लार्सा :  इराकमधील एक प्राचीन शहर. बॅबिलोनिया साम्राज्याच्या राजधान्यांपैकी हे एक ठिकाण आग्नेय इराकमध्ये नासिरिया शहराच्या वायव्येस ४८ किमी. व ऊरूक (ईरेक) शहराच्या आग्नेयीस २१ किमी. वर युफ्रेटीस नदीच्या डाव्या काठावर वसले होते. बायबलमध्ये याचा एल्-ले-सार असा उल्लेख आढळतो. सांप्रतचे टॉल संकराह म्हणजेच लार्सा असावे, असा तज्ञांचा कयास आहे.

लार्सा शहराची स्थापना इतिहासपूर्व काळात झाली असावी. त्याकाळी या नगरावर नेमके कोणाचे अधिपत्य होते, याविषयी निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत परंतु एक स्वतंत्र वंश त्यावर राज्य करीत होता आणि त्यातील नाप्लानम या राजाच्या कारकीर्दीत (इ. स. पू. सु. २०२५-२००५) या शहराची भरभराट झाली होती असे आढळते. नाप्लानम हा इसिनचा राजा इश्बी ईरा याच्या समकालीन असावा. त्याने इसिनच्या समृद्ध राज्याशी स्पर्धा म्हणून येथील राजघराण्याची (लार्सा) स्थापना केली. नाप्लानमच्या तेरा वारसांनी पुढे या प्रदेशावर राज्य केले. त्यांपैकी काहींनी बॅबिलोनियावर सत्ता गाजविली. इसिन व लार्सा या समकालीन प्रतिस्पर्धी शहरांमध्ये सु. एक शतक तटस्थतेचे धोरण होते. इसिनवर लार्साच्या गुंगुनम (इ.स.पू. १९३२-०६) व अबिसरे (इ.स.पू. १९०५-१८९५) या अनुक्रमे पाचव्या व सहाव्या राजांचा प्रभाव होता. इ.स.पू. १८३५ मध्ये राजा सिली आडाद हा फक्त एक वर्ष सत्तेवर राहिला. त्याला बलशाली ईलमच्या राजाने सत्तेवरून दूर केले आणि आपल्या वरद-सिन् (इ.स.पू १८३४-२३) या मुलाला गादीवर बसविले. उपलब्ध व्यापारी नोंदींवरून हा काळ लार्सा नगरीच्या भरभराटीचा होता. जलसिंचन योजनांमुळे शेती, पशुपालन इ. व्यवसायांचा विकास झाला होता. येथील उत्खननांत सिंधू संस्कृतीतील काही वस्तू मिळाल्या असून त्यांवरून कातडी, लोकर, वनस्पतीजन्य तेले व हस्तिदंत इ. वस्तूंचा व्यापार सिंधू संस्कृतीशी होत असावा. वरद-सिन्‌चा मुलगा सिमसिन् (इ.स.पू. १८२२-१७६३) याच्या कारकीर्दीत केलेला उत्तेजन मिळाले आणि साहित्यनिर्मिती झाली. त्यावेळी लार्सात एक ग्रंथालय असल्याचा पुरावाही मिळतो. हे साहित्य मुख्यत्वे सुमेरियन भाषेत लिहिलेले आहे. बॅबिलोनियाचा राजा हामुराबी याने इ.स.पू. १७६३ मध्ये रिमसिन्‌चा पराभव केला व लार्सासह मेसोपोटेमियात बॅबिलोनियन साम्राज्य दृढतर केले. [⟶ बॅबिलोनिया मेसोपोटेमिया]. हे शहर शमस (सूर्य) या देवाला अर्पण करण्यात आले होते, असा उल्लेख आढळतो.

टॉल संकराह येथे इ.स. १९३३ मध्ये ए. पॅरट यांनी विस्तृत उत्खनन केले. त्यात इ.स.पू. तिसऱ्या सहस्त्रकापासूनचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांत झिगुरात, सूर्यमंदिर, नूर आडादचा राजवाडा, नव-बॅबिलोनियन, सेल्युसिडी काळांतील थडगी इ. वास्तू असून शिवाय काही धातूंच्या वस्तू आढळल्या आहेत. यांशिवाय रंगीत चित्रे असलेली मृद्‌भांडी वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांवर एका ठिकाणी इश्तार या देवतेची रेखाकृती आहे व तिच्याभोवती वृषभ, कासव, पक्षी आदी पशुपक्षी यांची चित्रे काढली आहेत. यांशिवाय बासरीवादक माकड, मुलाला स्तनपान करणारी माता, शिरस्त्राणधारी व्यक्ती, सारंगीवादक, नग्निका इत्यादींच्या पक्वमृदामूर्ती लक्षवेधक आहेत.

संदर्भ: Gilbert, Stuart Emmons, James, Trans, Andre, Parrot : Nineveh and Babylon, New York, 1961.

 देशपांडे, सु. र. सावंत, प्र. रा.