युजीन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील ऑरेगन राज्यातील एक प्रमुख औद्योगिक शहर आणि लॅने परगण्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १,०५,६६४ (१९८०). हे राज्याच्या पश्चिम भागात सेलम शहराच्या दक्षिणेस सु. ९७ किमी. वर विलेमेटे नदीकाठी वसलेले असून लाकूड उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.

युजीन एफ्‌. स्किनर याने येथील मूळच्या एका खेडेगावी १८४६ मध्ये वसती केली आणि गावाचा विकास घडवून आणला. त्याच्या नावावरूनच पुढे या गावाला युजीन हे नाव पडले. १८६२ मध्ये या गावाला शहराचा दर्जा देण्यात आला. १८७१ मध्ये कॅलिफोर्निया ते ऑरेगन (सांप्रत सदर्न पॅसिफिक रेलरोड) असा लोहमार्ग तयार झाला. त्यामुळे या शहराचा कृषिमाल व लाकूड उद्योगाचे केंद्र म्हणून झपाट्याने विकास झाला. येथून हवाई वाहतूकही नियमितपणे चालते.

युजीनमध्ये लाकडाच्या वस्तू बनविणे, अन्नप्रक्रिया, कृषिउत्पादनांवरील प्रक्रिया, यंत्रावजारे, भाजीपाला, व मांस डबाबंदीकरण इ. व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतात. शहरात ऑरेगन विद्यापीठ (स्था. १८७२), ख्रिश्चन महाविद्यालय (१८९५) व लॅने कॅम्यूनिटी महाविद्यालय (१९६५) इ. उच्च शिक्षणसुविधा असून विद्यापीठपरिसरात एक कला संग्रहालयही आहे. परिसरातील विलेमेटे राष्ट्रीय वन व मॅकेंझी नदी मनोरंजन विभाग तसेच सु. ७० उद्याने यांमुळे युजीन शहर पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.

चौंडे, मा. ल.