नॉर्थ सी कॅनॉल : पश्चिम नेदर्लंड्सच्या नॉर्थ हॉलंड प्रांतातील एक कालवा. हा आयसल्‌मेर सरोवरावरील ॲम्स्टरडॅमपासून निघून आयमॉइडन येथे उत्तर समुद्राला मिळतो. या कालव्यामुळे नॉर्थ हॉलंड या प्रांताचे द्वीपकल्प, नेदर्लंड्‌सच्या मुख्य भूमीपासून विभागले गेले आहे. याची लांबी २२·५ किमी., खोली १५ मी. व रुंदी २३५ मी. आहे. याच्या आडव्या छेदाचा विचार करता जगातील सर्वांत मोठा कालवा हे याचे वर्णन यथार्थ वाटते. पाच टप्प्यांत खोदकाम करून याची लांबी, रुंदी, खोली साध्य करण्यात आली. नॉर्थ सी कॅनॉल १८६५–७६ दरम्यान एका व्यापारी कंपनीने खोदला व १८८३ मध्ये तो सरकारने घेतला. १९३० मध्ये या कालव्यात जलपाश बांधण्यात आले व नंतर कालव्याची दुरुस्ती व विस्तार करण्यात आला. याच्या जलपाशांची खोली १५·२५ मी., रुंदी ५० मी. व लांबी ३९९ मी. असून, पाण्याची खोली कमीजास्त करण्यासाठी याला विजेवर उघडझाप होणारे १,२०० टनी तीन सरक दरवाजे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे क्वीन एलिझाबेथ, क्वीन मेरी यांसारख्या मोठ्या जहाजांचाही यात संचार होऊ शकतो. या कालव्यामुळे एक व्यापारी बंदर म्हणून ॲम्स्टरडॅमचे बरेच महत्त्व वाढले आहे.

 

ओक, द. ह.