नांदेड शहर: महाराष्ट्र राज्याच्या औरंगाबाद विभागातील नांदेड जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठाणे. लोकसंख्या १,२६,४०० (१९७१). गोदावरीच्या उत्तर तीरावरील हे प्राचीन ठिकाण, त्या विभागातील दुसऱ्या क्रमांकाचे व राज्यातील चौदाव्या क्रमांकाचे शहर आहे. पुराणकालात पांडव नांदेडला येऊन गेल्याचे सांगतात. नंद घराणे येथे दीर्घकाळ राज्य करीत होते व त्यावरून नंदतट व त्याचे अपभ्रंश रूप नांदेड असे झाले. आंध्रभृत्य सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, काकतीय व यादव यांच्या सत्ता येथे होऊन गेल्या. मुसलमानांच्या पहिल्याच हल्ल्याला बळी पडून नांदेड मलिक काफूर याच्या सत्तेखाली गेले. बहमनी सत्तेत नांदेड तेलंगणात समाविष्ट करण्यात आले. बहमनी राज्याच्या मोडतोडीनंतर नांदेड मोगलांकडे गेले. औरंगजेब दक्षिणचा सुभेदार म्हणून आला, तेव्हा नांदेड तेलंगणाची राजधानी होती. १७२५ मध्ये नांदेड निजामाच्या राज्यात गेले. १९४७ नंतर पोलीस कारवाई होऊन हैदराबाद संस्थान भारतात आले व राज्य पुनर्रचनेनंतर त्याचा मराठवाडा विभाग द्विभाषिक मुंबई राज्यात आला व नांदेड शहर नांदेड जिल्ह्याचे ठाणे बनले. महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर ते या राज्यात आले.

नांदेड दक्षिण-मध्य रेल्वेच्या मीटरमापी लोहमार्गावरील स्थानक आहे. येथून अनेक लहानमोठ्या गावांना जोडणारे चांगले रस्ते असल्यामुळे हे शहर या विभागातील एक मोठे व्यापारी केंद्र बनले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक व मध्य प्रदेशातील व्यापारी पेठांशी नांदेडचा थेट व्यापार चालतो.

धान्य, गुरे व कापूस यांची बाजारपेठ म्हणून नांदेड महत्त्वाचे आहे. येथे मोठी कापडगिरणी व सूत कातण्याची गिरणी आहे. यांखेरीज शहरात तेलघाण्या, कातडीकामाचे लहान कारखाने व फर्निचर, घरांसाठी दारे, खिडक्या-तुळया इत्यादींचे कारखानेही आहेत.

नंदीग्राम मार्केट, नांदेड

सांस्कृतिक दृष्ट्या नांदेड प्राचीन काळापासून प्रसिद्ध असून संस्कृतविद्येचे ते केंद्र होते. मराठीतील प्रसिद्ध कवी वामन पंडित येथे राहत असत.

शीख धर्मीयांसाठी तर नांदेड शहर भारतात अमृतसरच्या खालोखाल पवित्र व महत्त्वाचे मानले जाते. मोगलांनी शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांचा येथे वध केला. येथे त्यांची समाधी आहे. गुरू गोविंदसिंगांची हत्यारे येथे ठेवली आहेत. येथील हुजूर साहेब या गुरुद्वाराची इमारत संगमरवरी असून त्यावरील कळस व भिंती सोन्याने मढविलेल्या आहेत. या गुरुद्वारात एक रत्नागार असून त्यातील जडजवाहीर दसरा, दिवाळी, होळी व वैशाखीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी लोकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येते. गुरुद्वारात यात्रेकरूंच्या सोयींशिवाय दवाखाना, शाळा, स्वस्त मालाची दुकाने इ. लोकोपयोगी कामेही गुरुद्वारा निधीतून चालतात. यांशिवाय शहराच्या निरनिराळ्या भागांत हिराघाट, मातासाहेब, शिकारघाट, बंदाघाट, मालटेकडी साहेब, संगत साहेब हे लहान गुरुद्वारा आहेत. नांदेड रेल्वेस्थानकापासून सु. ४ किमी.वर कळंबच्या राजाने बांधलेला नांदेडचा पडका किल्ला आहे. तेथे आता सुंदर बाग व पाणीपुरवठा केंद्र आहे.

हिंदूंचीही देवालये या शहरात नदीकाठी असून त्यांत नृसिंह, नागेश्वर, गणपती, राम व महादेव यांची मंदिरे महत्त्वाची होत. तसेच मुसलमानांची जामा मशीद व बडी दर्गा ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. १९३५ मध्ये स्थापन झालेल्या येथील नगरपाकिलेची ६ उद्याने व ३ क्रीडांगणे, ग्रंथालय व वाचनालये आहेत. गावात बालकमंदिर, कलामंदिर इ. लोकोपयोगी संस्था व पूर्वप्राथमिकपासून महाविद्यालयापर्यंत अनेक शिक्षणसंस्था आहेत.

शिंदे, सु. द.