कॅलगारी : कॅनडामधील ॲल्बर्टा राज्याच्या दक्षिण भागातील शहर. लोकसंख्या ४,१२,७७७ (१९७२). हे ब्रो व एल्बो नद्यांच्या संगमावर, रॉकी पर्वतपायथ्यापासून सु. ६४ किमी. व एडमंटनच्या दक्षिणेस २९३ किमी. आहे. कॅनडामधील गव्हाच्या कोठाराचे हे प्रमुख केंद्र असून उत्कृष्ट गुरांच्या पैदाशीसाठी प्रसिद्ध आहे. कॅलगारीच्या आसमंतात तेल, नैसर्गिक वायू, कोळसा व जलविद्युत्‌ उपलब्ध असल्याने यास महत्त्व आले. दळणवळणाचे हे प्रमुख केंद्र असून येथे तेलशुद्धीकरण, आटा, मांससंवेष्टन, दुग्धपदार्थ, प्लॅस्टिक, रसायने, मद्ये, खते, गंधक, धातुकाम वगैरेंचे मोठे कारखाने आहेत. ॲल्बर्टा विद्यापीठाची एक शाखा १९६६ पासून कॅलगारी विद्यापीठ म्हणून स्वायत्त झाली. तेथे १९७१-७२ मध्ये १५,४५८ विद्यार्थी व १,६४२ शिक्षक होते. त्या व इतर अनेक शैक्षणिक संस्थांमुळे कॅलगारीला शैक्षणिक दृष्ट्याही महत्त्व आहे. दरवर्षी येथे भरणार्‍या गुरांच्या प्रदर्शनासाठी अमेरिका व कॅनडातून लोक जमतात.

ओक, द. इ.