छप्रा बिहार राज्याच्या सारन जिल्ह्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ८३,१०१ (१९७१). हे पाटण्याच्या पश्चिमेस सु. ४८ किमी. वर घागरा नदीच्या तीरावर आणि गंगा-घागरा यांच्या संगमाजवळ वसलेले आहे. पूर्वी नदी शहराजवळून वाहत होती पण आता तिचा प्रवाह थोडा दक्षिणेकडे वळलेला दिसतो. प्राचीन काळी दधीची, गौतम, च्यवन इ. ऋषींचे आश्रम याच्या आसमंतात होते असे म्हणतात. येथून जवळच असलेल्या (सु. २४ किमी.) सोनपूर येथे कार्तिकी पोर्णिमेला मोठी यात्रा भरते व ती महिनाभर चालते. याच वेळी येथे गाय, बैल, घोडे, हत्ती, उंट इ. जनावरांचा व काही पक्ष्यांचा बाजार भरतो. याच्या आसमंतात होणाऱ्या सोरा, अफू, जवस, लाख, गूळ यांची ही प्रमुख बाजारपेठ असून भात, गोणपाट, दोरखंड, मीठ, रॉकेल, कापड इ. वस्तू बाहेरून मागवाव्या लागतात.

 मोगल बादशाह बाबर याने १५२९ मध्ये याला भेट दिली तेव्हा हे एक छोटेसेच खेडेगाव होते परंतु अठराव्या शतकात फ्रेंच, डच व इंग्रज यांनी सोरा शुद्धिकरणाचे कारखाने येथे चालू केल्यामुळे याची भरभराट झाली. मात्र नदीच्या पुरांनी व प्लेगच्या साथींनी हे अनेकदा उद्‌ध्वस्तही झाले.

 शहराचे जुना आणि नवा असे दोन भाग पडले असून जुन्या भागात बाजारपेठ आहे, तर नव्या भागात उद्याने, महाविद्यालये, क्रीडांगणे व दिवाणी न्यायालय वगैरे आहेत. येथील महाविद्यालये बिहार विद्यापीठाशी संलग्न आहेत. येथे जर्मन इव्हँजेलिकल, ल्यूथरन आणि रोमन कॅथलिक मिशन्स आहेत.

कापडी, सुलभा