मादागास्कर : आफ्रिका खंडाच्या आग्नेयीस असलेले लोकशाही प्रजासत्ताक द्वीपराष्ट्र. ४३° १२ पू. ते ५०° १७ पू. रेखांश, ११° ५७ द. ते २५° ३८ द. अक्षांश यांदरम्यान पसरलेल्या पश्चिम हिंदी महासागरातील मादागास्कर या प्रमुख बेटाशिवाय याच्या वायव्य किनाऱ्यालगतच्या नोसी बे व पूर्व किनाऱ्यालगतच्या सेंट मारी या बेटांचा तसेच लगतच्या इतर लहान बेटांचा समावेश या देशात होतो. हे आफ्रिकन राष्ट्र असून मादागास्कर बेट आफ्रिका खंडापासून सु. ४०० किमी. रुंदीच्या मोझँबीक खाडीने वेगळे झाले आहे. क्षेत्रफळ ५,८७,०४१ चौ. किमी. असून मादागास्कर हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. बेटाची दक्षिणोत्तर कमाल लांबी १,५९९ किमी., पूर्व–पश्चिम कमाल रुंदी ५७९ किमी. व सरासरी रुंदी ४४९ किमी. आहे. लोकसंख्या ९४,७२,००० (१९८३ अंदाज). अँतनॅनरीव्हो (पूर्वीचे ⇨ तानानारीव, लोकसंख्या ४,००,०००–१९७८) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे. देशाला सु. ४,१८० किमी. लांबीचा सागरकिनारा लाभला आहे.

भूवर्णन : मादागास्कर बेटाचे (१) मध्यवर्ती पर्वतीय वा पठारी प्रदेश, (२) पूर्व किनारपट्टी व (३) पश्चिम किनारपट्टी असे प्राकृतिक विभाग पडतात. मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशात तीन प्रमुख पर्वतश्रेण्या असून त्यांची सस.पासून सरासरी उंची ९०० ते १,५०० मी. पर्यंत आढळते. बेटाच्या उत्तर भागातील त्सारातानाना गिरिपिंडात मारोमोकोत्रो हे देशातील सर्वोच्च (२,८७६ मी. ) शिखर आहे. या प्रमुख शिखराशिवाय १,८३० मी. पेक्षा जास्त उंचीची बरीच शिखरे आहेत. या प्रदेशाच्या पूर्व उतारावर अनेक खोल दऱ्या, घळ्या व धबधबे निर्माण झालेले आढळतात. देशाच्या मध्यवर्ती भागात अंकारात्रा हा विस्तृत पर्वतप्रदेश असून त्सीआफजाव्होना (२,६४३ मी.) हे त्यातील सर्वाधिक उंचीचे शिखर आहे. हा देशातील प्रमुख जलविभाजक आहे. या पर्वतीय आणि पठारी भागाच्या पश्चिमेकडील उतारापेक्षा पूर्वेकडील उतार अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. 

मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडील महासागर किनाऱ्यापर्यंतच्या चिंचोळ्या प्रदेशाचा पूर्व किनारपट्टीमध्ये समावेश होतो. या किनारपट्टीची सरासरी रुंदी ५० किमी. आहे. या प्रदेशात झिजलेल्या टेकड्या, पुळणी व विस्तृत खारकच्छे आहेत. ही खारकच्छे किनाऱ्याला समांतर असणाऱ्या ६४४ किमी. लांबीच्या पांगालान कालव्याने एकमेकांशी जोडली आहेत. फाराफांगाना गावाच्या दक्षिणेकडील किनारा अधिक खडकाळ असून तेथे कड्यांची, उंच वालुकागिरींची व लहानलहान उपसागरांची निर्मिती झालेली आढळते. ही किनारपट्टी पर्वतीय प्रदेशाला समांतर व अगदी सरळ असून केवळ उत्तरेकडे आंतोंझील उपसागर हाच काय तो जमिनीत घुसलेला पाण्याचा मोठा भाग आहे.

मध्यवर्ती पर्वतीय प्रदेशापासून पश्चिमेस मोझँबीक खाडीच्या किनाऱ्यापर्यंतच्या प्रदेशाचा समावेश पश्चिम किनारपट्टीत होतो. पूर्व किनारपट्टीच्या मानाने ही बरीच रुंद (१०० ते २०० किमी.) व दंतुर असून तिच्यावर गाळाची मैदाने, पठारे, खचलेले प्रदेश यांसारखे विविध भूविशेष आढळतात. या किनारपट्टीच्या वायव्य भागात विस्तृत मैदाने असून तेथील किनाऱ्यावर उपसागर, नदीमुखखाड्या, ज्वालामुखी बेटे व प्रवाळ खडकांची निर्मिती झालेली आढळते. या प्रदेशाचा दक्षिणेकडील किनारा बराच सरळ आहे.

मृदा व खनिजे : किनारपट्टीच्या प्रदेशात जलोढीय व उंच प्रदेशातील नद्यांच्या खोऱ्यांत सुपीक मृदा असून त्यांत जांभ्या मृदेचे गुणधर्मही आढळतात. पर्वतीय प्रदेशात जांभ्या मृदेचे प्रमाण अधिक आहे. लाव्ह्यापासून बनलेल्या मृदेनेही बेटांचे विस्तृत क्षेत्र व्यापले आहे. त्यामुळे मादागास्करला ‘तांबड्या मातीचे बेट’ म्हणूनही संबोधले जाते. पर्वतीय पठारी प्रदेशाची झीज खूपच झालेली आढळते. मध्यवर्ती पठारी प्रदेशात व पूर्व किनारपट्टीवर नाइस, ग्रॅनाइट, फ्लिंट व इतर स्फटिकी शैलसमूह, तर पश्चिम भागात अवसादी खडकांचे प्रमाण अधिक आहे. अभ्रक, ग्रॅफाइट, क्रोम, इल्मेनाइट, झिर्‌कॉन, वैदूर्य, सोने, गार्नेट इत्यादींचे साठे देशात आहेत.

नद्या : मध्यवर्ती पठारी व पर्वतीय प्रदेश हा देशातील प्रमुख जलविभाजक असून त्याला अनुसरूनच देशात पूर्ववाहिनी व पश्चिमवाहिनी अशा दोन नदीप्रणाली निर्माण झाल्या आहेत. पूर्ववाहिनी नद्या तीव्र उतारावरून वाहत असून त्या लांबीने कमी व द्रुतवाही आहेत. या नद्या किनाऱ्याजवळील खारकच्छाला किंवा महासागराला जाऊन मिळतात. पात्रात अनेक प्रपात आणि द्रुतवाह आढळतात. मांद्रारे, मॅनानारा, फाराओनी, ईव्हूंद्रू, मानांजारी या प्रमुख पूर्ववाहिनी नद्या असून जलवाहतुकीसाठी यांचा फारच कमी उपयोग होतो. याउलट पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या मंद उतारावरून वाहत असून त्या बऱ्याच लांब आहेत. सोफिया, माहाझांबा, बेत्सीबूका, मानांबाहो, त्सीरीबीहीना, मांगोकी, ऊनीलाही या प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या होत. या नद्यांबरोबर वाहून येणाऱ्या गाळामुळे पश्चिम भागात विस्तृत मैदानांची निर्मिती झालेली आहे. या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश तयार झालेले असून त्यांच्या मुखाजवळ वारंवार वाळूच्या दांड्यांची निर्मिती होताना आढळते. या नद्या सु. १६० किमी. पर्यंत जलवाहतुकीस उपयोगी ठरतात. मादागास्कर बेटावर अनेक सरोवरांची निर्मिती झालेली आढळते. त्यांपैकी बरीचशी ज्वालामुखी सरोवरे आहेत. तानानारीवच्या ईशान्येस असलेले आलाओत्रा हे पर्वतीय प्रदेशातील सर्वांत मोठे सरोवर आहे. तूलेआरच्या दक्षिणेस किनाऱ्यावरच असलेले त्सीमानाम्पेत्सोत्सा हे खाऱ्या पाण्याचे परंतु निर्गमद्वार नसलेले मोठे सरोवर आहे. याशिवाय ईतासी, किंग्कूनी, ईहूत्री ही सरोवरे उल्लेखनीय आहेत.

हवामान : नोव्हेंबर ते एप्रिल या काळात येथे उष्ण व आर्द्र ऋतू, तर मे ते ऑक्टोबर यांदरम्यान थंड व कोरडा ऋतू असतो. मादागास्करच्या हवामानावर आग्नेय व्यापारी वारे व वायव्य मोसमी वाऱ्यांचा परिणाम झालेला दिसतो. मे ते ऑक्टोबर यांदरम्यान आग्नेय व्यापारी वारे अधिक जोराने वाहतात. या वाऱ्यांपासून देशाच्या पूर्व किनाऱ्यावर भरपूर पाऊस पडतो (वार्षिक सरासरी २५० सेंमी.). पठारी भागाकडे वाहताना आर्द्रतेचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे पठारी भागात केवळ झिमझिम पाऊस व धुके आढळते. या काळात अँतनॅनरीव्हो येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १४० सेंमी. असून पश्चिम भाग मात्र कोरडाच राहतो. मोसमी वाऱ्यापासून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर पर्जन्यवृष्टी होते. देशाचा नैऋत्य भाग मात्र खूपच रुक्ष राहिलेला असून तेथे वार्षिक सरासरी पर्जन्यमान २५ सेंमी. इतके कमी असते. देशाच्या वायव्य भागात सर्वाधिक तापमान असते. जुलै हा वर्षातील सर्वाधिक थंडीचा, तर डिसेंबर हा सर्वांत उष्ण महिना असतो. डिसेंबर ते मार्च या काळात हिंदी महासागरात निर्माण होणाऱ्या चक्री वादळांपासून देशाच्या पूर्व किनाऱ्यावर मुसळधार वृष्टी होऊन विनाशक पूर–परिस्थिती निर्माण होते. देशाच्या हवामानावर अक्षांशापेक्षा उंचीचाच अधिक परिणाम झालेला दिसतो. किनाऱ्यावरील सरासरी तापमान २१° ते २७° से., तर पठारी भागातील सरासरी तापमान १३° ते १९ से. असते. किनाऱ्यावरील हवामान उष्ण व दमट, तर अंतर्गत भागातील हवामान समशीतोष्ण प्रकारचे असते.


वनस्पती व प्राणी : प्राचीन काळी मादागास्कर बेटावर सदाहरित व पानझडी वृक्षांची घनदाट अरण्ये होती. आज केवळ १० टक्के क्षेत्रच अरण्यव्याप्त आहे. मध्यवर्ती पर्वतश्रेण्यांच्या पूर्व उतारांवर अगदी थोड्या भागात दाट अरण्ये असून त्यांत रोजवुड, चंदन, आयर्नवुड, एबनी, रॅफिया पाम, खडशेरणी, पादफल, रुद्राक्ष इ. आर्थिक दृष्ट्या उपयुक्त वनस्पती आढळतात. लाकूडतोड व वसाहतीसाठी जंगल जाळल्याने उंच पठारी प्रदेश उघडे-बोडके झाले आहेत. तेथे केवळ गवताची कुरणे आढळतात. या भागात अरण्य जाळून त्या जागेचा शेतीसाठी वापर केला जातो. या पद्धतीला ‘टॅव्ही’ असे म्हणतात. किनाऱ्यांवरील खारकच्छांत व नद्यांच्या खोऱ्यांत अनुक्रमे कच्छवनश्री व विविध फळझाडे दिसून येतात. फळझाडांमध्ये ताड, नारिंग, लिंबू, केळी, नारळ, अननस यांचे प्रमाण अधिक आहे. किनाऱ्यावर नारळाची झाडे पुष्कळ आहेत. ओसाड नैऋत्य व दक्षिण भागांत काटेरी वनस्पती व गवत आढळते.

मादागास्करमध्ये हिंस्त्र प्राणी फारसे नाहीत. पूर्वी येथे मोठेमोठे पक्षी आढळत, परंतु आज त्यांची संख्या अत्यल्प आहे. आज बेटावर वेगवेगळ्या प्रकारचे लेमूर व सरडे, लहानलहान कीटकभक्षी स्तन्य प्राणी, साळिंदर, वटवाघूळ, रानडुक्कर, फॉस, सुसर, कासव, साप इ. प्राणी आढळतात. विविध प्रकारचे कीटक, कोळी व फुलपाखरेही भरपूर आहेत. गिनीफाउल, तितर, कबूतर, बगळा, आयबिस, हंसक पक्षी, ईग्रेट, कोकिळ असे विविध प्रकारचे पक्षी पहावयास मिळतात. अंतर्गत भागांतील जलाशय, खारकच्छ, नदीमुखखाड्या यांमध्ये तसेच किनारी भागांत विविध प्रकारचे मासे सापडतात.

इतिहास व राजकीय स्थिती : मादागास्कर बेटावर सु. अडीच हजार वर्षांपूर्वी आफ्रिकी व इंडोनेशियन लोकांनी प्रथम वसाहती केल्या व पुढे इंडोनेशियनांचा मादागास्करकडील ओघ इ.स. सु.पंधराव्या शतकापर्यंत चालूच राहिला. इंडोनेशियनांनी प्रामुख्याने मादागास्कर बेटाच्या मध्यवर्ती उच्च भूमीत वसाहती केल्या. यांदरम्यान आफ्रिका तसेच आखाती देशांतील (अरब राष्ट्रांतील) अनेक लोकांनी देशांतर करून मादागास्करच्या किनारी प्रदेशात वसाहती केल्या. नवव्या शतकापासून अरबांनी तसेच पूर्व आफ्रिका व कॉमोरो बेटावरून आलेल्या मुसलमान व्यापाऱ्यांनी मादागास्कर बेटाच्या वायव्य व आग्नेय भागांत आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यानंतर बऱ्याच उशिरा यूरोप, भारत व चीन यांमधील स्थलांतरितांनी मादागास्करमध्ये येऊन वसाहती केल्या. पोर्तुगीज खलाशी द्योगो दीअश हा हे बेट पाहणारा पहिला यूरोपीय असावा (इ. स. १५००). 

अरबी लिपीचा वापर करून मॅलॅगॅसी भाषेमध्ये लिहिलेले सोराबे हाच मॅलॅगॅसीच्या प्राचीन इतिहासाचा पहिला लेखी पुरावा होय. १५०० मध्ये पोर्तुगीज जहाज या बेटाच्या किनाऱ्यावर येईपर्यंत यूरोपीयांना ह्या बेटाविषयी काहीच माहिती नव्हती. पोर्तुगीजांनीच १५०२ मध्ये या बेटाला ‘मादागास्कर’ हे नाव दिले. मार्को पोलो याने यापूर्वी या नावाच्या बेटाचा उल्लेख केला होता व त्या नोंदीवरून या बेटाला हे नाव देण्यात आले. सोळाव्या व सतराव्या शतकांत पोर्तुगीज, ब्रिटिश, डच व फ्रेंच यांनी येथे वसाहती व व्यापारी ठाणी स्थापण्याचे प्रयत्न केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाहीत. फ्रेंचांनी मात्र १६४३–७१ या काळात फॉर्डोर्फी प्रदेशात वसाहत स्थापन केली. मादागास्कर त्या काळात चाचेगिरीचा अड्डा बनले होते. १६८० ते १७२० हे बेट चाच्यांनी गुलामांच्या व्यापाराचे मुख्य केंद्र बनविले. याच काळात मॅलॅगॅसीवर तीन प्रमुख राज्ये राज्य करीत होती. त्यांपैकी मध्यवर्ती पठारी प्रदेशात ईमेरीन (मेरिना), पश्चिमेस साकालाव्ह व पूर्वेस बेत्सीमसाराका राज्य होते. १७८७–१८१० या काळात राजा अँड्रीॲ‌नाम्पॉइनिमेरिना याच्या नेतृत्वाखाली ईमेरीन राज्याचा विस्तार होऊन हळूहळू बेटाच्या बऱ्याच भागावर त्याने ताबा मिळविला. १८१० मध्ये या राज्याची सत्ता राडामा पहिला याच्याकडे आली. गुलामांचा व्यापार थांबविण्याच्या बदल्यात राडामास राज्याच्या आधुनिकीकरणासाठी व सैन्य प्रशिक्षणासाठी ब्रिटिशांची मदत मिळाली. याच काळात लंडनच्या प्रॉटेस्टंटपंथीय मिशनऱ्यांनी येथे शाळा काढल्या व मेरिना भाषेचे लिप्यंतर करण्यास मदत केली. राडामाच्या मृत्यूनंतर रानाव्हॅलोना पहिली या त्याच्या पत्नीकडे ईमेरीन राज्याचा कारभार आला. तिने मात्र यूरोपियनांच्या येथील हस्तक्षेपाला तीव्र विरोध करून त्यांचा छळ केला. तिच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा राडामा दुसरा हा सत्तेवर आला (१८६१). फ्रेंचांना त्याची सहानुभूती मिळाली, परंतु १८६३ मध्ये त्याचा खून झाला. त्यानंतर त्याची पत्नी रासोहेरिना ही सत्तेवर आली. तिने फ्रेंच कंपनीशी करार करण्यास नकार दिला. १८६८ मध्ये तिची सत्ता संपुष्टात आल्यानंतर १८६९ पासून फ्रेंचांचा प्रभाव अधिक वाढला. फ्रेंचांबद्दल असलेला आकस व फ्रेंचांच्या वाढत्या हस्तक्षेपाला ईमेरीन राज्याचा असलेला विरोध यांतूनच १८८० व १८९० ची फ्रँको-मॅलॅगॅसी ही युद्धे झाली व शेवटी १८९६ मध्ये मादागास्कर ही फ्रेंचांची वसाहत बनली.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान ईमेरीन राज्यातील नेत्यांनी स्वातंत्र्याची मागणी सुरू केली. तेव्हा मॅलॅगॅसीयांना वित्तीय बाबींच्या नियंत्रणाबाबत व विधानसभा निवडण्याबाबत हक्क प्राप्त झाले (१९४५) तसेच आपला प्रतिनिधी निवडून तो फ्रेंच संसदेत पाठविण्याचा हक्कही मिळाला. तथापि एवढ्याने मॅलॅगॅसीयन लोक समाधानी नव्हते. दरम्यान ‘डेमॉक्रॅटिक मूव्हमेंट फॉर मॅलॅगॅसी रिव्हायव्हल’ (एम्‌डीआर् एम्) पक्षातर्फे स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न होऊ लागले. निवडणुकीतही हा पक्ष भाग घेऊ लागला. १९४७ मध्ये बंड करण्यात आले, तथापि ते मोडून काढले गेले. परंतु त्याचा चांगला परिणाम असा झाला की, प्रशासक निघून गेले व बेटाचा कारभार पॅरिसमधून पाहण्यात येऊ लागला. मादागास्करने शांततापूर्ण असा स्वातंत्र्यलढा चालू ठेवला. १९५८ मध्ये मादागास्कर ‘मॅलॅगॅसी प्रजासत्ताक’ या नावाने फ्रेंच समूहांतर्गत प्रजासत्ताक व २६ जून १९६० रोजी हा पूर्णतः स्वतंत्र देश बनला आणि फिलिबर्ट त्सीरानाना हे त्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष झाले. तेच पुन्हा १९६५ व १९७२ मध्ये निवडून आले. मे १९७२ मध्ये लोकमत शासनाच्या विरुद्ध गेल्याने त्सीरानाना यांना राजीनामा द्यावा लागला लष्करी अधिकाऱ्यांनी शासन ताब्यात घेतल्याने देशात लष्करी राजवट आली. जून १९७५ मध्ये दिदिअस रात्सीराका हे लष्करी राजवटीतील चौथे राष्ट्राध्यक्ष बनले. ३० डिसेंबर १९७५ रोजी मॅलॅगॅसी रिपब्लिक हे नाव बदलून त्याऐवजी डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ मादागास्कर असे देशाचे नाव स्वीकारण्यात आले. हे नामांतर फ्रान्सपासून मॅलॅगॅसीला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल्याचे सूचित करते. जानेवारी १९७६ व नोव्हेंबर १९८२ मध्ये राष्ट्राध्यक्ष म्हणून रात्सीराका यांचीच फेरनिवड झाली.


आर्थिक स्थिती: मादागास्कर हा कृषिप्रधान देश असून ८०% लोकसंख्या शेतीमध्ये गुंतलेली आहे. शासनाने कृषिविकासास प्राधान्य दिले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून कृषि-उत्पादनात बरीच वाढ झाली असली, तरी वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याची काही प्रमाणात आयात करावी लागते. विस्तृत पर्वतीय व जांभा खडकांचा प्रदेश, दरडोई कमी कृषिक्षेत्र, अपुरा व अनियमित पर्जन्य या शेतीव्यवसायातील प्रमुख अडचणी आहेत. ७%पेक्षा कमी क्षेत्र शेतीयोग्य असून ती प्रामुख्याने उदरनिर्वाहापुरतीच आहे. देशाच्या पूर्व भागातील मांगूरू खोरे, आलाओत्रा सरोवराजवळील खोलगट प्रदेश, बेटाचा वायव्य भाग, नद्यांची खोरी व त्रिभुज प्रदेश, पठारी प्रदेश हे देशातील प्रमुख सुपीक कृषिविभाग आहेत. तांदूळ व टॅपिओका ही प्रमुख कृषि-उत्पादने असून बेटाच्या बहुतेक सर्व भागांत त्यांचे उत्पादन घेतले जाते. एकूण जमिनींपैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र भाताच्या पिकाखाली आहे. कॉफी हे प्रमुख व्यापारी पीक असून मादागास्करच्या एकूण निर्यात उत्पन्नापैकी ४० ते ५०% उत्पन्न कॉफीच्या निर्यातीपासून मिळते. लवंग व व्हॅनिला उत्पादनांत तर मादागास्कर जगात अग्रेसर आहे. ऊस व केळी यांचे उत्पादनही महत्त्वाचे आहे. यांशिवाय मका, रताळी, बटाटे, तंबाखू, कापूस, आर्वी, वाटाणा, मिरी, कोको, तेलबिया व द्विदल धान्ये, नारळ, विविध प्रकारची फळे व भाजीपाला यांचेही उत्पादन घेतले जात असून बऱ्याचशा उत्पादनांची निर्यातही केली जाते. देशातील १९८१ मधील कृषि-उत्पादने पुढीलप्रमाणे (उत्पादन हजार मे. टनांत) : तांदूळ १,९९९, टॅपिओका १,७४५, ऊस १,४००, रताळी ४१०, केळी २८०, बटाटा २५८, मका १२६, कॉफी ९५, नारिंग ८६, अननस ५८, नारळ ४०, भुईमूग ३८, वाख २०, सरकी २०, तंबाखू ५, कोको बिया २. बेटाचे निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्र कुरणांखाली असून प्रामुख्याने झेबू जातीची गुरे हेच येथील लोकांच्या संपत्तीचे प्रतीक असते. याशिवाय डुकरे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या, बदके, घोडे, टर्की यांचे प्रमाण पठारी भागात अधिककरून आहे. गुरांच्या मांसाची निर्यात तसेच देशांतर्गत मांसपुरवठा या दोहोंमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने धार्मिक कारणासाठी गुरे देवाला बळी देण्याचे प्रमाण सरकारी प्रयत्नाने कमी केले जात आहे. देशातील १९८१ मधील पशुधन पुढीलप्रमाणे होते (संख्या हजारांमध्ये) : गुरे १०,१५०, डुकरे ७००, मेंढ्या ६२०, शेळ्या १,४००, कोंबड्या १५,००० बदके २,८०० आणि टर्की १,५०० पशुधनापासून १९८१ मध्ये पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (उत्पादन मे. टनांमध्ये) गाईचे दूध ३६,००० गुरांचे व गोवत्स मांस १,२८,००० डुकराचे मांस २६,००० कोंबड्यांचे मटन ४५,०००, कोंबड्यांची अंडी ११,७००, मध १२,०००, गुरांची कातडी १८,०९०. 

उद्योग : देशात खाणकाम व्यवसाय विशेष विकसित झालेला नाही. १९७५ मध्ये सर्वच खनिज संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ग्रॅफाईट, क्रोमाइट, लोहखनिज, बॉक्साइट, अभ्रक, मोनॅझाइट, फ्लिंट, क्वॉर्ट्‌झ, गार्नेट, जमुनिया, मीठ ही येथील प्रमुख खनिजे असून सोने, तोरमल्ली, सिट्रीन, वैदूर्य, इल्मेनाइट, कोलंबाइट, झिर्‌कॉन इत्यादींचीही खनिजे काही प्रमाणात मिळतात. पठारी भागातील बऱ्याच नगरांमध्ये रत्नांवरील प्रक्रियेचे उद्योग आहेत. १९८२ मध्ये पुढीलप्रमाणे उत्पादन झाले (आकडे मे. टनांत) : क्रोमाइट ४४,२२३ ग्रॅफाइट १५,२११ अभ्रक १,३०० अशुद्ध मीठ ३,००० (१९८०).

तामाताव (तोआमासिना) येथे खनिज तेलशुद्धीकरण केंद्र असून त्याची दर दिवसाला १२,००० पिपे एवढी तेलशुद्धीकरणाची क्षमता आहे. खनिज तेलाचे साठे शोधण्याचे प्रयत्न जारी आहेत. १९८१ मध्ये ४,२५० लक्ष किवॉ. ता. एवढे वीज उत्पादन झाले, त्यापैकी २९% जलविद्युत्‌शक्ती होती. आंदेकालेटा येथे देशातील प्रमुख जलविद्युत् प्रकल्प आहे.

खनिज तेल व कोळसा यांच्या अभावामुळे इंधनाच्या दृष्टीने येथील अरण्यांना विशेष महत्त्व आहे. जमिनीची धूप थांबविणे व बांधकामासाठी पुरेसे लाकूड उपलब्ध व्हावे यासाठी वनसंवर्धनावर व वनीकरणावर विशेष भर दिला गेला आहे. १९६० पासून वनीकरण कार्यक्रम हाती घेतला असून दरवर्षी १५० द. लक्ष झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. यात प्रामुख्याने यूकॅलिप्टस, पाइन व सायप्रस वृक्षांच्या लागवडीवर भर आहे. १९८१ मध्ये लाकडाचे एकूण उत्पादन ६,२६२ घ. मी. झाले , त्यापैकी ५,४५५ घ.मी. जळाऊ लाकूड होते. रॅफिया (ताडपत्रांचा तंतू) ह्या जंगली उत्पादनाची निर्यात केली जाते.

देशाला ४,८०० किमी. इतकी विस्तृत किनारपट्टी लाभलेली असली, तरी मासेमारी व्यवसाय अविकसितच राहिलेला आहे. बंदरांचा अभाव व वादळी हवामान यांमुळे पूर्व किनारी भागात खारकच्छे व अंतर्गत जलाशय एवढ्यांपुरतीच मासेमारी चालते. बेटाच्या वायव्य भागात सार्डीन व ट्यूना जातीचे मासे पकडले जातात. १९८१ मध्ये हिंदी महासागरात १०,१४२ मे. टन व अंतर्गत जलाशयांत ३८,५०० मे. टन एवढे मासे पकडण्यात आले. खोल सागरी मासेमारीचे प्रमाण मात्र फारच कमी आहे.

उद्योगधंदे : कृषि-उत्पादनावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांचेच प्रमाण अधिक आहे. यांत भात गिरण्या, स्टार्च, टॅपिओका, साखर, मद्य, तेल, साबण, मांस डबाबंदीकरण, चर्मसंस्करण, कापड, तंबाखू, वाख इ. प्रक्रिया उद्योग विशेष महत्त्वाचे आहेत. यांशिवाय सिमेंट, यंत्रे, तेलशुद्धीकरण, रेडिओ, प्लॅस्टिक , कागद, रसायन हे उद्योगही चालतात. मात्र त्यांत परकीय गुंतवणुकीचे आणि मालकीचे प्रमाण अधिक आहे. अंतर्गत वाहतुकीच्या आणि स्थानिक बाजारपेठेच्या अभावामुळे औद्योगिक विकासावर प्रतिकूल परिणाम झालेला आढळतो. पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी फ्रेंच व दक्षिण आफ्रिकन निधीचा बराच वापर केला जातो. १९८२ मध्ये पुढीलप्रमाणे प्रमुख उत्पादने झाली (मे. टनांमध्ये) : अशुद्ध साखर ८२,१५९, टॅपिओका ८१७, वनस्पती तेल १,९८८, बीर १,९०,०७१ (हेक्टोलिटर), सिगारेट २,०६५, तंबाखू १,५४२, सिमेंट ३५,९२१, पेट्रोल ७६,००५, रॉकेल ४६,५०६ (घ. मी.), साबण ८,९८३ एकूण काम करणाऱ्या लोकांची संख्या ४७,००,००० असून (१९८२) नोंदणीकृत बेकारांची संख्या ४६,५०० होती (१९८१). देशात उल्लेखनीय अशा चार कामगार संघटना असून त्यांची सभासद संख्या प्रत्येकी ३०,००० हून अधिक होती (१९८०). पर्यटन व्यवसायाच्या विकासावर भर देण्यात आला आहे. १९८० मध्ये १३,००० पर्यटकांनी देशाला भेट दिली. त्यांपासून ५० लक्ष अमेरिकी डॉलर एवढे परदेशी चलन मिळाले. पर्यटकांना पारपत्र व प्रवेशपत्र मिळविणे आवश्यक असते.


व्यापार व अर्थकारण : अँतनॅनरीव्हो हे व्यापाराचे प्रमुख ठिकाण असून तामाताव, माजुंगा (महाजंगा), तूलेआर, द्येगो स्वारेस (आंत्सीराने) व ताओलानारो ही इतर व्यापारी केंद्रे आहेत. कापडाचा किरकोळ व्यापार करणारे बहुसंख्य भारतीय, किराणा व्यापार करणारे बहुसंख्य चिनी आहेत. भारतीय व्यापाऱ्यांची संख्या पश्चिम किनाऱ्यावर अधिक आहे. राष्ट्रीयीकृत कंपन्यांद्वारे बहुतेक विदेशी व्यापार चालतो. मादागास्कारचा व्यापार सातत्याने तुटीचा राहिला असून १९७८ पासून तर हे तुटीचे प्रमाण अधिकच वाढले आहे. प्रामुख्याने कॉफी, तांदूळ, व्हॅनिला, साखर, तंबाखू, रॅफिया पाम उत्पादन, लंवग व लंवगतेल, भूईमूग इ. कृषि-उत्पादने, खनिज तेल व इतर उत्पादने, खनिजे इत्यादींची निर्यात केली जाते वाहतुकीची साधने, यंत्रे, रसायन उत्पादने, खनिज उत्पादने, कापड, धातू उत्पादने, विद्युत् उपकरणे, तांदूळ, कच्चे खनिज तेल इ. मालाची आयात केली जाते. अंतर्गत खनिज तेल उत्पादनात वाढ झाल्याने त्याच्या आयातीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. थोड्याफार प्रमाणात पूर्व आफ्रिका, हिंदी महासागरातील इतर बेटे यांकडे खनिज तेल उत्पादनांची निर्यातही केली जाते. विदेश व्यापारात सहभागी देशांमध्ये फ्रान्सचा अग्रक्रम असून (निर्यात १९·६% व आयात ४१·६%) त्यानंतर अमेरिकेची संयुक्त संस्थाने, जपान, ग्रेट ब्रिटन, जर्मनी, इटली, मलेशिया, नेदर्लंड्स, बेल्जियम, इराण या देशांचा क्रम लागतो. १९८१ मध्ये सोने व लष्करी साहित्य वगळता एकूण आयात १,२२,५८४ कोटी मॅलॅगॅसी फ्रँक, तर एकूण निर्यात ८,३७२ कोटी मॅलॅगॅसी फ्रँक एवढ्या किंमतीची झाली.

देशात जुलै १९७३ मध्ये मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली. जून १९७५ मध्ये सर्व व्यापारी बँकांचे व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. कृषी उद्योग व व्यापार यांच्या विकासासाठी स्वतंत्र बँकांची स्थापना करण्यात आलेली आहे. मॅलॅगॅसी फ्रँक (मॅ. फ्रँ.) हे देशाचे अधिकृत चलन असून १०० सेंटिमांचा १ मॅलॅगॅसी फ्रँक होतो. १, २, ५, १०, ५० व १०० मॅलॅगॅसी फ्रँकची नाणी आणि ५०,१००, १,००० व ५,००० मॅलॅगॅसी फ्रँकच्या नोटा चलनात आहेत. ३१ मार्च १९८४ रोजी १ स्टर्लिंग पौंड = ६७२ मॅलॅगॅसी फ्रँक व १ अमेरिकी डॉलर = मॅ. फ्रँ. किंवा १,००० मॅ.फ्रँ. = १·४०० स्टर्लिंग पौंड = २·०३२ डॉलर असा विनिमयदर होता (३१ डिसेंबर १९८३). देशात मेट्रिक पद्धतीचा वापर केला जातो. मादागास्करचे अर्थसंकल्प आतापर्यंत तुटीचे झालेले आहेत. १९७८ च्या अर्थसंकल्पातील महसूल व खर्च अनुक्रमे १०,१०९·२० कोटी व १२,४३६·६० कोटी मॅ. फ्रँ. एवढे होते. १९८२ च्या अर्थसंकल्पातील खर्चाची रक्कम २७,४५३ कोटी मॅ. फ्रँ. होती प्राप्तिकर, आयात व निर्यात शुल्क, अबकारी कर, इतर अशा विविध करांपासून सरकारला कमाल उत्पन्न मिळते. १९८२ च्या मध्यापर्यंत देशाचे परकीय कर्ज १५० कोटी डॉलर होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बहुतेक सर्व खाजगी गुंतवणूक फ्रेंचांची होती परंतु स्वातंत्र्योत्तर काळात परकीयांच्या खाजगी गुंतवणुकीवर बंधन घालण्यात आली असून बऱ्याचशा खाजगी संस्थांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मात्र परकीय सार्वजनिक गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाते. देशाच्या पहिल्या विकास योजना काळात (१९४९–५३) वाहतूक, दळणवळण व ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रमांवर अधिक भर देण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात शासनाने देशाच्या सर्वच क्षेत्रांत स्वावलंबनावर भर दिला.

डोंगर-उताराच्या प्रदेशामुळे लोहमार्ग बांधणे त्रासाचे आणि खर्चाचे असल्याने लोहमार्गांचा विकास मर्यादित झालेला आढळतो. देशात चार प्रमुख लोहमार्ग असून त्यांची एकूण लांबी ८८३ किमी. आहे सर्वच लोहमार्ग मीटर–मापी आहेत. रस्त्यांची एकूण लांबी ५०,६२० किमी. आहे. प्रवासी मोटारी ५७,००० आणि व्यापारी वाहने ५०,००० आहेक (१९८१). तामाताव, माजुंगा या प्रमुख बंदरांबरोबरच तूलेआर, द्येगो स्वारेस ही महत्त्वाची बंदरे आहेत. अँतनॅनरीव्होजवळील इव्हातो येथे प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. एअर मादागास्कर, एअर फ्रान्स, अलितालिया व एअर टांझानिया इ. विदेशी विमानकंपन्या आंतरराष्ट्रीय हवाई सेवा उपलब्ध करतात. देशात ९ लक्ष रेडिओ संच, ७१,००० दूरचित्रवाणी संच (१९८३), ३७,००० दूरध्वनिसंच (१९७९), ५४७ टपाल कचेऱ्या व ५५ बिनतारी संदेशवाहक केंद्रे (१९७१) होती. अत्रिका मादागास्करमातिन ही फ्रेंच व मॅलॅगॅसी भाषांतील, तर मारेसाकासाही ही मॅलॅगॅसी भाषेतील प्रमुख दैनिक वृत्तपत्रे आहेत.

लोक व समाजजीवन : मादागास्करची एकूण लोकसंख्या ९४·७ लक्ष (१९८३ अंदाज) असून लोकसंख्येची घनता दर चौ. किमी. स ५७·५ लोक एवढी आहे. देशातील लोकसंख्या इंडोनेशियन (किंवा मलायो-पॉलिनीशियन) व कृष्णवर्ण आफ्रिकन अशा दोन प्रमुख कुलांतील असून हे दोन्ही गट वेगवेगळ्या १८ वांशिक गटांमध्ये विभागलेले आहेत. यांपैकी ईमेरीन (एकूण लोकसंख्येच्या २५%), बेत्सीलिओ (एकूण लोकसंख्येच्या १२%) हे दोन मुख्य इंडोनेशियन वांशिक गट, तर बेत्सीमसाराका, त्सिमिहेटी, साकालाव्ह, अँतांड्रॉय, अँताईसाका व तनाला हे प्रमुख कृष्णवर्णी आफ्रिकन वांशिक गट आहेत. मॅलॅगॅसी व फ्रेंच या दोन मुख्य व अधिकृत भाषा आहेत. मॅलॅगॅसी भाषा मूळ इंडोनेशियन भाषेपासून आलेली आहे. मेरिना बोलभाषाही बरेच लोक बोलतात. ती प्रमाण–भाषांपैकी एक समजली जाते. एकूण लोकसंख्येपैकी ४९% लोक जडप्राणवादी, तर ५१% लोक ख्रिश्चनधर्मीय असून त्यांत रोमन कॅथलिक व प्रॉटेस्टंटपंथीय साधारण निम्मेनिम्मे होते (१९८० अंदाज). बाकीचे मुस्लिम, भारतीय, चिनी, कॉमोरन व अरब हे लोक होते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच येथे ख्रिश्चन लोकसंख्या वाढत गेली. स्वातंत्र्यापासून परकीयांना देशात स्थायिक होण्यावर बंदी घालण्यात आली आहे. स्त्रियांना समाजात प्रतिष्ठेची वागणूक मिळते. व्यापारात व शासनसंस्थांत त्या उच्च पदावरही आढळतात. स्त्रीचा जीव वाचविण्यासाठी गर्भपात हा कायदेशीर मानला जातो. १९७० मध्ये प्रजोत्पादक काळ पूर्ण केलेल्या स्त्रियांना सरासरीने ६ मुले असल्याचे आढळले आहे. दरहजारी जन्मप्रमाण ३७·४, मृत्युप्रमाण ११·१ होते (१९७२). १९९० मध्ये जन्मप्रमाण व मृत्युप्रमाण दरहजारी अनुक्रमे ४९ व १५·३ इतके होण्याचा अंदाज प्रक्षेपित करण्यात आला आहे.

आरोग्य सेवा मोफत पुरविल्या जात असून त्यांचे क्षेत्र वाढविण्यासाठी शासनाने वैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांच्या विकेंद्रीकरणावर भर दिला आहे. औद्योगिक अपघात व व्यवसाय यांमध्ये उद्‌भवलेल्या रोगांबाबत नुकसानभरपाई तसेच कुटुंब भत्ता शासनाकडून दिला जातो. ख्रिश्चन मिशनऱ्यांचे याबाबतचे काम उल्लेखनीय आहे. १९७८ मध्ये देशात ७४९ राज्य रुग्णालये, १६,४०१ खाटा व ८११ डॉक्टर होते. प्रत्येक प्रांताच्या मुख्य ठिकाणी रुग्णालय आहे. मलेरिया, कुष्ठरोग व क्षयरोग यांचे प्रमाण अधिक आहे. १९७५–८० च्या दरम्यान सरासरी आयुर्मान पुरुषांच्या बाबतीत ४४ वर्षे, तर स्त्रियांच्या बाबतीत ४८ वर्षे होते.


देशात ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत असले, तरी साक्षरतेचे प्रमाण केवळ ४७% (१९७९) एवढेच आहे. १९७५ मध्ये ६ ते १२ वर्षे वयोगटातील सु. ८५ % मुले प्राथमिक शाळेत जात होती परंतु त्यांपैकी १९७८ मध्ये एकूण ८,००२ प्राथमिक शाळांमध्ये २३,९३७ अध्यापक व १३,११,००० विद्यार्थी होते. १९७६ मध्ये माध्यमिक शाळांमधून १,१४,४६८ विद्यार्थी आणि तंत्रशाळांमधून सु. ७,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते. अँतनॅनरीव्हो येथे मादागास्कर विद्यापीठ (१९६१) असून त्याची पाच प्रादेशिक केंद्रे आहेत. १९८२ मध्ये त्यांत एकूण २१,००० विद्यार्थी शिक्षण घेत होते. यांशिवाय देशात चार कृषिविद्यालये आहेत. अँतनॅनरीव्हो येथील राष्ट्रीय ग्रंथालय व विद्यापीठ ग्रंथालय ही देशातील प्रसिद्ध ग्रंथालये असून त्यांत अनुक्रमे १,५९,२०० व १,२०,००० एवढी ग्रंथसंख्या होती (१९८२). अँतनॅनरीव्हो येथील राणीच्या प्रासादात प्रसिद्ध असे पुरातत्त्वीय व ऐतिहासिक संग्रहालय आहे. याशिवाय शहरात ललित कला, चित्रवीथी, लोकसाहित्य, पुराजीवविज्ञान, प्राणिशास्त्र आणि प्रकृतिविज्ञान यांची वस्तुसंग्रहालये आहेत. नोसी बे बेटावर प्रकृतिविज्ञानविषयक संग्रहालय आहे. देशात ३१ सिनेमागृहे असून त्यांत १२,५०० आसनांची सोय होती (१९७४). अँतनॅनरीव्हो येथे टेनिस, गोल्फ या खेळांच्या व घोड्यांच्या शर्यतीच्या सोयी आहेत. १९७० मध्ये अँतनॅनरीव्हो व नोसी बे बेटावर विशेष पयर्टकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची हॉटेले बांधण्यात आली आहेत. कवी म्हणून झां झोझेफ राबेआरिव्हेलो (१९०१–३७) व नाटककार म्हणून झाक राबेमानांजारा (१९१४– ) यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

महत्त्वाची स्थळे : राजधानी अँतनॅनरीव्हो (तानानारीव) हेच देशातील आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, राजकीय आणि वाहतूक व दळणवळण यांच्या दृष्टींनी महत्त्वाचे शहर आहे. याशिवाय तामाताव (लोकसंख्या ५९,१००–१९७८), माजुंगा (५७,५००), फ्यानारांत्सोआ (५५,५००), द्येगो स्वारेस (४८,०००) व तूलेआर (३४,०००) ही देशातील मोठी शहरे आहेत. 

चौधरी, वसंत

मादागास्कर