कलात : पाकिस्तानच्या कलात विभागाचे व जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ५,३२१ (१९६१). हे कराची-क्वेट्टा मार्गावर, क्वेट्टाच्या १३६ किमी. दक्षिणेस आहे. चारी बाजूंनी डोंगर असलेल्या दरीमध्ये कलात वसलेले असून, १९३५ च्या भूकंपानंतर शहराची वाढ किल्ल्याबाहेर झाली आहे. पंधराव्या शतकात ओमानहून आलेल्या मिरवारी जमातीपैकी अहमदझही शाखेच्या खानाने येथे राज्य अथापले. ब्रिटिश कारकिर्दीत हे बलुचिस्तानमधील महत्त्वाचे संस्थान होते. पाकिस्तान निर्मितीनंतर हे संस्थान पाकिस्तानमध्ये विलीन झाले असले, तरी कलातच्या खानास अलुचिस्तानच्या भागात महत्त्व आहे. कलात शहरात महाविद्यालये, रुग्णालये इ. सुखसोयी असून आसमंतातील फळे व खजूर ह्यांची ती बाजारपेठ आहे.

शाह, र. रु.