पाट्टानी: थायलंड द्वीपकल्पाच्या पूर्व किनाऱ्यावरील एक प्रमुख बंदर व याच नावाच्या प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २१,७४५ (१९७०). हे मलाया सरहद्दीपासून उत्तरेस सु. १०४ किमी., थायलंडच्या आखाताला मिळणाऱ्या पाट्टानी नदीमुखाशी वसले आहे.सोळाव्या शतकात आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी खुले केलेले हे पहिले थाई बंदर होय. येथून मुख्यतः नारळ, रबर, कथिल यांची निर्यात, तर तांदूळ व पक्का माल यांची आयात केली जाते.

लिमये, दि. ह.