व्हीलिंग : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी वेस्ट व्हर्जिनिया राज्याच्या ओहायओ परगण्याचे मुख्य ठिकाणी तसेच एक औद्योगिक व व्यापारी केंद्र. लोकसंख्या ३४,८८२ (१९९०). पिट्‌सबर्गच्या नैर्ऋत्येस रस्त्याने ९० किमी.वर ओहायओ नदीच्या पूर्वतीरावर हे शहर वसलेले आहे. नदीपात्रातील व्हीलिंग बेट निवासी असून नदीवर त्याला जोडणारे पूल बांधलेले आहेत. पूर्वी ‘द नेल सिटी’ व अलीकडे ‘द फ्रेंड्‌ली सिटी’ म्हणूनही हे शहर ओळखले जाते.

कॅप्टन सेलेरॉन दे बेनव्हिल व त्याच्या फ्रेंच समन्वेषक गटाने १७४९ मध्ये या स्थळाला पहिल्यांदा भेट दिली. त्यानंतर १७६९ मध्ये एबनीझर, जोनाथन व साइलस या तीन झेन बंधूंनी येथे वसाहत उभारली. मानवाचा शिरोभाग किंवा कवटी या अर्थाच्या व्हीलिंग या मूळ स्थानिक इंडियन लोकभाषेतील शब्दावरून शहराला हे नाव पडले. १७७४ मध्ये ब्रिटिशांनी येथे बांधलेला किल्ला फोर्ट हेन्री या नावाने ओळखला जाऊ लागला. अमेरिकन स्वातंत्र्याचे अखेरचे युद्ध या ठिकाणी लढले गेले. १८३६ मध्ये यास शहराचा दर्जा देण्यात आला. १८४९ मध्ये व्हीलिंग बेटापर्यंत झुलता पूल बांधण्यात आला. १८६१-६२ मधील पश्चिम व्हर्जिनिया राज्याच्या निर्मितीचा ‘व्हीलिंग करार’ येथे करण्यात आला. या राज्याची राजधानी होण्याचा मानही व्हीलिंगला मिळाला.

व्हीलिंगच्या परिसरात दगडी कोळसा व नैसर्गिक वायूचे विस्तृत साठे असून औष्णिक केंद्रही आहे. लोह – पोलाद हा येथील प्रमुख उद्योग असून  त्याशिवाय रेल्वे-कर्मशाळा, लोखंडी पत्र्यांना जस्ताचा मुलामा देणे, तसेच धातूचे पत्रे, खिळे व चुका, ॲल्युमिनियम उत्पादने, चिनी मातीची भांडी, कौले व फरश्या, काच, कागद, वस्त्रे, तंबाखू व खाद्यपदार्थ, लाकडी सामान, प्लॅस्टिकच्या वस्तू, औषधे इत्यादींचे निर्मितिउद्योग येथे आहेत. परिसरात स्फटिक खडकांचे साठे सापडले असून त्यामुळे रसायनउद्योग वाढीस लागला आहे. रस्ते, लोहमार्ग व हवाईमार्गांचे हे प्रमुख केंद्र असून एक नदीबंदर म्हणूनही ते महत्त्वाचे आहे. शहरात तीन नभोवाणी व एक दूरदर्शन प्रसारण केंद्र आहे.

शहरात लिन्झली मिलिटरी इन्स्टिट्यूट (१८१४), बेदनी कॉलेज (१८४०), मुलींसाठीची मौंट दे शंतल अकादमी (१८४८), वेस्ट लिबर्टी स्टेट कॉलेज (१८३७), व्हीलिंग कॉलेज (१९५४) या शैक्षणिक संस्था आहेत. येथे सार्वजनिक ग्रंथालयही आहे. येथील ओगलबे (क्षेत्र ४३८ हे.), व्हीलिंग (६९ हे.) ही उद्याने प्रसिद्ध आहेत. शहरात खेळाची मैदाने, पोहण्याचे तलाव, घोड्यांच्या शर्यतीचे मैदान इ. सुविधा आहेत.

चौधरी, वसंत