चेरापुंजी: भारताच्या मेघालय राज्याच्या खासी आणि जैंतिया टेकड्या या जिल्ह्यातील व जगातील अत्युच्च पर्जन्यमानाचे एक ठिकाण. लोकसंख्या ४,१२२ (१९६१). हे शिलाँगच्या दक्षिणेस सु. ५१ किमी. असून आर्कियन काळातील राजमहल टेकड्यांपासून अलग झालेल्या शिलाँग पठाराच्या काठाजवळ १,३९९ मी. उंचीवर वसलेले आहे. प्रथम ही खासी संस्थानची राजधानी होती. १८६४ मध्ये राजधानी येथून शिलाँगला नेण्यात आली. १८९७ च्या भूकंपात याची बरीच हानी झाली. ब्रिटिश अंमलात येथे त्यांचे लष्करी ठाणे होते.

बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या अगदी तोंडावर, पर्वतमय प्रदेशात चेरापुंजी असल्यामुळे येथील वार्षिक सरासरी पर्जन्य सु. १,०८० सेंमी. असून १८६१ मध्ये येथे सु. ३,०९९ सेंमी. कमाल पर्जन्याची तसेच १४ जून १८७६ रोजी १०३·६ सेंमी. पावसाची नोंद झालेली आहे. चेरापुंजीसारखेच सर्वोच्च पर्जन्यवृष्टीचे ठिकाण मॉसिनराम हे येथून जवळच आहे. तांदूळ, शिसवी लाकूड, कापूस यांची ही बाजारपेठ असून येथील खासी आदिवासींच्या जमाती फिरती व सोपानशेती करून उदरनिर्वाह करतात. केळी, लिंबू जातीची फळे, अननस इत्यादींचीही येथे लागवड केली जाते.

कापडी, सुलभा