हेल्‌सिंकी : फिनलंड देशाची राजधानी, दक्षिणेकडे वसलेले देशातील एक औद्यागिक शहर व महत्त्वाचे बंदर. फिनलंडच्या आखातातील सर्वोत्तम नैसर्गिक बंदरांनी वेढलेले हे शहर स्थानिक पांढऱ्या ग्रॅनाइटने बहुतांश इमारती बांधल्यामुळे उत्तरेकडील शुभ्र शहर म्हणूनही ओळखले जाते. लोकसंख्या ६,२१,८२३ (२०१४). 

 

हेल्सिंकी बंदराचे एक दृश्य
 

स्वीडनचा राजा पहिला गस्टाव्हस व्हासा याने हेल्सिंकी शहर १५५० मध्ये स्थापिले. मूळ हेल्सिंकी शहर वांता नदीच्या मुखाशी सध्या स्थित असलेल्या ठिकाणापासून सु. ४.८ कि.मी. उत्तरेकडे वसलेले होते. ते १६४० मध्ये सध्याच्या ठिकाणी अधिकाधिक समुद्राभिमुख वसविलेगेले. १७१० मध्ये प्लेगच्या साथीने शहराला ग्रासले व १७१३ सालीते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यानंतर अठराव्या शतकात शहराच्या पुनर्विकासात रशियन आक्रमणांमुळे अनेक अडथळे आले परंतु १७४८ मध्ये स्वीडिशांनी व्हीबॉगर्र् व फिनलंडवासीयांनी सूओमेनलिना नावाचे दोन लहान गढीवजा दुर्ग बांधल्यामुळे स्थानिक वसाहत अधिक सुरक्षित झाली. 

 

रशियाच्या फिनलंडवरील आक्रमणामुळे १८०८ मध्ये हेल्सिंकी पुनः एकदा आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. इ. स. १८०९ मध्ये रशियाकडे फिनलंडचे स्वामित्व आले. १८१२ मध्ये रशियन झार पहिला अलेक्झांडर याने फिनलँडची राजधानी तुर्कू येथून हेल्सिंकी येथे हलविली. दरम्यान, जर्मन वंशाचा आरेखक कार्ल एंगेल याने अनेक सुंदर रेखीव नवयुगीन शैलीच्या सार्वजनिक इमारती बांधून हेल्सिंकी शहराची पुनर्उभारणी केली. त्यात राज्य परिषदेची इमारत आणि हेल्सिंकी विद्यापीठाची मुख्य इमारत यांचा समावेश आहे. 

 

हेल्‌सिंक शहराचा आर्थिक व्यवहार हा पूर्णतया उत्तम बंदरे व संपूर्ण देशभर पसरलेल्या रेल्वे आणि रस्त्याच्या जाळ्यांवर निर्भर आहे. निम्म्या-पेक्षा जास्त आयात केलेला माल हा एकट्या हेल्सिंकी बंदराद्वारे पूर्ण देशभरात वितरीत केला जातो. हेल्सिंकी शहरात प्रामुख्याने अन्न, धातूव रासायनिक प्रक्रियेवर आधारित उद्योग आढळतात. छपाई, कापडउद्योग, तयार कपडे व वीज उत्पादनाचे एक प्रमुख केंद्र म्हणून हेल्सिंकी सर्वश्रुत आहे. हेल्सिंकी येथील यूरोपातील सर्वांत मोठा अरब पोर्सेलिन( चिनी माती) पासून होणाऱ्या भांड्यांचा कारखाना जगप्रसिद्ध आहे. 

 

भव्य वस्तुसंग्रहालय व उत्कृष्ट चित्रकला दालनासाठी हेल्सिंकी प्रसिद्ध आहे. १९५२ मध्ये ऑलिंपिक खेळासाठी बांधले गेलेले येथील भव्य ऑलिंपिक स्टेडियम, सारिनेन या वास्तुविशारदाने बांधलेले रेल्वे स्थानक (१९०५) व नॅशनल म्यूझीयम (१९०६–११) ही स्थळे प्रसिद्ध आहेत. 

पवार, डी. एच्.