आयोवा: अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी एक राज्य. क्षेत्रफळ १,४६,३५४ चौ. किमी. लोकसंख्या २८,२५,०४१ (१९७०). हा देश ४० ३६’ उ. ते ४३ ३०’ उ. आणि ८९ ५’ प. ते ९६ ३१’ प. यांदरम्यान आहे. याच्या दक्षिणेस मिसूरी, पश्चिमेस नेब्रॅस्का व द. डकोटा, उत्तरेस मिनेसोटा आणि पूर्वेस विस्कॉन्सिन व इलिनॉय ही राज्ये आहेत.

भूवर्णन: राज्याच्या बहुतेक प्रदेश वायव्येकडून आग्नेयीकडे उतरत गेलेला असून भूमी समुद्रसपाटीपासून २४८ ते ४३४ मी. उंचीची, ऊर्मिल, गवताळ, मधूनमधून टेकड्या व झाडी असलेली आहे. पूर्व व पश्चिम सीमांवरील नद्यांकाठी उत्तरेत थोड्या उंच दरडी आहेत. राज्यात खनिज धातुके सापडत नाहीत. पण कोळशाचा साठा भरपूर असून जिप्समचे उत्पादन देशात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. शिवाय खाणींतून सिमेंटसाठी चुनखडीचा दगड, वाळू व खडीसाठी खडक काढण्यात येतात. येथील माती गहिऱ्या रंगाची, जड आणि अतिसुपीक असून देशातील पहिल्या प्रतीची २५ टक्के जमीन या राज्यात आहे. डे मॉइन व तिच्या पूर्वेकडील आग्नेयवाहिनी नद्या पूर्व सीमेवरील मिसिसिपीला मिळतात पश्चिम सीमेवरील मिसूरीला बिग सू व लिटल सू आणि इतर नैर्ऋत्यवाहिनी नद्या मिळतात. राज्याच्या वायव्य भागात काही नैसर्गिक सरोवरे असून अन्यत्र वीजनिर्मिती व कालव्यांसाठी मानवनिर्मित जलाशय आहेत. हवामान महाद्वीपीय, राज्यात सामान्यतः सर्वत्र सारखे, कडक थंडी, जोरदार हिमवृष्टी, तीव्र व आर्द्र उन्हाळे, चक्री वादळे यांनी युक्त असून पाऊस पुरेसा आहे. किमान तपमान ५ से., कमाल २५ से. व सरासरी १०.५ से. असून ४८ से. व -४४ से. इतके कमाल व किमान तपमान नोंदले गेलेले आहे. वार्षिक सरासरी पर्जन्य ७७ सेंमी. आहे. राज्याची ७% भूमी वनाच्छादित असून तिच्यात ओक, हिकरी, ॲश, अक्रोड, एल्म, बॉक्स, एल्डर, बाल्सम फर, व्हाइट पाइन या जातींचे वृक्ष आहेत. पूर्वीच्या गवताळ मैदानाचे अवशेष क्वचित आढळतात. उन्हाळ्यात विविध रंगीबेरंगी फुलांनी प्रदेश फुलून जातो. दरवर्षी देशांतर करणाऱ्या पक्ष्यांचे थवेच्या थवे या राज्यात उतरतात. पांढऱ्या शेपटीच्या हरणांखेरीज मोठे प्राणी या राज्यात फारसे नाहीस. ससे, जॅकरॅबिट्स हे लहान प्राणी आहेत. बास, रेनबो, ब्रुक, ब्राउन ट्राउट, बुलहेड्स, कॅटफिश इ. मासे नद्यांतून मिळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था: राज्यभर आढळणाऱ्या प्राचीन ढिगाऱ्यांवरून कळते, की अशा ढिगार्‍यांनी समाधी बांधणारे इतिहासपूर्वकालीन आदिवासी या भागात होते.बहुधा त्यांच्याच वंशाच्या सू व अल्गाँक्वियन या मुख्य वर्गाच्या अनेक जमाती गोरे लोक प्रथम इकडे आले तेव्हा आपापसांत लढत होत्या.सतराव्या शतकाच्या अखेरीस तेव्हाच्या वसाहतींना अज्ञात अशा या प्रदेशावर फ्रेंच लोक हक्क सांगत. १६८३ मध्ये पाद्री मार्केत व फासेपारधी जोलिएत यांनी प्रथम या भागाला भेट दिली. सु. शंभर वर्षांनंतर या प्रदेशाच्या ईशान्य भागात शिसे सापडल्यावर वसाहतकरी इकडे येऊ लागले.त्यांच्यापैकी केसाळ चामड्यांचा व्यापारी डब्यूक हा आयोवात घर करणारा पहिला गोरा माणूस. त्याने १७८८ मध्ये इंडियनांशी मैत्री करून खाणीतून शिसे काढण्याची परवानगी मिळविली. सध्याच्या डब्यूक शहरापाशी स्थायिक होऊन त्याने जमिनीची व खाणीची सनद स्पेनकडून घेतली. लवकरच केसाळ चामड्यांच्या व्यापाराला भरभराट आली. १८०३ च्या ‘लुइ-झिॲना खरेदीत’ अंतर्भूत असलेला हा भूभाग १८१२ त मिसूरीच्या प्रदेशात गेला. १८२१ मध्ये मिसूरी राज्य झाले तरी आयोवा प्रदेश संघटित नव्हता. वसाहतकर्‍यांनी स्वतःच राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्‍न केला १८३३ साली डब्यूक व १८३५ मध्ये डेव्हनपोर्ट ही शहरे स्थापन झाली. १८३४ साली आयोवाचा समावेश मिशिगन प्रदेशात व १८३६ मध्ये विस्कॉन्सिनमध्ये होता. अखेर १८३८ साली त्याला वेगळ्या प्रदेशाचा दर्जा मिळाला. दरम्यान शेतकरी आणि पीठचक्कीवाले येऊन वसाहत वाढवीत होते १८४६ मध्ये आयोवा राज्य झाले. तोपर्यंत येथील सुपीक जमिनीची कीर्ती यूरोपपर्यंत पोहोचून जर्मन, स्कँडिनेव्हियन व डच लोक इकडे लोटले होते. यादवी युद्धात उत्तरेच्या सरकार पक्षाला आयोवाने भरपूर सामग्री व मनुष्यबळ पुरविले. नंतरच्या काळात शेतीमालाचे भाव एकदम घसरले. ग्रंज व ग्रीनबँक-सारख्या चळवळींनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्‍न केला. परिणामी १८७४ साली कायद्याने लोहमार्गवाहतुकीचे दर नियंत्रित झाले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस राज्यातील शेतीला पुन्हा समृद्धीचे दिवस आले व कारखानदारीही वाढीस लागली. पहिल्या महायुद्धात १,१४,४०४ व दुसर्‍या महायुद्धात २,७६,१३१ लोक राज्यातून दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धामुळे राज्याची कृषी व औद्योगिक उत्पादन शक्ती खूपच वाढली आणि लवकरच संपन्न शेतीलाही कारखानदारीने मागे टाकले. आज राज्याचे कृषी उत्पादन देशात दुसऱ्या क्रमांकाचे आहे. शिवाय कित्येक उद्योगक्षेत्रातही राज्य आघाडीला आहे. आयोवाची अंतर्गत शासनव्यवस्था बव्हंशी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील इतर घटक राज्यांसारखी आहे. राज्याचे विधिमंडळ ५९ सदस्यांचे सीनेट व १२४ प्रतिनिधींचे हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज यांनी मिळून बनलेले आहे. सीनेटर चार वर्षांसाठी व प्रतिनिधी दोन वर्षांसाठी निवडलेले असतात. गव्हर्नर व लेफ्टनंट गव्हर्नर दोन वर्षांसाठी निवडलेले असतात. देशाच्या काँग्रेसमध्ये या राज्यातर्फे दोन सीनेटर व सात प्रतिनिधी असतात.

आर्थिक व सामाजिक स्थिती: कृषिव्यवसायात राज्य साऱ्या देशात अग्नेसर असून ६२% जमीन लागवडीखाली आहे. २१% लोक शेतीकामावर असून मका, सोयाबीन व ओट यांचे उत्पादन पहिल्या क्रमांकाचे आहे. त्याचप्रमाणे मांसासाठी पोसलेली जनावरे व त्यांच्यापासून होणारे पदार्थ यांचे उत्पन्न सर्व राज्यांत जास्त आहे. गुरांखेरीज डुकरे, मेंढरे, कोंबड्या, अंडी व दूधदुभते यांचे उत्पादनही भरपूर आहे. कारखानदारी मुख्यतः प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, डबाबंद मांस व धान्य, शेतीची अवजारे, विजेची उपकरणे, बिगरविजेची यंत्रसामग्री, धातुकाम व रसायने या मालाची आहे. डुकराचे मांस व धान्य डबाबंद करणे, खास न्याहारीचे पदार्थ, मक्याच्या लाह्या, ट्रॅक्टर, धुलाई यंत्रे, फॉउन्टनपेन व ॲल्युमिनियम पत्रे इत्यादींचे देशातील सर्वांत मोठे कारखाने आयोवा राज्यात आहेत. राज्यातील विजेपैकी १/१० पेक्षा कमी जलविद्युत् आहे. मिसिसिपीवरील केओकुक धरणावर जलविद्युत् होते. बाकीची वीज वाफेच्या शक्तीवर उत्पन्न होते. कारखानदारीत १९% लोक असून बांधकामात ५% आहेत. कृषीखेरीज बाकीचे व्यापार, खाजगी व शासकीय नोकऱ्या व खाणकामात आहेत. लोहमार्ग १३,६९८ किमी. व रस्ते १,८०,२४६ किमी. असून निम्याहून अधिक रस्ते पक्के आहेत. मिसूरी, डे मॉइन व मिसिसिपी नद्यांतून शेकडो किमी. जलवाहतूक चालते. ती मुख्यतः कोळसा व तेल यांची असते. डेव्हनपोर्ट, बर्लिंग्टन, केओकुक, डब्यूक, फोर्ट मॅडिसन इ. नदीबंदरे प्रसिद्ध आहेत. २०० वर विमानतळ असून ७२ नभोवाणी व १२ दूरचित्रवाणी केंद्रे आहेत.१५ लाखांहून अधिक दूरध्वनियंत्रे, ४७ दैनिके व ४०० पेक्षा जास्त इतर नियतकालिके आहेत. ५३% लोकवस्ती शहरी व ४७% ग्रामीण आहे.ðडेमॉइन  हे राजधानीचे शहर औद्योगिक व विद्यापीठ केंद्र आहे.सीडर रॅपिड्सयेथे यंत्रांचे व न्याहारीपदार्थांचे, सू सिटी येथे डबाबंद मांसाचे व न्यूटन येथे धूलाईयंत्राचे कारखाने आहेत. १९७०—७१ मध्ये शाळांत ७,३०,७९३ विद्यार्थी होते. ६ विद्यापीठे व ४८ लहानमोठी महाविद्यालये आहेत. धर्म, पंथ, रूढी, लोक व समाजजीवन, भाषा, कला व क्रीडा या बाबतींत अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील इतर राज्यांशी आयोवाचे बव्हंशी साधर्म्य आहे.

ओक, शा. नि.