व्हिलेमस्टाट : कॅरिबियन समुद्रातील राजकीयदृष्ट्या नेदर्लंड्समध्ये समाविष्ट असलेल्या नेदर्लंड्स अँटिलीस या द्वीपसमूहाच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १,२३,००० (१९९९). द्वीपसमूहातील कुरासाऊँ बेटाच्या आग्नेय कोपऱ्यात सिंट आना उपसागराच्या किनाऱ्यावर हे शहर वसले आहे. आरावाक इंडियन हे येथील मूळ रहिवासी. येथे पहिली वसाहत स्पॅनिश लोकांनी केली (१५२७). १६३४ मध्ये डचांनी हे ठाणे जिंकले. पुढे १६४३ मध्ये पीटर स्टॉइव्हसांट याने हे शहर आणि कुरासाऊँ बेट या दोहोंचा व्यापारी केंद्र म्हणून विकास घडवून आणला. गुलामांच्या व्यापाराच्या दृष्टीने याला विशेष महत्त्व होते, परंतु तो व्यापार बंद झाल्यानंतर याचे महत्त्व कमी झाले. सिंट आना उपसागरामुळे शहराची पुंडा व ऑत्रबंदा या दोन भागांत विभागणी झाली असून शॉटगॅट हे याचे प्रगत बंदर आहे. शहराचे दोन्ही भाग जोडणाऱ्या कायमस्वरूपी पुलाचे बांधकाम १९७४मध्ये पूर्ण करण्यात आले.

  पहिल्या महायुद्धाकाळात शहराजवळ शॉटगॅट बेसिन भागात मोठे तेलशुद्धीकरण कारखाने सुरू करण्यात आले. कोलंबिया, त्रिनिनाद, व्हेनेझुएला अशा विविध भागांतील अशुद्ध तेलावर प्रक्रिया करून त्याची निऱ्यात येथून केली जाते. खनिज तेलशुद्धीकरण हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. आग्नेय कॅरिबियनमधील व्हिलेमस्टाट हे व्यापारी उलाढालीचे प्रमुख केंद्र आहे. व्हेनेझुएलामधून लहानलहान पडावांद्वारे येथे फळे व भाजीपाला येतो. भाजीपाला व फळांच्या व्यापारासाठी येथील ‘स्नूकर मार्केट’ विशेष प्रसिद्ध आहे.

डच शैलीतील, दुपारवी (उतरती छपरे) व रंगीबेरंगी अशी वैशिष्ट्यपूर्ण घरे येथे दिसतात. अनेक ऎतिहासिक वास्तूही येथे आढळतात. येथील ॲम्स्टरडॅम किल्ल्याला एके काळी शॉटगॅट बंदराचे सुरक्षित प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाई. डच रिफॉर्म्ड चर्च (१७६९), मिक्वे इझ्राएल सिनॅगॉग (१७३२) या येथील प्रसिद्ध वास्तू आहेत. येथील कुरासाऊँ वस्तुसंग्रहालय उल्लेखनीय असून हे शहर पर्यटकांचे एक आकर्षण आहे.

चौधरी, वसंत