बाळापूर : महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २५,४२१ (१९८१). हे माण आणि म्हैस नदीसंगमावर, मुंबई-नागपूर रुंदमापी लोहमार्गावरील पारस स्थानकाजवळ वसले आहे. संगामाजवळच असलेल्या बाळापूर देवीच्या मंदिरावरून शहरास हे नाव पडले असावे.

बहमनी काळात बाळापूरला स्थानिक अंमलदारांच ठाणे होते. दगडी वस्तूंकरिता बाळापूर त्यावेळी प्रसिद्ध होते. मोगल काळात दक्षिणेतून उत्तरेकडे जाण्याच्या मार्गावरील मोक्याचे ठिकाण म्हणून यास महत्त्व होते. अकबराने १५९४ मध्ये बाळापूर जिंकून घेतले. आइन-इ-अकबरीत एक श्रीमंत परगणा म्हणून याचा उल्लेख आढळतो. दिल्लीच्या गादीवर बसण्यापूर्वी जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेब हे दक्षिणेचे सुभेदार म्हणून येथे राहिले होते. येथे अस्तित्वात असलेला किल्ला औरंगजेबाचा मुलगा मुहम्मद आझमशाह याने १७२१ मध्ये बांधण्यास सुरुवात केली. व एलिचपूरचा (हल्लीचे अचलपूर) पहिला नबाब इस्माइलखान याने तो १७५७ मध्ये पूर्ण केला, असे म्हणतात. मोगलांनंतर निजामाच्या हाती बाळापूर गेले व पुढे ते ब्रिटिशांकडे आले.

येथे नगरपालिका (स्था. १९३४) असून १९१८ मध्ये ‘कॉटन मार्केट कमिटी’ स्थापन झालेली आहे. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास उत्तम प्रतीचे कापड आणि कागदनिर्मितीसाठी बाळापूरची प्रसिद्धी होती. येथे हातमागावर सतरंज्या, लूगडी, धोतरजोड्या विणणे, सरकी काढून गासड्या बांधणे इ. उद्योग आढळतात. आठवड्याचा बाजार दर शनिवारी भरतो.

येथील मोगलकालीन किल्ला नदीसंगमावर असून किल्ल्याबाहेर दोन कोट आहेत. बाहेरचा कोट अष्टकोनी असून किल्ल्यात सध्या पंचायत समितीची कार्यालये आहेत. गावाच्या दक्षिणेस नदीतीरावर मिर्झाराजा जयसिंगाने काळ्या दगडात बांधलेली पाच घुमटांची छत्री असून तिच्या छतावरील नक्षीकाम वेधक आहे.

बाळापूरमधील कादरी या प्रसिद्ध मुस्लिम घराण्याकडे बगदादमधील अब्दुल कादिर जीलानी यांच्या दाढीचा केस व अबू हनीफा याने आठव्या शतकात लिहिलेल्या कुराणाची हस्तलिखित प्रत अजूनही जतन करून ठेवलेली आहे, असे म्हणतात.

कापडी, सुलभा