ऊबांगी : आफ्रिकेच्या विषुववृत्तीय प्रदेशातील काँगो (झाईरे) नदीला उजव्या बाजूने मिळणारी प्रमुख उपनदी. लांबी वेले या शीर्षप्रवाहासह २,२५० किमी. पूर्व आफ्रिकेतील सरोवरांच्या मालिकेतील उत्तरेकडील ॲल्बर्ट सरोवराच्या पश्चिमेकडील डोंगरात ऊबांगीचा शीर्षप्रवाह वेले या नदीचा उगम होतो व ही नंतर पश्चिमवाहिनी बनते. मध्य आफ्रिका संघराज्याच्या सीमेवरून येणाऱ्या बोमू नदीशी याकोमाजवळ वेलेचा संगम होऊन ऊबांगी बनते. मध्य आफ्रिका संघराज्य व झाईरे आणि काँगो (ब्रॅझाव्हिल) व झाईरे ह्यांच्यामधील सरहद्दींचा काही भाग ऊबांगीने बनलेला आहे. विषुववृत्त प्रदेशातून अनेक प्रवाह ऊबांगीला मिळत असल्याने बांगुईजवळ हिचा दर सेकंदाला सरासरी ४,२८० घमी. तर पुराच्या वेळी १४,००० घमी. निचरा होतो. ऊबांगी काँगो नदीस मिळते तेथे १४ किमी.चा त्रिभुज व दलदली प्रदेश निर्माण झाला आहे. या दलदली प्रदेशाने आणखी काही नद्यांना जन्म दिला आहे. लुआ, गिरी, कोटा व वाका या ऊबांगीच्या प्रमुख उपनद्या होत. ऊबांगीच्या प्रवाहात अनेक धबधबे, बेटे, उंच कडे असले, तरी हिच्या काँगो नदीकडील सु. ६०० किमी. भागावर जलवाहतूक चालते. एकोणिसाव्या शतकात ऊबांगीचा शोध पाश्चात्त्यांना लागला. फ्रेंच व बेल्जियन संशोधकांनी ऊबांगीचे खूप समन्वेषण केले असून त्यांनी ऊबांगीवर विविध योजना सुचविल्या आहेत.

यार्दी, ह. व्यं.