केन्या: पूर्व आफ्रिकेतील स्वतंत्र प्रजासत्ताक. क्षेत्रफळ ५,८२,६४७ चौ. किमी., पैकी १४,७९२ किमी. जलव्याप्त. लोकसंख्या १,१६,९४,००० (१९७१ अंदाज). हा देश ४ उ. ते ४ द. व ३४ पू. ते ४१ पू. यांदरम्यान असून याच्या मध्यातून विषुववृत्त गेलेले आहे. याच्या उत्तरेस इथिओपिया व सूदान, पश्चिमेस युगांडा व व्हिक्टोरिया सरोवर, दक्षिणेस टांझानिया व पूर्वेस सोमाली गणराज्य आणि हिंदी महासागर आहेत. नैरोबी ही केन्याची राजधानी आहे.

भूवर्णन : केन्याचे तळखडक कायनाइट, ॲस्बेस्टस, ग्रॅफाइट व अभ्रकयुक्त नाइस व शिस्ट असून पश्चिम भागात त्यांवर तीव्र वलीकरण झालेल्या सोने व तांबे यांनी युक्त ग्रॅनाइटी व इतर खडकांचे आच्छादन आहे. पूर्वेकडील सखल भागात रेतीखडक व इतर सागरी गाळखडक आहेत. ईशान्य भागातही स्तरित खडक आहेत. या भागाचे अनेकदा समतलीकरण व उत्थान झाले आहे. केन्यातील प्रसिद्ध खचदरी व तिच्या दोन्ही बाजूंचा डोंगराळ प्रदेश प्लायोसीन व प्लाइस्टोसीन काळात निर्माण झालेला असून त्यावेळच्या लाव्ह्यांनी उंच प्रदेश व्यापला आहे. काही बेसाल्ट खडक मायोसीन काळातील आहेत. बऱ्याच उंच प्रदेशात, खचदरीत व रूडॉल्फ सरोवराच्या दोन्ही बाजूच्या विस्तृत प्रदेशात तृतीयक काळातील लाव्हे आढळतात. त्यामुळे तेथील मृदा सच्छिद्र व सुपीक झाली आहे. पश्चिमेचा पर्वतमय प्रदेश, नैर्ऋत्येचे विस्तीर्ण उंच पठार, त्याला दुभंगणारी दक्षिणोत्तरी खचदरी, उत्तरेचा व आग्नेयीचा कमी उंचीचा रुक्ष प्रदेश आणि व्हिक्टोरिया सरोवराच्या व हिंदी महासागराच्या किनाऱ्यावरील अरुंद सखल किनारपट्ट्या अशी केन्याची सर्वसाधारण भूपृष्ठरचना आहे. हिंदी महासागरावर केन्याचा सु. ५०० किमी. किनारा आहे. मोंबासा व मालिंदी ही प्रमुख बंदरे आहेत. सखल व सुपीक किनारपट्टी ३ ते १६ किमी. रुंद असून तिच्या पश्चिमेस सु. ५००  किमी. पर्यंत प्रदेश उंच होत जातो. त्यात तीत टेकड्यांचा डोंगराळ भाग आहे. देशाच्या नेर्ऋत्य विभागात सु. ३,३०० मी. उंचीचे पठार असून ६०० मी. उंचीचा आग्नेय व उत्तर विभाग रुक्ष आहे. या पठाराच्या मध्यभागातून, उत्तर-दक्षिण दिशेने आफ्रिकेची प्रसिद्ध खचदरी गेलेली आहे. ह्या खचदरीच्या पश्चिमेस, पठारी भागाची उंची कमी होत जाऊन शेवटी व्हिक्टोरिया सरोवर व त्याच्या काठची सखल किनारपट्टी आहे. युगांडाच्या सीमेवर मौंट एलगन हा ४,३२१ किमी. उंचीचा पर्वत आहे. खचदरीच्या पूर्वेस ॲबर्डेअर पर्वताची सरासरी ३,००० मी. उंचीची रांग असून तिच्या पूर्व उताराच्या अखेरीस ५,२०० मी. उंचीचा मौंट केन्या हा पर्वत आहे. विषुववृत्ताजवळ असूनही उंचीमुळे त्याचा माथा सतत हिमाच्छादित असतो. खचदरीची रुंदी ५० ते ६५ किमी. असून ती बाजूच्या प्रदेशापेक्षा ६०० ते ९०० मी. खोल आहे. खचदरीत कामासिया टेकड्यांची रांग व मृत ज्वालामुखींची अनेक विवरे आणि मागाडी, नैवाशा, एल्मेंटीटा, नाकूरू, हॅनिंग्टन, बॅरिंगो ही सरोवरे आहेत. उत्तर भागात २५० किमी. लांबीचे रूडॉल्फ सरोवर आहे. त्याच्या पश्चिमेस युगांडाच्या सीमेपर्यंत डोंगराळ प्रदेश आहे.  पूर्वेकडील रुक्ष पठारी भागात कुलाल २,२९० मी. व मार्सांबित १,७४० मी. एकाकी उभे आहेत. हिंदी महासागराला मिळणाऱ्या ताना, आती-सबाकी-त्सावोनी व गॅलाना, लोरीअनच्या दलदलीकडे वाहणारी इवासो-निरो आणि व्हिक्टोरीया सरोवरास मिळणाऱ्या सोईया, गॉरी आणि याला ह्या केन्यातील प्रमुख नद्या होत. खचदरीतील प्रवाह तेथील काही सरोवरांस मिळतात.

केन्या विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस जवळजवळ सारखाच दूरवर पसरलेला असला, तरी त्याच्या हवामानात, भूरचनेप्रमाणेच विविधता दिसून येते. उष्ण कटिबंधीय दमट हवामान, खंडांतर्गत कोरडे व उष्ण हवामान आणि पठारी व पर्वतमय प्रदेशांतील थंड हवामान असे प्रकार येथे दिसून येतात. किनारपट्टीवर तपमान २६·६ से. असते. तेथे वार्षिक सरासरी तपमानकक्षा फक्त ३·३ से. असते. परंतु दैनिक सरासरी तपमानकक्षा ६·७ से. असते. पठारी भागात तपमान उंचीवर अवलंबून असते. १,६७५ मी. उंचीवरील नैरोबी येथे ते १९ से. असते तर २,७६० मी. उंचीच्या विषुववृत्तावरील भागात ते १३·३ से. असते. रुक्ष, ओसाड भागात तपमान २१ से. ते २७से. पर्यंत असते. देशाच्या बऱ्याच मोठ्या भागात ७६ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. उत्तरेकडील रुक्ष भागात तो २५ सेंमी. पर्यंत पडतो. किनारपट्टीच्या भागात १०० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो अगदी रुक्ष भागात जेमतेम १२-१३ सेंमी. तर व्हिक्टोरिया सरोवराजवळच्या काही भागांत १७५ सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. ऋतूंचा फरक तपमानापेक्षा पावसामुळे जाणवतो. विशेषतः एप्रिल ते जून आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या दोन कालखंडांत विशेषतः पाऊस पडतो.

समुद्रकिनाऱ्यालगत नारळाची झाडे, कच्छवनश्री, सदाहरित वृक्ष व ९०० ते १,८०० मी. उंचीच्या भागात १–१·५ मी. उंचीचे गवत, खुरटी झाडेझुडपे उगवतात, तर रुक्ष विभागात फक्त खुरटे गवतच उगवते. पठारी विभागात बऱ्याच प्रदेशात २–२·५ मी. उंचीचे विशिष्ट सॅव्हाना गवत व त्यात मधूनमधून काटेरी झाडे आढळतात. त्यापेक्षा उंच भागात बांबू, इमारती लाकडांचे वृक्ष, कर्पूरवृक्ष, आफ्रिकन ऑलिव्ह, पोडो, सीडार इ. वृक्ष आढळतात.

केन्याचे गवताळ व अरण्यमय प्रदेश नानाविध व विपुल प्राण्यांनी गजबजलेले आहेत. हत्ती, गेंडा, झेब्रा, रानरेडा, गॅझेली, ऑरिंक्स इ. अनेक जातींची हरणे, विल्डेबीस्ट (नू), हार्डबीस्ट, इंपाला, ईलँड हे तृणभक्षक व सिंह, चित्ता, बिबळ्या, तरस, कोल्हा इ. मांसभक्षक प्राणी येथे आढळतात.नद्या-सरोवरांत सुसरी व हिप्पो आहेत. बॅबून व अन्य जातींची माकडे अरण्यात दिसतात. सारस, बगळा, शहामृग, गरुड, गिधाड व इतर अनेक पक्षी आहेत. तसेच मांबा, कोब्रा, पफ् ॲडर, अजगर हे सर्प व विविध जातींचे कीटक आहेत.

इतिहास : केन्याच्या प्रागितिहासाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. सातव्या शतकात अरब आणि इराणी व्यापाऱ्यांनी पूर्व किनारपट्टीवर वसाहती करण्यास सुरुवात केली आणि झांझिबार, इराणचे आखात व तांबड्या समुद्राच्या विभागात व्यापार सुरू केला. १४९८ मध्ये वास्को द गामा मालिंदी येथे आला. त्यापूर्वी चिनी व हिंदी व्यापारी येथे येत असत. पुढील २०० वर्षे येथे पोर्तुगीज व अरब यांची सत्तास्पर्धा सुरू होती. १७४० मध्ये अरबांनी सर्व पोर्तुगीजांनी येथून हाकलून लावल्यावर, ओमान साम्राज्यांतर्गत झांझिबारच्या सुलतानाचा अंमल येथे सुरू झाला.एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास जर्मन व ब्रिटिश मिशनऱ्यांनी व संशोधकांनी केन्याच्या अंतर्भागात व व्हिक्टोरिया सरोवराच्या परिसरात प्रवेश केला. त्यांच्यापूर्वी अरब आणि स्वाहिली लोक मोंबासाहून व्हिक्टोरिया सरोवर, किलिमांजारो व एलगन पर्वतांपर्यंत हस्तिदंताच्या शोधार्थ जात, परंतु कष्टमय प्रवास व मसाई लोकांची भीती यांमुळे ते तो प्रयत्न सोडून देत. अठराव्या शतकाच्या मध्यास उत्तरेकडून केन्याच्या मध्यभागात आलेल्या लढाऊ भटक्या मसाई टोळीवाल्यांचे वर्चस्व वाढू लागले. त्यांनी कृषिप्रधान बांटूंवर धाडी घातल्या. नांदींच्या वाटेस ते गेले नाहीत. तावेता व तीतांनी अरण्यांचा आणि डोंगराचा आश्रय घेतला. किकुयूंनी त्यांना बऱ्याच यशस्वीपणे तोंड दिले. रोगांच्या साथींनी सर्व लोक हवालदिल झाले. याच वेळी यूरोपीय प्रबळ झाले व १८८८ मध्ये येथे इंपीरिअल ब्रिटिश ईस्ट आफ्रिकन कंपनीचा कारभार सुरू झाला. १८९० मध्ये ब्रिटिश व जर्मन यांचा करार झाला व १८९५ मध्ये हा प्रदेश ब्रिटिश ईस्ट आफ्रिका या नावाने जाहीर झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस येथे लोहमार्ग बांधले जाऊ लागले आणि यूरोपीय व आशियाई लोकांच्या वसाहती वाढू लागल्या. १९२० मध्ये या प्रदेशास ब्रिटिश क्राउन कॉलनी हे नाव प्राप्त झाले. दोन्ही महायुद्धांदरम्यानच्या काळात राज्यकारभारात यूरोपीयांच्या बरोबरीने स्थान मिळविण्याचे आशियाईचे प्रयत्न हाणून पाडण्यात यूरोपीय यशस्वी झाले. परंतु दुसऱ्या महायुद्धानंतर मूळच्या आफ्रिकी लोकांनीच सत्ता संपादनासाठी संघर्ष सुरू केला. टॉम म्बोया व जोमो केन्याटा यांच्या नेतृत्वाखालील माऊ-माऊ चळवळीला पुढे हिंसक स्वरूप प्राप्त झाले व १९५२ ते १९५९ पर्यंत तेथे आणीबाणीची परिस्थिती जाहीर केली गेली. १९५४, १९५७ व १९६० मध्ये येथे संविधानाचे तीन मसुदे पुढे ठेवले गेले. परंतु १९६० मध्ये दिलेला संविधानाचा मसुदा मान्य झाला. १९६३ च्या निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळविणाऱ्या टॉम म्बोया व नंतर जोमो केन्याटा यांच्या नेतृत्वाखालील केन्या आफ्रिकन नॅशनल युनियन (कानू) पक्षाने १२ डिसेंबर १९६३ रोजी ब्रिटिश राष्ट्रकुलांतर्गत स्वतंत्र केन्या देशाचा कारभार हाती घेतला व जोमो केन्याटा त्याचा मुख्य प्रधान झाला. चार दिवसांनी केन्या संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला व १२ डिसेंबर १९६४ रोजी याचे गणराज्य स्थापन झाले. जोमो केन्याटा हा केन्याचा पहिला अध्यक्ष निवडला गेला. किनाऱ्याजवळचा १६ किमी. रुंदीचा प्रदेश झांझिबारच्या सुलतानाच्या सत्तेखाली होता, परंतु केन्या प्रोटेक्टोरेट म्हणून ब्रिटिशच त्याचा कारभार करीत. सुलतानाने हा प्रदेश पुढे केन्याच्या हवाली केला आणि ब्रिटिशांनी युगांडा, इथिओपिया, इटली यांच्याशी ठरविलेल्या सीमांपर्यंत सर्व केन्या एकसंध झाला.

केन्या आफ्रिकन डेमोक्रॅटिक (काडू) हा विरोधी पक्ष राज्यकर्त्या कानू पक्षात १९६५ साली विलीन झाला. १९६६ मध्ये उपाध्यक्ष ओगिंगा-ओडिंगा याने राजीनामा देऊन केन्या पीपल्स युनियन पार्टी – केपीयू – हा पक्ष स्थापन केला. त्याला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळाली. १९६९ मध्ये टॉम म्बोया या मंत्र्याचा खून झाला. केपीयूवर बंदी घालण्यात आली व ओडिंगा आणि त्याचे सहकारी यांस तुरुंगात डांबण्यात आले. डिसेंबर १९६९ च्या निवडणुकात केन्याटा व कानू पक्षाचे लोक अविरोध निवडून आले. स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षात ७०,००० लोकांना ब्रिटिश पासपोर्ट देण्यात आले. त्यांपैकी बरेच आशियाई होते. १९६७ मध्ये ब्रिटिश सरकारने या लोकांच्या ब्रिटन प्रवेशावर नियंत्रणे घातली. केन्याच्या नागरिकांशिवाय इतरांना कामाचे परवाने न देण्याच्या केन्या सरकारच्या धोरणामुळे या लोकांना धड कोणत्याच देशात राहता येईना. त्यांचा प्रश्न अद्याप अनिर्णितच आहे.


केन्या पूर्व आफ्रिकन संघाचा सभासद देश असून केन्या, युगांडा व टांझानिया यांच्या संयुक्त मंत्रिमंडळाद्वारे या देशातील दळणवळण, वाहतूक, अर्थव्यवस्था, आंतरदेशीय व्यापार, कारखानदारी व कामगार नियंत्रण या बाबींवर नियंत्रण ठेवले जाते.

राज्यव्यवस्था : १९६३ च्या संविधानानुसार येथे सीनेट व लोकसभा अशी दोन मंडळे मुख्यमंत्री आणि त्यांनी निवडलेल्या मंत्रिमंडळामार्फत देशाची राज्यव्यवस्था पहात असत. १९६५ मध्ये राजकीय विभागांचे प्रांत करण्यात आले. कोस्ट (किनारी), नॉर्थ ईस्टर्न (ईशान्य), ईस्टर्न (पूर्व), सेंट्रल (मध्य), नैरोबी, रिफ्ट व्हॅली (खचदरी), न्यांझा व वेस्टर्न (पश्चिम) हे ते प्रांत होत. १९६६ मध्ये संविधान दुरुस्ती होऊन लोकसभा व सीनेट यांचे एकीकरण झाले १७० सभासदांचे एकसदनी विधिमंडळ-लोकसभा- निर्मिण्यात आले. त्यात १५८ निर्वाचित व १२ विशेष निर्वाचित सभासद असतात. त्यांची मुदत पाच वर्षे असते. त्यांतून अध्यक्ष उपाध्यक्षाची व मंत्रिमंडळाची निवड करतो. ते सर्व लोकसभेला जबाबदार असतात.

केन्याच्या प्रांताचा कारभार अध्यक्षाने प्रत्येक प्रांतासाठी नेमलेल्या आयुक्तामार्फत चालतो. जिल्हा आयुक्त प्रांतिक आयुक्ताला जबाबदार असतात. नैरोबी प्रांतासाठी सिटी कौन्सिल आहे. देशात सहा नगरपालिका, ३३ कौंटी कौन्सिले व त्यांची ग्रामीण व नागरी विभागीय कौन्सिले आहेत. त्यांच्या मार्फत आरोग्य, घरे, रस्ते, शिक्षण इ. स्थानिक सेवा लोकांना मिळतात.

केन्यात न्याय व कारभार स्वतंत्र आहेत. सर्वोच्च न्यायालय नैरोबी, मोंबासा आणि कीसूमू येथे भरते. त्याखाली दुय्यम न्यायालये आहेत. टोळीप्रमुखांना आता न्यायदानाचा अधिकार नाही.

केन्याचा राष्ट्र-सैन्यविभाग देशातील सर्व संरक्षणव्यवस्था पाहतो. केन्यात, केन्या रायफल्सचे तीन बटालियन सैन्य, ११,००० पोलीस आणि इथिओपियाच्या सहकार्याने तयार झालेले विमानदल व छोटेसे आरमार आहे.

आर्थिक स्थिती : केन्या देशाची आर्थिक परिस्थिती सर्वस्वी शेतकी मालावर अवलंबून असून दुसऱ्या महायुद्धानंतर कारखानदारी वाढत आहे. पठारी भागात गोऱ्या शेतकऱ्यांनी व मळेकऱ्यांनी मोठमोठ्या विभागांत आधुनिक शेतीतंत्र वापरले होते. परंतु स्थानिक लोक पूर्वापार पद्धतीने पोटापुरती शेती करण्यात, निकृष्ट जीवनमान जगण्यात समाधान मानीत असत. स्वातंत्र्यानंतर ही स्थिती पालटली आहे. बरेच गोरे लोक ब्रिटिश सरकारकडून नुकसानभरपाई घेऊन केन्या सोडून गेले आहेत व भरपूर शेती उत्पादन करणारे थोडेच गोरे बाकी राहिले आहेत. स्थानिक लोकांत शेती-सुधारणा वेगाने होत आहे. तुकडेजोड, पूर्वीच्या गोऱ्यांचे मळे चालविणे आणि निर्यातीसाठी शेती उत्पादन वाढविणे यांकडे लक्ष दिले जात आहे. जलसिंचनाच्या नवीन योजना आखल्या जात आहेत. केन्या स्वतःच्या गरजेपुरते धान्य आणि इतर उत्पन्न काढीत होताच. आता तो शेजारील देशांचीही गरज भागवू लागला आहे. देशाच्या सु. ८०% भागात पशुपालन व वन्यपशुसंपत्ती आहे. येथील वन्यपशू हे प्रवाशांचे मोठे आकर्षण असल्यामुळे ती एक उत्पन्नाची मोठी बाब आहे आणि वन्यपशूंसाठी ठिकठिकाणी अभयारण्ये व राखीव विभाग आहेत. मध्य, खचदरी, पश्चिम व न्यांझा हे प्रांत व पूर्व आणि किनारी प्रांतांचा काही भाग हे शेती उत्पन्नाचे प्रमुख विभाग आहेत. पठारीप्रदेशात कॉफी, चहा, वाख, पायरेथ्रम, मका व गहू ही मुख्य पिके आहेत, तर सखल विभागात नारळ, काजू, कापूस, ऊस, वाख व मका होतात. शेती उत्पन्नाबरोबरच मांस, लोणी, कातडी यांची निर्यात वाढत आहे. भुईमूग, तीळ, बटाटे, घेवडे, तेलबिया वगैरे इतर उत्पन्नेही हवामानाप्रमाणे निरनिराळ्या भागांत होतात. आंबे, ताजी फळे, फुले आणि भाजीपाला यांची यूरोपकडे विमानमार्गे निर्यात वाढत आहे.

देशातील सु. ३% जमीन जंगलाखाली आहे. पोडो, वॅट्ल्, सीडार, सायप्रस हे मृदू लाकडाचे व मुशेरगी, नुहरी, मुकेओ, कर्पूरवृक्ष आणि मुसैसे हे कठीण लाकडाचे वृक्ष येथे आढळतात.

दुसऱ्या महायुद्धानंतर विजेची मागणी वाढली. औष्णिक वीजनिर्मितीच्या जोडीला १९५० नंतर येथे जलविद्युत् शक्तीची वाढ झाली आणि आता ताना नदीवर जलविद्युत् योजनेची उभारणी होत आहे. याखेरीज टांझानिया व युगांडामधूनही वीजपुरवठा होतो. १९६८ मधील वीजउत्पादन ३,८०,००० किवॉ. तास होते. वाख, दोरखंडे, दारू व मद्यार्क, बागायती, कातडी कमावणे, कागद गिरण्या, काचसामान निर्मिती, पादत्राणे, सिमेंट, साखर गिरण्या, पिठाच्या गिरण्या या धंद्यांचा विकास होत आहे. व्हिक्टोरिया सरोवरात ‘तिलापिया’ मासे सापडतात व ते पूर्व आफ्रिकेच्या बाजारपेठेत जातात. किनारी प्रदेशातही मासेमारी चालते. नद्यांतून ट्राउट मासे भरपूर मिळतात.

केन्यात खनिज संपत्तीच्या संशोधनासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्याने प्रयत्न चालू आहेत. मागाडी सरोवराला ‘सोडा’ सरोवर म्हणतात. कारण तेथे निसर्गतःच भरपूर सोडा मिळतो. तांबे, सोने, चांदी ही अल्प प्रमाणात सापडतात. त्यांशिवाय चुनखडक, डायटोमाइट, मीठ, चिनी माती, जिप्सम, इमारती दगड ही खनिजे सापडतात. कार्बन-डाय ऑक्साइड, व्हर्मिक्युलाइट, बॅराइट्स, मॅग्नेसाइट, फेल्स्पार, बेरिल, ॲक्वामरीन फ्लुऑराइट, इंद्रनील, गॅलेना, बोलास्ट्राइट, कॉरंडम, ग्वानो हे इतर पदार्थ मिळतात.

१९६९ मध्ये ६२,७२,००० कामगारांपैकी ५,८२,००० आफ्रिकी, ३,१४,००० आशियाई आणि १,३८,००० यूरोपीय होते. त्यांपैकी २८·५% शेती व जंगल ३३·५% खाजगी उद्योग व व्यापार आणि ३८% सरकारी कामावर होते. १९६६ मध्ये मालकांच्या १५ व कामगारांच्या ४२ संघटना होत्या. ३,४०,०४० कामगार त्यांचे सभासद होते. चहा, कॉफी, वाख या धंद्यांत व शहरी उद्योगधंद्यांत कामगार संघटनांचा विशेष कल आहे. १९६५ मध्ये शासनाने कामगारसंघटनांची मध्यवर्ती संस्था स्थापन केली आहे. येथे किमान वेतन कायदा आहे.


देशातील सर्व महत्त्वाच्या कचेऱ्या व उद्योगधंदे मोंबासा व नैरोबी या दोन शहरांत एकवटले आहेत. आयात पदार्थांत प्रामुख्याने विविध प्रकारचा पक्का माल, यंत्रसामग्री, इंधन, अन्नधान्ये व रासायनिक पदार्थ असतात, तर निर्यातीत कॉफी, चहा, वाख, मांसपदार्थ, कातडी, सोडियम कार्बोनेट, मका, कापूस यांचा समावेश होतो. हा व्यापार प्रामुख्याने यूरोपीय देश, भारत, मध्यपूर्वेतील देश, जपान, स्वित्झर्लंड आणि संयुक्त संस्थाने यांच्याशी चालतो. १९६९ मध्ये  ३१·२% आयात ब्रिटनकडून, ७·५% अमेरिकेकडून, ८·२% प. जर्मनीकडून, ७·८% जपानकडून होती, तर निर्यातीपैकी २१·६% ब्रिटनकडे, ११·४% प. जर्मनीकडे व ७·३% अमेरिकेकडे होती.

१ डिसेंबर १९६७ रोजी युगांडा, केन्या व टांझानिया यांच्या‘ईस्ट आफ्रिकन इकॉनॉमिक कम्युनिटी अँड कॉमन मार्केट’ या संघटनेची स्थापना झाली. तिच्या ईस्ट आफ्रिका डेव्हलपमेंट बँकेतर्फे या राष्ट्रांतील उद्योगांस अर्थपुरवठा होतो. देशात देशी परदेशी मिळून ११ बँका आहेत. पूर्वीच्या ईस्ट आफ्रिका चलनाऐवजी १९६६ मध्ये या देशांनी आपापली स्वतंत्र चलने सुरू केली. मुख्य नाणे शिलिंग असून त्याचे १०० सेंट असतात. १, १०, २०, ५० व १०० शिलिंगांच्या नोटा असतात. त्या या तिन्ही देशांत चालतात. २० शिलिंगांचा पौंड फक्त हिशेबासाठी आहे, व्यवहारात नाही. १७·१७ केन्या शि. = १ स्टर्लिंग पौंड असा दर आहे. नैरोबी येथील सेंट्रल बँक ऑफ केन्या ही प्रमुख आहे. द लँड अँड ॲग्रिकल्चरल बँक ऑफ केन्या शेतकऱ्यांना कर्जे देते. आठ खाजगी व्यापारी बँकांपैकी चार यूरोपीय व तीन आशियाई आहेत.

बहुतेक सर्व ब्रिटिश, आफ्रिकी आणि आशियाई विमा कंपन्यांचा व्यवहार केन्यात चालतो. १९६५ मध्ये केन्या नॅशनल ॲश्युअरन्स कंपनी ही २२ केन्यी, ब्रिटिश आणि यूरोपीय विमाकंपन्यांच्या एकत्रीकरणाने अस्तित्वात आली. केन्याचे शासन व लोक त्यांना त्यातील ५१% भाग मिळेल असे जाहीर झाले आहे.

राष्ट्रीय आयच्या सु. ३/४ रकमेइतका वसूल निरनिराळ्या करांच्या रूपाने होतो. १९७०–७४ या काळात देशाची पंचवार्षिक योजना सुरू झाली असून तीनुसार देशाचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या योजना आहेत.

केन्यातील दळणवळणाची व्यवस्था पूर्ण आफ्रिकन सहकारी राज्यसंघातर्फे पाहिली जाते. देशात एकंदर सु. ६,९२६ किमी. लांबीचे लोहमार्ग आहेत. ४१,६०० किमी. लांबीचे रस्ते असून स्वयंचलित वाहनांची संख्या १९६८ मध्ये ७०,६०० होती. मोंबासा हे आधुनिक सोयींनी युक्त बंदर आहे. परदेशी विमानकंपन्यांबरोबरच ईस्ट आफ्रिकन एअरलाइन्सची विमाने देशातील प्रमुख शहरांत व पूर्व आफ्रिका, मध्यपूर्व यूरोप, भारत व पाकिस्तान येथे जातात. मोंबासा, नैरोबी व कीसूमू येथे नभोवाणीकेंद्रे आणि येथून इंग्रजी, स्वाहिली व निरनिराळ्या १२ आफ्रिकन भाषा, अरबी आणि ५ आशियाई भाषांतून, आठवड्यात एकूण ३८२ तास कार्यक्रम प्रसारित होतात. १९६२ मध्ये येथे दूरचित्रवाणी प्रचारात आली. सध्या तेथे सु. १२,००० चे वर दूरचित्रवाणी यंत्रे आहेत.

लोक व समाजजीवन : केन्याची एकूण लोकसंख्या १९६३ मध्ये ८६,२६,१६३ होती. ती १९६९ मध्ये १,०९,४२,७०८ झाली. लोकसंख्या वाढीचे वार्षिक प्रमाण शेकडा २·९ इतके मोठे आहे. तेथील मुळचे लोक अनेक टोळ्यांत विभागलेले आहेत. १९६२ च्या जनगणनेनुसार किकुयू २०%, लुओ १४%, लुह्या १३%, कांबा ११%, किसिई ६.४%, मेरू ५.२%, मिजिकेंडा ५%, किप्सिगी ४%, तुर्काण २·२%, नांदी २%, मसाई १·८% आणि ओग्डेन, तुगेन, एलगेयो इ. १५·४% होते. खेरीज लोकसंख्येत अरब, भारतीय हिंदू, मुस्लिम व गोव्यातील ख्रिश्चन, पाकिस्तानी व यूरोपीय यांचा समावेश होतो. एकूण लोकसंख्येपैकी १,०७,७१,१९२ लोक आफ्रिकी, १,३७,०३७ आशियाई, ४०,५९३ यूरोपीय व २७,८८६ अरब आहेत. आफ्रिकींपैकी सु ६४% टोळीवाले, ३२% ख्रिश्चन व ४% मुस्लिम आहेत. उरलेल्या १,७१,५१६ बिगर आफ्रिकन जनतेत सु. ३४% मुसलमान, ३०% हिंदू (मुख्यतः गुजरातवासीय), २५% ख्रिश्चन (गोवा व यूरोपीय मिळून), ७% शीख व ४% जैन आहेत.

येथे मुख्यतः साथीचे रोग, क्षय, हिवताप, जंत, आमांश, नेत्ररोग व रक्तपिती हे मोठ्या प्रमाणात आढळतात. सरकारतर्फे येथे बरीच रुग्णालये व फिरती आरोग्यकेंद्रे चालवली जातात. १९७० मध्ये येथे १३,१०४ रुग्णखाटा होत्या. कुटुंबनियोजनावर भर दिला जातो. पाच प्रांतिक कुटुंबनियोजन केंद्रे आहेत.

अपंगांना मदत, अनाथ, गरीब व होतकरू लोकांसाठी सोयी, बालगुन्हेगारी, वेश्याव्यवसाय, बालसंगोपन, खेड्यांतील प्रथमोपचार व आरोग्य या बाबी सरकारी पातळीवर अत्यंत सहानुभूतीने हाताळल्या जातात. तसेच मध्यवर्ती सरकारतर्फे आधुनिक व तंत्रबद्ध घरबांधणी योजना हातात घेतल्या जात आहेत.

भाषा व साहित्य : बहुतेक सर्व आफ्रिकन जमातींत, त्यांच्या स्वतंत्र बोलीस स्थान असले, तरी स्वाहिली ही प्रमुख बोलीभाषा असून स्वाहिलीबरोबर इंग्रजीही राज्यकारभाराची भाषा आहे. आशियाई लोकांत गुजराती व पंजाबी याही भाषा बोलल्या जातात.

केन्यात इंग्रजी, गुजराती, स्वाहिली मिळून एकूण ६ दैनिके, २० साप्ताहिके व २४ नियतकालिके प्रसिद्ध होतात. तद्देशीय एकच वार्तासंस्था आहे. केन्यातील प्रसिद्ध ग्रंथालयात व वस्तुसंग्रहालयात, नैरोबी येथील मॅक्मिलन सार्वजनिक वाचनालय व कॉरिंजन वस्तुसंग्रहालय आणि मोंबासा येथील फोर्ट जीझस वस्तुसंग्रहालय ही प्रमुख आहेत. यांशिवाय प्रत्येक जमातीची स्वतंत्र वाचनालये आहेत.

देशात शिक्षण सक्तीचे नाही. परंतु शाळाचालकांना भरघोस मदत दिली जाते. १९७० मध्ये ६,१११ प्राथमिक शाळांतून १३,६०,७५० मुले, त्यांपैकी ५,५१,२४० मुली होत्या. ८०० माध्यमिक शाळांतून १,३४,८५६ मुले होती. त्यांपैकी ३७,६५४ मुली होत्या. नैरोबीच्या केन्या तंत्रनिकेतनमध्ये २,८५८ व मोंबासाच्या तंत्रसंस्थेमध्ये ९८८ विद्यार्थी होते. यांशिवाय इतर तांत्रिक विद्यालयातून ४,२९३ विद्यार्थी होते. ६,७७६ प्राथमिक शिक्षकांना, १,२६८ माध्यमिक शिक्षकांना व १३ बहिऱ्यांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात होते.१० डिसेंबर १९७० रोजी नैरोबी विद्यापीठ स्थापन झाले आहे. १९७० मध्ये या विद्यापीठात १,२२६ व पूर्व आफ्रिकेत व बाहेरदेशी ३,६०५ केन्याचे विद्यार्थी शिकत होते.

कला, क्रीडा : इत्यादी केन्याला ‘प्रवासी लोकांचा स्वर्ग’ म्हणतात. शिकारी व छायाचित्रकारांना विशेष स्वरूपाच्या सवलती दिल्या जातात. प्रवासी व पाहुण्या मंडळींना येथे सरकारी संचार-परवाने काढावे लागतात. सरकारी व खाजगी खास प्रवासी संस्था आहेत. या व्यवसायात १९७० मध्ये ६०,००० लोक होते. १९६१ च्या मानाने या व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न १९६९ मध्ये १२ पटींहून अधिक वाढले. हॉकी, फुटबॉल, क्रिकेट, टेनिस शारीरिक कसरत व कवायती खेळ यांची येथील लोकांना आवड आहे. ऑलिंपिकमध्ये केन्याच्या हॉकी संघाने बराच वरचा क्रम मिळविला आहे.

केन्याची राजधानी नैरोबी व प्रसिद्ध बंदर मोंबासा ही येथील लाखावर लोकसंख्या असलेली शहरे होत. समुद्रसपाटीपासून १,८३० मी. उंच असलेले नाकूरू [लोकसंख्या ४७,८००(१६६९)] हे हवा खाण्याचे औद्योगिक केंद्र असून कीसूमू (३०,७००) हे व्हिक्टोरिया सरोवरावरील बंदर, टीका (१८,१००), एल् डोरेट (१६,९००), न्येरी (१०,९००), किटाले (११,५००), नान्यूकी (११,२००), केरीचो (१०,९००) ही शेतमालाची केंद्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. व्हिक्टोरिया सरोवराचा काही भाग व रूडॉल्फ सरोवर तसेच त्साव्हो, ॲबर्डेअर, मौंट केन्या ही राष्ट्रीय उद्याने प्रवाशांची मोठी आकर्षणे आहेत. नवोदित स्वतंत्र आफ्रिकी राष्ट्रांमध्ये केन्याला महत्त्वाच्या जागेवर नेण्यात जोमो केन्याटा सफल झाले असल्याने केन्याला उज्ज्वल भविष्यकाळ आहे आणि बरेच भारतीय तेथे असल्याने भारताच्या दृष्टीनेही त्याला महत्त्व आहे.

संदर्भ : 1. Ashwith,T. G. The Story of Kenya’s Progress, Nairobi, 1958.

            2. Bolton K. Haramble Country : A Guide to Kenya, London, 1970.

            3. Mboya, T. J. Freedom and After, London, 1963.

परांजपे, श. द.


 गिनी फाउल, केन्या


हत्तींचा कळप : केन्याचे महत्त्वाचे पशुधन.

राजधानी नैरोबीचे एक आधुनिक रूप.

केन्याच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतील एक मतदान केंद्र.

वायव्य केन्यातील सक जमातीचे लोकनृत्य.

उत्तर केन्यातील रेंडिल जमातीची युवती.

हस्तिदंताचे विक्री-केंद्र, मोंबासा.

केन्यातील प्रसिद्ध 'चौदा प्रपात' : एक दृश्य.