कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुक्याचे ठिकाण. लोकसंख्या २५,८२९ (१९७१). हे गोदावरीच्या उत्तर तीरावर, सडकेने अहमदनगरच्या उत्तरेस ९९ किमी. व दौंड-मनमाड रेल्वेने मनमाडच्या दक्षिणेस ४० किमी. आहे. नदीच्या दोन प्रवाहामुळे निर्माण झालेल्या बेटावर कचेश्वर शुल्केश्वराचे मंदिर, त्याचप्रमाणे १४ किमी.वर शिर्डी असल्याने कोपरगावला धार्मिक महत्त्व आले आहे. राघोबादादा पेशव्याचे उत्तरायुष्य आणि दुसऱ्या बाजीरावाचे बालपण येथे गेल्याने गावात ऐतिहासिक वास्तू आढळतात. कोपरगावला व तालुक्यात मिळून सहा साखर कारखाने असल्याने कोपरगाव भारताची साखरपेठ बनली आहे. याशिवाय गूळ, ज्वारी, बाजरी, कापूस यांचीही ही व्यापारपेठ आहे.

शाह, र. रू.