शिझूओका : जपानच्या होन्शू बेटावरील एक शहर व याच नावाच्या विभागाची (प्रीफेक्ट) राजधानी. लोकसंख्या ४,७१,००० (१९९७). होन्शू बेटाच्या आग्नेय किनाऱ्यावर असलेल्या सुरूगा उपसागराच्या पश्चिम किनाऱ्यावर, ॲबे नदीच्या त्रिभुज प्रदेशात हे शहर वसले आहे. टोकियो व नागोया या दोन शहरांच्या साधारणपणे मध्यावर हे शहर आहे. येथील हवामान आल्हाददायक आहे. शिझूओकाच्या परिसरातून जपानमधील हिरव्या चहाचे सु. ७० टक्के उत्पादन निघते. लाकूडकापणी, चहावरील प्रक्रिया, कागद व लाखेच्या वस्तू, फर्निचर इ. उद्योगधंदे शहरात चालतात. हे प्रशासकीय व संस्कृतिक केंद्र असून बंदर म्हणूनही प्रसिद्ध आहे. शिझूओका विद्यापीठ, स्त्रियांचे औषधनिर्माणविद्या महविद्यालय, तसेच कृषिविषयक प्रयोगशाळा येथे आहेत. तोकुगावा या शोगुनचा (मध्ययुगीन जपानी सुभेदारीचा) संस्थापक एइयासू याचे वास्तव्य या शहरात होते.

चौधरी, वसंत