रकारांची असून न्यायाधीशांची नेमणूक १२ वर्षांसाठी सेनेटच्या संमतीने राज्यपाल करतो. केंद्रसंसदेत राज्यातर्फे १ प्रतिनिधी व २ सेनेटर्स निवडून पाठविण्यात येतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती : राज्याचा ५३·१% प्रदेश शेतीखाली असून कमीअधिक सुपीक जमिनीचा जास्तीत जास्त उपयोग करून गहू, मका, भाज्या व फळफळावळांपासून चराऊ कुरणांवर पोसलेल्या गुरांच्या दूधदुभत्याच्या पदार्थांपर्यंत सर्व प्रकारचे उत्पादन आजूबाजूंच्या राज्यांतील मोठ्या शहरांना पोहोचविण्याचा धंदा तेजीत चालतो. कोंबड्यांची व अंड्यांची पैदासही मोठ्या प्रमाणावर होते. डेलावेअर उपसागरांतील खाद्योपयोगी कवचीचे जलचर आणि मासे यांची निर्यातही भरपूर होते. कारखानदारीत रसायनांचा धंदा सर्वांत महत्त्वाचा, बंदुकीच्या दारूचा १६० वर्षांहूनही जुना दुपॉण्ट याचा कारखाना आतापर्यंत विस्तार पावून स्फोटक द्रव्यांखेरीज प्लॅस्टिक, नायलॉन, कृत्रिम रबर, रंग, खते इ. विविध प्रकारचा माल मोठ्या प्रमाणात तयार करून जगभर निर्यात करीत आहे. इतरही असे कारखाने आहेतच. डेलावेअर येथे एक तेलशुद्धी कारखानाही आहे. १९७३ मध्ये एकूण कामगार संख्या ४,३१,४२० होती. अंतर्गत व परदेशी दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल ठिकाणी असल्याचा फायदा राज्याला पूर्णपणे मिळतो. राज्याचे मुख्य उत्पान्न साधन आयतकर हे असून येथील सोयीस्कर कायद्यांमुळे कार्यालये येथे पण उद्योग इतरत्र असणाऱ्या कंपन्यांकडूनही बराच कर मिळतो. 


वाहतूक व दळणवळण : विल्मिंग्टन हे प्रमुख महासागरी बंदर आहे. चेसापीक उपसागर आणि डेलावेअर नदी यांना जोडणारा महत्त्वाचा कालवा उत्तर भागात आहे. डेलावेअर नदीवरच्या भव्य दुहेरी पुलाने राज्याचे हमरस्ते न्यू जर्सी राज्याला जोडले आहेत. लूइस व केप मे यांमध्ये सततची नौसेवा चालू आहे. लोहमार्ग ४६७ किमी., पक्के रस्ते ६,९९५ किमी. व कच्चे ९५५ किमी. आहेत. सर्व प्रमुख शहरी विमानतळ असून १२ नभोवाणी केंद्रे, १ दूरचित्रवाणी केंद्र आणि ३ दैनिके आहेत.

लोक व समाजजीवन : बहुसंख्य लोक ख्रिस्ती धर्माचे असून काही यहुदीही आहेत. विल्मिंग्टन हे सर्वांत मोठे शहर औद्योगिक केंद्र व बंदर असून राज्याच्या नागरी वस्तीपैकी ६५ टक्के तेथे आहे. न्यूअर्क येथे डेलावेअर विद्यापीठ व यंत्रकारखाने आहेत. न्यूकॅसलला ऐतिहासिक वास्तू असून आसपास विमानांच्या भागांचे कारखाने आहेत. डोव्हर हे राजधानीचे ठिकाण व लूइस हे मच्छीमारीचे बंदर आहे. लोकवस्ती ३४ टक्के ग्रामीण आहे. एकूण प्रजेत १९७० मध्ये निग्रोंचे प्रमाण १४·३ टक्के होते. लोकभाषा इंग्रजी असून शिक्षण मोफत आणि ७ ते १६ वयापर्यंत सक्तीचे आहे. १९७३ मध्ये प्राथमिक व माध्यमिक शाळांत मिळून १,३२,९४० विद्यार्थी व ६,१६० शिक्षक होते. डेलावेअर विद्यापीठात १७,४२० विद्यार्थी व ७२१ प्राध्यापक व डोव्हरच्या शासकीय महाविद्यालयात २,०२२ विद्यार्थी आणि १२१ पूर्णवेळ शिक्षक होते. १९५० नंतर कायद्याने वर्णभेद नाहीसा होऊन अलीकडे काळ्यागोऱ्यांच्या शाळा एक झाल्या असल्या, तरी विल्मिंग्टनसारख्या शहरात गोऱ्यांनी उपनगरात अलग राहणे अधिक पसंत केले आहे. शिक्षण व घरे यांबाबतचा काळागोरा भेदाभेद अद्याप काही भागात टिकून आहे. 

समाजकल्याण व आरोग्य : १९७३ मध्ये राज्यातील १५ रुग्णालयांत मिळून ५,००२ खाटांची सोय होती. १,७३४ मनोरुग्ण होते. वार्धक्य, अवलंबी मुले, पंगू, अंध यांस शासकीय साहाय्य मिळते. विल्मिंग्टन, डोव्हर या ठिकाणी ग्रंथालये असून चित्र, नाट्य इ. कलांस उत्तजेन मिळते. समुद्रकाठी नौका चालविणे, मासे पकडणे इ. करमणुकीच्या सोयी असून अनेक राज्य-उद्याने आणि वनविभाग प्रवाशांस आकर्षितात.                                                                         

ओक, शा. नि.