कीरूना : स्वीडनमधील अतिउत्तरेकडील शहर. लोकसंख्या सु. २८,९४२ (१९७० अंदाज). लूऑसाव्हारा व केरूनाव्हारा या लोहपर्वतांच्या पायथ्याशी असल्याने आणि लोखंडाची निर्यात हा एकमेव व्यवसाय असल्याने लोहनगर म्हणूनच कीरूना प्रसिद्ध आहे. या डोंगरांवरील लोखंड सुरुंग लावून गोळा करून लॅपलँड रेल्वेने बाल्टिक वरील लूलीओ व अटलांटिकवरील नॉर्विक बंदरांतून निर्यात केले जाते. येथील धातुकांत सत्तर टक्के लोखंड असते. भूमिगत विद्युत् गृहामुळे कीरूनाला विजेचा भरपूर पुरवठा आहे. हिवाळ्यात दिवस फार लहान असतो, तेव्हा प्रखर विद्युत् दीपांच्या प्रकाशात खाणकाम चालते. या लोहनगरात मुख्यत्वे खाणकामगारच राहतात. लॅप लोकांचीही काही वस्ती आहे.

ओक, द. ह.