रोश मूतॉने : (शीपबॅक वा शीप रॉक). हिमनदीमुळे झीज होऊन बनलेला छोटा, लांबट टेकाडासारखा उंचवटा. हा बसलेल्या मेंढीप्रमाणे वा देवमाशाच्या पाठीप्रमाणे दिसतो. याची लांब बाजू हिमनदीच्या प्रवाहाच्या दिशेत असते. याची उत्स्रोत (प्रवाहाच्या दिशेतील) बाजू झीज होताना घासली गेल्याने तुलनात्मक दृष्ट्या गुळगुळीत व गोलसर झालेली तसेच पृष्ठभागी प्रवाहाला समांतर चरे पडलेली असते व तिचा उतार मंद असतो. उलट याची अनुस्त्रोत बाजू उत्पादनाने (तुकडे उखडून काढले गेल्याने) खडबडीत व छिन्नविच्छिन्न झालेली असून तिचा उतार तीव्र असतो. अशा तऱ्हेने हा उंचवटा असममित असून या दोन उतारांना अलग करणारा उंच भाग (कटक) प्रवाहाच्या दिशेला लंब असतो.

नमुनेदार रोश मूतॉनेचा छेद : (१) हिमनदीच्या प्रवाहाची दिशा.हिमनदीमार्फत होणाऱ्या झिजेचे अपघर्षण (खरवडून व घासून पृष्ठ गुळगुळीत केले जाण्याची क्रिया) व उत्पाटन हे प्रकार याच्याशी निगडित आहेत. हिमनदीच्या तळाशी असणाऱ्या घट्ट खडकाला आधारशिला म्हणतात. आधारशिलेत भेगा, पोकळ्या वा संधी (तडे) असतात. ज्या भागात अशा भेगा, पोकळ्यांची दाटी झालेली असते, त्या ठिकाणी हिमनदीच्या तळाशी असणारे बर्फाचे वा खडकांचे पाचरीसारखे तुकडे त्यांच्यात घुसतात. हिमराशी वाहताना यामुळे आधारशिलेचे तुकडे हिसडून वा उखडून काढले जाऊन त्यांच्यात घेतले जातात. संधीची दाटी नसलेल्या भागात या तुकड्यांमुळे अपघर्षण क्रियेला मदत होऊन पृष्ठ गुळगुळीत व गोलसर होते आणि त्यावर चरेही पडतात. तसेच संधीची गर्दी असलेल्या ठिकाणी आणखी तुकडे हिसडून काढले जाण्यास त्यांची मदत होते. अशा प्रकारे झीज होत राहून हिमनदीचा व्याप (आकारमान) कमी झाल्यावर तिच्या दरीच्या टोकालगत सामान्यपणे संधियुक्त, कठिण खडकांची टेकाडे मागे रहातात. तेच रोश मूतॉने होत. यांच्या मालिकेमुळे हिमनदीच्या दरीच्या पृष्ठभागी पायऱ्यापायऱ्यांसारखी रूपरेषा दिसते. या पायऱ्या अधिक कठीण व कमी उताराच्या संधियुक्त खडकांच्या पृष्ठाजवळ आढळतात. रोश मूतॉनेंचे असे समूह हे हिमानी क्रियेचे उत्तम पुरावे मानले जातात व त्यांच्यावरून हिमनदीच्या प्रवाहाची दिशाही कळते. पुष्कळ वेळा अशा भागातील अधिक मऊ खडकांची विवेचकपणे झीज होऊन निर्माण झालेले रोश मूतॉनेयुक्त भूदृश्य हे हिमानी क्रिया झालेल्या अग्निज वा रूपांतरित ढालक्षेत्राचे वैशिष्ट्य असते.

जगात जेथे जेथे हिमयुग येऊन गेले त्या त्या प्रदेशात बहुतकरून रोश मूतॉने आढळतात. त्यांची चांगली उदाहरणे अलास्का, द. आफ्रिका, स्वित्झर्लंड, ब्रिटिश बेटे (स्कॉटलंड) इ. ठिकाणी आढळली आहेत. भारतात काश्मीरमधील लिद्दार, सिंधू इ. नद्या व त्यांच्या उपनद्यांच्या दऱ्यांमध्ये रोश मूतॉने आढळतात. (उदा., सोनमर्ग मार्गावरच्या हरी या खेड्यालगत). तसेच राजस्थानात पोखरणजवळ आणि प. बंगालमध्ये दार्जिलिंगच्या उत्तरेस रोश मूतॉने आढळले आहेत.

रोश मूतॉने ही संज्ञा १७९६ साली एच्. बी. दे सोस्यूर यांनी सुचविल्याचे मानतात. त्या काळी प्रचलित असलेल्या केसांच्या टोपाशी (मूतॉने) असलेल्या याच्या साम्यावरून त्यांनी हे नाव दिले असावे. अर्थात त्यांनी ही संज्ञा गवताळ टेकाडांसाठी वापरली होती.

पहा : ड्रमलिन शृंगपुच्छ हिमनदी व हिमस्तर हिमानी क्रिया.

ठाकूर. अ. ना.