ताना सरोवर : इथिओपियातील सर्वांत मोठे सरोवर. पृष्ठफळ ३,६७३ चौ. किमी. कमाल खोली सु. १४ मी. हे इथिओपियाच्या वायव्य पठारीभागात १,८०० मी. उंचीवर असून यातूनच नील नाईल नदी निघते. या सरोवरात आजूबाजूच्या सु. ११,७०० चौ. किमी. प्रदेशातून ६० प्रवाह पाणी आणतात त्यांपैकी आब्बाय नदीतूनच नील नाईलचा उगम होतो. बहिरदारजवळ सरोवराला लाव्हा रसाचा बांध पडून नील नाईलचा सु. ४२ मी. उंचीचा तिसिसात धबधबा निर्माण झाला आहे. त्यावर वीज उत्पादन होते. सरोवराच्या परिसरात धान्ये, तेलबिया, कॉफी यांचे उत्पादन तसेच गुरेपालन आणि मासेमारीही चालते. सरोवरावरून वाफोराची नियमित वाहतूक चालते. प्राचीन ग्रीकांना आणि सोळाव्या–सतराव्या शतकांत पोर्तुगीजांना हे सरोवर माहीत होते. १९७० मध्ये ब्रिटिश समन्वेषक ब्रूस हा याच्या दक्षिण किनाऱ्यावर पोहोचला.

कुमठेकर, ज. ब.