द्वीपसमूह : एकाच नावाने ओळखला जाणारा अनेक बेटांचा गट. उदा., मायक्रोनीशियन द्वीपसमूह, ॲरमिरॅल्टी द्वीपसमूह, बिस्मार्क द्वीपसमूह, अंदमान-निकोबार द्वीपसमूह इत्यादी. बऱ्याच वेळा ज्या नावाने द्वीपसमूह ओळखला जातो, त्या नावाचे बेट त्या समूहात नसतेही. इंडोनेशिया, जपान, फिलिपीन्स हे संपूर्ण देशच द्वीपसमूह आहेत. ग्रीसजवळील इजीयन समुद्रास उद्देशून पूर्वी द्वीपसमूह (आर्किपेलॅगो)ही संज्ञा वापरली जात असे. कालांतराने ती त्या समुद्रातील सिल्काडीझ व स्पॉरडीझ बेटांस उद्देशून वापरण्यात येऊ लागली आणि पुढे जगातील कोणत्याही बेटांच्या गटासाठी तिचा उपयोग होऊ लागला. जगातील काही द्वीपसमूहांतील बेटांची संख्या खूपच मोठी आहे. उदा., जपान सु. ३,००० इंडोनेशिया सु. १३,००० फिलिपीन्स सु. ७००० पॅसिफिक द्वीपसमूह (ओशिॲनिया) सु. १०,००० फिजी सु. २४० इत्यादी. काही द्वीपसमूहांतील कित्येक बेटांस अजून नावेसुद्धा नाहीत, ती बेटे निदर्शक अंकांनी ओळखली जातात. भूखंडाजवळील काही द्वीपसमूह धनुष्याकार असतात. उदा., जपान, इंडोनेशिया.

डिसूझा, आ. रे.