मीरत : मेरठ. उत्तर प्रदेश राज्याच्या मीरत जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ५,३८,४६१ (१९८१). हे उत्तर रेल्वेच्या दिल्ली–सहारनपूर या मुख्य मार्गावर दिल्लीच्या ईशान्येस ६४ किमी. अंतरावर वसले आहे. उत्खननात मिळालेले बौद्धकालीन अवशेष व येथून दिल्लीस नेलेला अशोकस्तंभ यांच्या अभ्यासावरून मीरत शहर प्राचीन असावे. जाट लोक हे शहर आपण वसविले असे मानतात. काहींच्या मते दिल्लीचा राजा महिपाल याने शहरास हे नाव दिले. जुन्या शहराभोवती १० दारे असलेली तटबंदी व खंदक होता. बुलंदशहराचा राजा हरदत्त याने बांधलेला अकराव्या शतकातील किल्‍ल येथे आहे. कुत्बुद्दीनने येथील सर्व देवालये पाडून त्यांवर मशिदी बांधल्या (११९२). तैमूरने मीरत शहर जवळजवळ जमीनदोस्त केले (१३९९). मोगल राजवटीत शहरास पुन्हा आकार येऊ लागला. आईनअकबरीतील निर्देशानुसार तेथे विटांचा किल्‍ल होता. अकबराने या शहरी तांब्याची नाणी पाडली. मोगल सत्तेच्या उतरत्या काळात बरीच अशांतता माजून शीख व मराठे हा भाग जिंकण्याचे प्रयत्न करीत होते. अठराव्या शतकारंभी हा प्रदेश ब्रिटिशांनी काबीज केला व १८०६ मध्ये त्यांची ‘लष्करी छावणी’ येथे उभारली गेली. मुलकी कारभाराचेही मीरत हे ठाणे झाले.

मीरत येथे १८५७ च्या उठावात शिपायांनी नवी काडतुसे वापरण्यास नकार दिल्याने त्यांना इंग्रजांनी कैद केले होते. उठावानंतरच्या काळात रस्ते, रेल्वे व व्यापारी देवाणघेवाण यांमुळे शहराची वाढ झाली. मात्र तेथील लष्करी छावणीचे प्राधान्य कायमच राहिले. स्वातंत्र्यपूर्वकाळात मीरत कटाचा खटला (१९१२) व मीरत बाँब खटला (१९४२) या घटनांमुळे मीरत हे राजकीय अस्मितेचे केंद्र म्हणून प्रसिद्ध झाले. स्वातंत्र्योत्तर काळात हे शहर उद्योगदृष्ट्या झपाट्याने वाढत आहे.

शहरात नवी–जुनी वैशिष्ट्ये आढळून येतात. जुना भाग, दाट लोकवस्ती, अरुंद रस्ते व बोळ यांनी हे शहर भरलेले आहे. त्यातच कुत्बुद्दीनने बांधलेली कबर आहे. जामा मशीद, शाहफकीर दर्गा आणि ‘सूर्यकुंड’ व त्याच्या सभोवारची लहानलहान देवळे, ही जुन्या भागाची इतर वैशिष्ट्ये आहेत. छावणी (कँटोनमेंट) विभागात काहीसा बदल झाला असला, तरी तेथील मुख्य मार्ग ‘मॉल’ व इतर रेखीव रस्ते, बगीचे, चर्चवास्तू, मिशनरी शिक्षण संस्था यांवर यूरोपीय छाप दिसते. छावणी व जुने शहर यांमध्ये मुलकी विभाग असून, तो संमिश्र स्वरूपाचा झाला आहे. मीरत शहरातील नगर सभागृह व तेथील ग्रंथालय, महाविद्यालये, तंत्रविद्यालये आणि शाळा, ‘मीरत विद्यापीठ’ ही शहराची सांस्कृतिक प्रतिके आहेत. येथील बाजारपेठ मोठी असून, ती धान्याच्या व साखरेच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. साखर, रसायने, पुठ्ठे तयार करणे इ. उद्योगधंदे येथे चालतात. पिठाची मोठी गिरणीही येथे आहे. याशिवाय लघुउद्योगांत वाद्यसंगीताची उपकरणे आणि क्रीडा सामग्री, हातमागाचे कापड, यांविषयी मीरत विशेष प्रसिद्ध आहे. नवीन औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत.

या वाढीचा परिणाम शहराच्या विस्तारात दिसून येतो शहराबाहेर चहुकडे लोकवस्ती पसरलेली आहे. कारखाने शहराबाहेर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर वसलेले आहेत. जुन्या शहरात जुन्या घरांच्या ठिकाणी नव्या उंच इमारती दिसून येतात. रेल्वे स्थानकाचा परिसर दाट वस्तीचा आहे. मोदीनगर व मोहननगर ही नवऔद्योगिक केंद्रे जवळच असल्याने मीरतचे महत्त्व वाढले आहे. भारतीय संगीतशास्त्रात तबला वादकांमध्ये ‘मेरठ घराणे’ प्रसिद्ध आहे.

देशपांडे, चं. धुं.