पुष्कर: राजस्थान राज्याच्या अजमीर जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ७,३४१ (१९७१). अजमीरच्या वायव्येस ११ किमी.वरील ‘तीर्थराज पुष्कर’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे क्षेत्र भारतातील एकमेव ब्रह्मावतार ठिकाण मानतात. यज्ञाच्या हेतूने भूलोकी फिरत असता ब्रह्मदेवाच्या हातून येथे तीन जागी पुष्कर (कमळ) गळून पडले व तेथे तीन सरोवरे निर्माण झाली म्हणून त्या ठिकाणाला ब्रह्मदेवाने पुष्कर नाव देऊन तेथे कार्तिक शुद्ध एकादशीला यज्ञ केला, असा पद्मपुराणात उल्लेख आढळतो. कार्तिक शुद्ध एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत येथील सरोवरस्नान पुण्यप्रद मानतात.

पुष्कर

पुष्करच्या तीन बाजूंना टेकड्या असून पूर्वेकडील नाग पहाडावर प्राचीन गुहा आणि पंचकुंड आहे. हे अगस्त्य ऋषींचे वसतिस्थान मानतात. पुष्कर सरोवराभोवती घाट असून येथील प्राचीन मंदिरे औरंगजेबाने उद्ध्वस्त केली व पुढे राजपुतांनी त्यांपैकी काहींची पुन्हा उभारणी केली. येथे ब्रह्मा, सावित्री, गायत्री (शक्तिपीठ), बद्रिनारायण, वराह, शिव आत्मतेश्वर श्रीरंग, यांची प्रमुख मंदिरे आहेत. कार्तिक पौर्णिमेला येथे भरणाऱ्या मोठ्या यात्रेत घोडे, उंट, गाई-बैल यांचाही मोठा बाजार भरतो. यात्रेच्या वेळी होणाऱ्या उंटगाड्यांच्या शर्यती हे येथील एक वैशिष्ट्य असते. शहरात नगरपालिका, उच्च माध्यमिक शिक्षणसुविधा आहेत.

चौंडे, मा.ल.