सिन सेफाली : ग्रीसच्या थेसाली प्रांतातील इतिहासप्रसिद्घ टेकड्यांची रांग. या टेकड्यांना ग्रीक भाषेत कुत्र्यांची डोकी असे संबोधतात. त्या व्होलॉस या सागरी बंदराच्या पश्चिमेस सु. ११ किमी. वर लरिसा शहराच्या आग्नेयीस असून त्यांची सरासरी उंची १८ मी. आहे. या टेकड्यांच्या परिसरात प्राचीन काळी दोन महत्त्वाची युद्घे झाली. त्यांपैकी पहिले युद्घ थिबन जनरल पेलॉपिडस व फेअरीचा जुलमी हुकूमशाह अलेक्झांडर यांत इ. स. पू. ३६४ मध्ये येथे झाले. या युद्घात अलेक्झांडर मारला गेला आणि त्याच्या सैन्याचा पराभव झाला. थेसाली त्याच्या जुलमातून मुक्त झाला. दुसरे युद्घ मॅसिडोनियाचा राजा पाचवा फिलिप (कार. इ. स. पू. २२१—१७९) आणि रोमन सेनापती टायटस क्विंकशस फ्लॅमनायस यांमध्ये इ. स. पू. १९७ मध्ये झाले. ते दुसरे मॅसिडोनियन युद्घ म्हणून इतिहासात प्रसिद्घ आहे. या युद्घात दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी २६,००० सैन्य होते. त्यामुळे बलाबलसारखे असल्यामुळे युद्घाचा निकाल कुणाच्याच बाजूने होईना. अशा प्रसंगी रोममधील लोकांनी आपल्या हक्कांच्या संरक्षणार्थ निवडलेला एक सेनापती ससैन्य सिनसेफालीत धाडला. त्याने डोंगरकपाऱ्यांतून पुढे येऊन बगल देऊन मॅसिडोनियन सैन्याच्या पिछाडीने अचानक हल्ला केला. तेव्हा पाचवा फिलिप युद्घभूमीवरुन पळाला. त्याचे ८,००० सैनिक या युद्घात मारले गेले आणि ५,००० सैनिकांना पकडून नेण्यात आले. रोमनांचा जय झाला आणि फिलिपचे ग्रीसवरील वर्चस्व संपुष्टात आले. यामुळे सिनसेफालीला अभूतपूर्व महत्त्व प्राप्त झाले.

देशपांडे, सु. र.