फेरीनिकिंग : द. आफ्रिका प्रजासत्ताकाच्या ट्रान्सव्हाल प्रांतातील शहर. लोकसंख्या १,६९,५५३ (१९७०). हे जोहॅनिसबर्गच्या दक्षिणेस सु. ५६ किमी. व्हाल नदीकाठी वसले असून दळणवळणाचे केंद्र आहे. कोळसा-खाणींमुळे १८७० पासूनच याच्या आसमंताचा विकास सुरू झाला व १८९२ मध्ये हे शहर वसविण्यात आले. येथे १९०२ मध्ये झालेल्या तहानेच ब्रिटिश व बोअर लोकांतील दक्षिण आफ्रिकन युद्धाचा शेवट झाला. ‘फेरीनिकिंगचा तह’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. फेरीनिकिंग हे द. आफ्रिकेतील एक प्रमुख औद्योगिक केंद्र असून कोळसा-खाणींशिवाय येथे लोखंड-पोलाद, छिद्रण यंत्रे, कृषिअवजारे इ. उद्योगांचाही विकास झाला आहे. येथे पाश्चर संशोधन केंद्र आहे.

लिमये, दि. ह.