वानशिएन : विद्यमान वानशियान. मध्य चीनमधील सेचवान प्रांतातील एक प्रमुख व्यापारी नदीबंदर व शहर. लोकसंख्या १,६०,००० (१९८२ अंदाज). ते नानचुंगच्या पूर्वेस सु. १७८ किमी. व चुंगकिंगच्या ईशान्येस २१९ किमी. वर यांगत्सी नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. सेचवान प्रांताच्या पूर्व भागाचे ते प्रशासकीय केंद्र आहे. यांगत्सी नदीच्या निदऱ्यांपलीकडील भागाचे नियंत्रण आणि दक्षिणेकडील डोंगराळ दुर्गम भागात जाणारे मार्ग यांवरील ते प्रमुख केंद्र असल्यामुळे मध्ययुगात त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले. तेव्हापासून हे शहर एक व्यापारपेठ आणि नदीतून वाहतुकीचे मोक्याचे केंद्र बनले. १९१७ साली ते परदेशी व्यापारासाठी खुले करण्यात आले. पूर्व-पश्चिम महामार्गावरील पूर्वेकडील ते अंतिम स्थानक आहे. चीन-जपान युद्धाच्या वेळी शांघाय शहरातील अनेक अवजड उद्योग, विशेषतः यंत्रसामग्री, कापड-उद्योग, येथे स्थलांतरित करण्यात आले. दुसऱ्या महायुद्धानंतर पुन्हा हे उद्योग शांघायला हलविण्यात आले, तरीसुद्धा काही प्रमाणात चर्मोद्योग व कापड-उद्योग येथे स्थिरावले आहेत. टुंग तेल, तंबाखूवरील प्रक्रिया उद्योग तसेच औषधी वनस्पतींची लागवड, डुकराच्या केसांचे ब्रश बनविणे इ. उद्योग येथे चालतात. टुंग तेलाची येथून परदेशी निर्यात होते. याच्या परिसरात तांदूळ, गहू, मका, ऊस, कडधान्ये, संत्री ही पिके घेतात. त्यामुळे ही धान्याची घाऊक बाजारपेठ आहे. वानशिएनच्या परिसरात दगडी कोळसा आणि लोह खनिज यांचे साठे आढळतात. त्यामुळे बंदराची सुधारणा झाली असून रस्ते विकसित करण्यात आले आहेत. प्रसिद्ध चिनी कवी ली हो (७९१-८१७) याचे अनेक वर्षे या शहरात वास्तव्य होते. त्याला अर्पण केलेला एक विहारही येथे आहे.

डिसूझा, आ. रे.