युगांडा : आफ्रिकेच्या पूर्व-मध्य भागातील एक खंडांतर्गत देश. क्षेत्रफळ २,४१,१३९ चौ. किमी. पैकी ४४,०८१ चौ. किमी. अंतर्गत जलाशयांखाली आहे. लोकसंख्या १,२६,३०,०६७ (१९८०). युगांडाच्या उत्तरेस सूदान, पश्चिमेस झाईरे, दक्षिणेस रूआंडा, टांझानिया हे देश व व्हिक्टोरिया सरोवर आणि पूर्वेस केन्या हा देश आहे. विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंस देशाचा विस्तार असून अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ४ ७’ उ. ते १ ३०’ द. व २९३३’ ते ३५ २०’ पू. यांदरम्यान आहे. सरहद्दीची एकूण लांबी २,६७१ किमी. हिंदी महासागरापासून अंतर्गत भागात ८०० किमी. अंतरावर हा देश आहे. ‘युगांडा’ हे नाव ‘बुगांडा’ या व्हिक्टोरिया सरोवरकाठावरील परंपरागत स्वाहिली राज्याच्या नावावरून आले आहे. कांपाला (लोकसंख्या ४,५८,४२३ − १९८०) हे देशाच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : युगांडाचा बहुतांश भाग सरासरी ८०० ते २,००० मी. उंचीच्या पठारी प्रदेशाने व्यापलेला आहे. पश्चिम व पूर्व सरहद्दींदरम्यान पर्वतीय व उच्च भूमीचे प्रदेश आढळतात. पश्चिम सरहद्दीवरील रूवेनझोरी पर्वतातील बर्फाच्छादित मार्गारीटा शिखर (उंची ५,१०९ मी.) व पूर्व सरहद्दीवरील ज्वालामुखी शिखर मौंट एल्गन (उंची ४,३२१ मी.) ही देशातील सर्वाधिक उंचीची शिखरे आहेत. प्राचीन भूगोलज्ञांनी रूवेनझोरी पर्वताचा उल्लेख ‘मौंटन्स ऑफ द मून’ असा केलेला आढळतो. अगदी नैर्ऋत्य भागात झाईरे, रूआंडा यांदरम्यान विरुंगा ही ज्वालामुखी पर्वतरांग आहे. विरुंगा व रूवेनझोरी पर्वतांदरम्यान एडवर्ड व जॉर्ज ही सरोवरे आहेत. देशाच्या ईशान्य कोपऱ्यात ज्वालामुखी पर्वतमाला असून तिच्यातील झूलिआ (उंची २,१४८ मी.), मोरूंगोल (२,७५० मी.), मोरोटो (३,०८३ मी.), कदम (३,०७१ मी.) ही महत्त्वाची शिखरे आहेत. देशाच्या पश्चिम भागात उत्तर-दक्षिण दिशेत आफ्रिकेची प्रचंड खचदरी (ग्रेट आफ्रिकन रिफ्ट व्हॅली) असून, तीत ॲल्बर्ट, एडवर्ड व जॉर्ज ही सरोवरे आहेत. या खचदरीत खोल खंदक निर्माण झाले असून खचदरीची एडवर्ड व जॉर्ज सरोवरांतील खोली ९१० मी., तर ॲल्बर्ट सरोवरात ती ६१० मी. आहे. देशातील मृदा सुपीक असून मृदेमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण अधिक आहे. दक्षिणेपेक्षा उत्तरेकडील मृदा कमी प्रतीची आहे. व्हिक्टोरिया सरोवराच्या वायव्य व पश्चिम किनारी प्रदेशांत पाणबोदाड चिकणमाती आढळते. देशात तांबे व लोह खनिजाचे साठे आहेत. देशातील व्हिक्टोरिया, एडवर्ड, जॉर्ज, ॲल्बर्ट, क्योगा व बिसिना (सॅलिसबरी) या मुख्य सरोवरांना अनुसरून देशातील जलप्रणालींची निर्मिती झालेली असून, मध्य भागातील व्हिक्टोरिया नाईल, उत्तर भागातील आस्वा, दोपेथ (ओकॉक), पॅगर, वायव्य भागातील ॲल्बर्ट नाईल, पश्चिम भागातील काफूए, कटोंगा व एम्‌पोंगो ह्या मुख्य आठ नद्या आहेत. आग्नेय भागात युगांडा, केन्या व टांझानिया या देशांच्या सरहद्दींदरम्यान व्हिक्टोरिया (क्षेत्रफळ ६९,४८४ चौ. किमी.) हे गोड्या पाण्याचे, सुपीरियर (अमेरिका) सरोवरानंतरचे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे व आफ्रिकेतील सर्वांत मोठे सरोवर असून नाईल नदीचे ते मुख्य उगमस्थान आहे. नाईल नदीवर युगांडामध्ये मर्चिसन व ओएन असे दोन धबधबे आहेत. जलविद्युत्निर्मितीच्या दृष्टीने मर्चिसन फॉल्सजवळचा प्रवाह अत्यंत अनुकूल असला, तरी प्रत्यक्षात देशाची जलविद्युत्‌शक्तीची संपूर्ण गरज ओएन फॉल्स धरणापासून भागविली जाते. व्हिक्टोरिया सरोवराच्या उत्तरेकडील प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या कटोंगा सरोवराला, तर कटोंगा सरोवराच्या उत्तरेकडील प्रदेशात उगम पावणाऱ्या नद्या प्रामुख्याने ॲल्बर्ट नाईल नदीला जाऊन मिळतात. नैर्ऋत्य भागातील नद्या एडवर्ड किंवा जॉर्ज सरोवराला जाऊन मिळतात. व्हिक्टोरिया व ॲल्बर्ट नाईल तसेच पर्वतीय प्रदेशातील व खचदरीच्या उतारांवरून वाहणाऱ्या नद्या वगळता बाकीच्या नद्या दलदलीच्या प्रदेशातून अगदी संथगतीने वाहतात. त्यांचे प्रवाहमार्गही स्पष्टपणे ओळखता येत नाहीत. बऱ्याचशा नद्या केवळ आर्द्र ऋतूत वाहणाऱ्या हंगामी स्वरूपाच्या आहेत.

हवामान : देशाच्या दक्षिण भागातून विषुववृत्त जाते. विषुववृत्तीय स्थानामुळे देशाचे हवामान उष्णकटिबंधीय प्रकारात मोडते. तथापि देशाच्या हवामानावर अक्षांशापेक्षा प्रदेशाची समुद्रसपाटीपासूनची उंची आणि जलाशयांचे सान्निध्य यांचा अधिक परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे येथे उष्ण हवामानाऐवजी सौम्य व उबदार हवामान आढळते. विषुववृत्ताला जवळ असूनही रूवेनझोरी पर्वतातील शिखरे बर्फाच्छादित असलेली आढळतात. वर्षभर हवामान सम असून इतर विषुववृत्तीय प्रदेशांप्रमाणेच आकाश मेघाच्छादित असते. तपमानकक्षा कमी असते. उंचीनुसार तपमानात फरक आढळतो. वार्षिक सरासरी कमाल व किमान तपमान अनुक्रमे २९ से. व १६ से. असते. देशात सर्वत्र पुरेशा प्रमाणात पर्जन्यवृष्टी होते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०० सेंमी. आहे. व्हिक्टोरिया सरोवराच्या उत्तर किनारी भागात १६२ सेंमी., तर देशाच्या ईशान्य भागात ६९ सेंमी. पाऊस पडतो. दक्षिण भागात एप्रिल-मे व ऑक्टोबर-नोव्हेंबर असे दोन आर्द्र ऋतू असतात. त्यांदरम्यान कोरड्या ऋतूच्या काळात येथे उष्णकटिबंधीय झंझावात निर्माण होतात. उत्तर भागात मात्र एप्रिल ते ऑक्टोबर आर्द्र व नोव्हेंबर ते मार्च कोरडा ऋतू असतो. पुरेशा पर्जन्यामुळे दुष्काळापेक्षा धूप कशी आटोक्यात आणावणाची, ही देशापुढील गंभीर समस्या आहे. मध्यान्हीच्या सूर्याच्या उंचीत फारशी तफावत आढळत नाही. तसेच दिनमान जवळजवळ १२ तासांचेच असते.

वनस्पती व प्राणी : देशात सॅव्हाना प्रकारच्या वनस्पतींचे प्रमाण अधिक आहे. मध्य व उत्तर भागांत सॅव्हाना अरण्ये व पार्कलँड प्रकारचे गवताळ प्रदेश, दक्षिण भागात बाभूळ वनस्पतीचे प्रमाण अधिक असून त्यात अधूनमधून कँडेलाब्रा, युफोर्बिया वनस्पती तसेच ठिकठिकाणी घनदाट अरण्यांचे पट्टे आणि गवताळ प्रदेश आढळतात. खचदरीच्या भागातही दक्षिण भागाप्रमाणेच वनस्पती आढळतात. ईशान्य भाग हा देशातील सर्वांत कोरडा भाग असून तेथील व उत्तरेकडील कोरड्या प्रदेशात स्टेप प्रकारचे गवत व वनस्पती दिसतात. व्हिक्टोरिया सरोवराचा परिसर आणि पश्चिमेकडील उच्च भूमीच्या प्रदेशात उंच गजराज गवत व प्राचीन घनदाट अरण्यांचे अवशेष पहावयास मिळतात. पश्चिम भागात कठीण लाकडाच्या वनस्पतींच्या अरण्यांचे पट्टे आहेत. देशाचा १४,५०४ चौ. किमी. क्षेत्रफळाचा प्रदेश पपायरसयुक्त व हंगामी गवतयुक्त दलदलीच्या प्रदेशांनी व्यापलेला आहे. मौंट एल्गन व रूवेनझोरी पर्वतरांगांमधील १,८२८ मी. पेक्षा अधिक उंचीच्या भागातील अरण्यांत बांबूची वने मिसळलेली दिसतात. अलीकडे देशाच्या दक्षिण भागातील जंगलांची जागा कृषिपिकांनी घेतली असून, त्यांत केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर केलेली आहे. नैर्ऋत्य भागातही लागवडीखालील क्षेत्र अधिक आहे.

देशात जवळजवळ ४० प्रकारचे वन्य पशू व सस्तन वर्गातील सु. १५ प्रकारचे प्राणी आहेत. नैर्ऋत्य भागात चिंपँझी, गोरिला, लहान हत्ती, तर ईशान्य भागात ईलँड, कुरंग, सिंह, चित्ता इ. प्राणी आहेत. यांशिवाय देशात ऑरबी, ऑरिंक्स, हार्डबीस्ट, एलंड, बुशबक, टोपी इ. जातींची हरणे, तसेच जिराफ, युगांडा कॉब इ. प्राणी पुष्कळ आहेत. काबारेगा किंवा मर्चिसन फॉल्स (क्षेत्रफळ ३,८८५ चौ. किमी.), रूवेनझोरी किंवा क्वीन एलिझाबेथ (१,९६८ चौ. किमी.) व किडेपो (१,२९५ चौ. किमी.) ही देशातील विस्तीर्ण अशी शिकारीची तीन राष्ट्रीय उद्याने असून त्यांत पाणघोडा, कुरंग, मगरी, सुसरी, हत्ती, झेब्रा, हरिण, गेंडा इ. प्राणी आहेत. नैर्ऋत्य भागात गोरिला अभयारण्य आहे. गेल्या ५० वर्षांत देशातील प्राण्यांची संख्या ७५% नी कमी झाली आहे. नद्यांत व सरोवरांमध्ये टिलापिया, नाईल पर्च, कॅटफिश, लंगफिश, एलिफन्ट स्नाउट फिश इ. मासे सापडतात. मगरी व सुसरी नाईलच्या खोऱ्यात अधिक आढळतात.

पक्ष्यांमध्ये राष्ट्रचिन्हावर चित्र असलेला तुराधारी क्रेन पक्षी, बुलबुल, बीव्हर, कावळा, खाटीक पक्षी, बक, ईग्रेट, आयबिस, गिनी फाउल, माउस बर्ड, लूरी, हॉर्नबिल, कबूतर, डार्टर, लिली-ट्रॉटर, माराबौ स्टॉर्क, किंगफिशर, फिश ईगल व काइट या पक्ष्यांची संख्या खूप आहे.


इतिहास व राजकीय स्थिती : युगांडाच्या प्राचीन इतिहासाची सुस्पष्ट अशी माहिती उपलब्ध नसली, तरी पुरातत्त्वीय अवशेषांवरून पूर्वी येथे पुराणाश्म व नवाश्मयुगीन या संस्कृती असल्याचे दिसते. ११०० च्या सुमारास पश्चिमेकडून बांतू भाषिक लोकांनी नैर्ऋत्य युगांडात स्थलांतर केले. सांप्रतच्या नैर्ऋत्य इथिओपियातील हिमा (टट्‌सी) स्थलांतरितांनी स्थापन केलेल्या वेगवेगळ्या राज्यांत (क्वेझी राज्ये) हे बांतू भाषिक संघटित झाले. १५०० च्या सुमारास सांप्रतच्या आग्नेय सूदानमधील नाइलॉटीक भाषिक लुओ लोकांनी क्वेझी राज्ये जिंकून बुगांडा, बुन्योरो व अंकोली राज्यांची स्थापना केली. काही बांतू भाषांमध्ये बुगांडातील सुरुवातीचे अक्षर ‘बु’ म्हणजे ‘राज्य’ व बुगांडा म्हणजे गांडा लोकांचे राज्य असा अर्थ आहे. सोळाव्या शतकात लुओ-भाषिकांनी उत्तर युगांडा जिंकले. उत्तरेकडील लोकांनी नाइलॉटीक भाषा अवगत केली. दक्षिण भागात मात्र बांतू भाषेचाच प्रभाव कायम राहिला. सतराव्या शतकात लांगो व टेसो लोकांनी युगांडात स्थलांतर केले. सोळाव्या व सतराव्या शतकांत बुन्योरो हे दक्षिण युगांडातील प्रभावी राज्य होते. त्याचे सांप्रतच्या रूआंडा व टांझानियातील प्रदेशांवरही नियंत्रण होते. सुमारे १७०० पासून बुगांडाच्या राज्यविस्तारास सुरुवात होऊन सु. १८०० च्या सुमारास व्हिक्टोरिया नाईल नदीपासून कागेरा नदीपर्यंतच्या प्रदेशावर ताबा मिळविला. त्यामुळे बुगांडा हे एक प्रभावी राज्य बनले. राज्याची सर्व सत्ता बुगांडाच्या राजाच्या किंवा सुलतानाच्या (कबाक) हातात असे. १८४० मध्ये हिंदी महासागरकिनाऱ्याकडून मुस्लिम व्यापारी युगांडात येऊन पोहोचले. १८६९ मध्ये बुन्योरो राज्याने बुगांडाच्या वर्चस्वाला आव्हान दिले. १८८० मध्ये बुगांडा पुन्हा प्रभावशाली राज्य बनले. १८६२ मध्ये ब्रिटिश समन्वेषक जॉन हॅनिंग स्पीक ही नाईल नदीचे उगमस्थान निश्चित करण्याच्या उद्देशाने येथे आला. बुगांडात येणारा हाच पहिला यूरोपियन होय. येथे तो पहिला मुटेसा याला भेटला. स्पीकनंतर सर सॅम्युएल बेकर उत्तरेकडून युगांडात आला. बेकरनेच येथील एका सरोवराला ॲल्बर्ट हे नाव दिले. १८७२-७३ मध्ये बेकर पुन्हा ईजिप्शियन शासनाचा प्रतिनिधी म्हणून युगांडात आला होता. १८७५ मध्ये हेन्ऱी एम्‌. स्टॅन्ली बुगांडात आला. ईजिप्तकडून होणाऱ्या हल्ल्याला शह देण्याच्या उद्देशाने स्टॅन्लीला आपल्या राज्यात ख्रिश्चन मिशनच्या स्थापनेस सुलतानाने अनुमती दिली. १८७७ मध्ये ब्रिटिश ‘प्रॉटेस्टंट चर्च मिशनरी सोसायटी’चे सदस्य व १८७९ मध्ये ‘फ्रेंच रोमन कॅथलिक व्हाइट फादर्स’चे प्रतिनिधी येथे आले. या प्रत्येक मिशनने धर्मांतरितांचा आपापला गट तयार केला. १८८० मध्ये या गटांमध्ये परस्पर तंटे सुरू झाले. त्याच सुमारास गांडा लोकांच्या इस्लाम धर्मातील प्रवेशाचे प्रमाण वाढले. १८८४ मध्ये मुटेसाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा म्वांगा अधिकारावर आला. त्याने ख्रिश्चन लोकांच्या छळास सुरुवात केली. १८८५ मध्ये पूर्वेकडून बुगांडात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिशप जेम्स हॅनिंग्टन या अँग्लिकन व्यक्तीला ठार मारण्यात आले. तसेच १८८६ मध्ये अनेक गांडा ख्रिश्चनांचे खून करण्यात आले. १८८८ मध्ये ख्रिश्चन व मुस्लिमांनी म्वांगाला पदच्युत केले व त्याठिकाणी त्याचा भाऊ किवेवा याला अधिकारावर आणले. त्यानंतर एका महिन्यातच मुस्लिमांनी किवेवाच्या पदावर त्याचा दुसरा भाऊ कालेमा याला नेमले. १८८९ मध्ये गांडा ख्रिश्चन आणि ब्रिटिश व्यापारी चार्ल्स स्टोक्स यांच्या मदतीने म्वांगा पुन्हा आपल्या अधिकारपदावर आला. याच वर्षी म्वांगाची जर्मन वसाहतकार कार्ल पीटर्स याने भेट घेतली. त्यानंतर बुगांडा−जर्मनी यांच्यातील मैत्रीकरारावर सह्या झाल्या. जर्मनीच्या येथील वाढत्या प्रभावाची ग्रेट ब्रिटनला धास्ती वाटू लागली. तीतूनच जर्मन−ग्रेट ब्रिटन यांच्यात येथील हक्कांबाबत एक करार होऊन ‘इंपीरियल ब्रिटिश ईस्ट आफ्रिका कंपनी’चे (आयबीईए) येथे कार्य सुरू झाले. १८९४ मध्ये ग्रेट ब्रिटनने अधिकृतपणे युगांडा हे आपले संरक्षित राज्य बनविले. सुरुवातीला ब्रिटिश अधिकारी बुगांडातूनच युगांडाचा कारभार करीत असत. परंतु ब्रिटिशांच्या वाढत्या प्रभावाला म्वांगाने विरोध करण्यास सुरुवात केली तेव्हा ब्रिटिशांनी त्याला पदच्युत करून त्या जागी त्याचा अज्ञान मुलगा दाऊदी च्वा याला नेमले. १८९० ते १९१८ या कालावधीत वेगवेगळे करार करून किंवा आवश्यक तेथे बळाचा वापर करून युगांडाच्या बाकीच्या प्रदेशात ब्रिटिशांनी आपला राज्यविस्तार केला. १९०० मध्ये बुगांडाशी झालेल्या करारानुसार बुगांडा राज्याला काही बाबतींत स्वायत्तता देण्यात आली. १९०२ मध्ये प्रशासनाच्या कारणावरून युगांडाच्या पूर्वेकडील प्रांत ‘ब्रिटिश ईस्ट आफ्रिका प्रोटेक्टोरेट’ (केन्या) कडे हस्तांतरित करण्यात आला. १९२० ते १९३० या काळात ब्रिटिशांनी बुगांडाच्या स्वातंत्र्यावर वेगवेगळ्या मार्गांनी अधिक निर्बंध घातले. दरम्यानच्या काळात भारतीय आणि इतर आशियाई लोकांनी येथे स्थायिक होऊन व्यापारास सुरुवात केली. १९२१ मध्ये संरक्षित प्रदेशासाठी विधान परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यांनी पहिला आफ्रिकन कृष्णवर्णी सभासद १९४५ मध्ये करून घेतला. अन्यथा १९५० पर्यंत त्यात आफ्रिकन सभासद नव्हता. १९५० मध्ये काही ठराविक जागा आफ्रिकनांसाठी राखून ठेवण्यात आल्या. ब्रिटिश सत्तेशी योग्य सहकार्य न केल्याबद्दल दुसरा मुटेसा याला १९५३ मध्ये हद्दपार करण्यात आले. १९५५ मध्ये त्याला देशात पुन्हा प्रवेश देण्यात आला तथापि बुगांडा व युगांडाचा उर्वरित प्रदेश यांच्यामधील दरी तशीच कायम राहिली. नंतरच्या काळात ग्रेट ब्रिटनने युगांडाला स्वातंत्र्य देण्याचे ठरविले तेव्हा बुगांडाने आपल्या स्वतंत्र स्वायत्त राज्याची मागणी केली. १९६१ मध्ये देशात अ-गांडा लोकांचे आधिक्य असलेला युगांडा पीपल्स काँग्रेस (यूपीसी), रोमन कॅथलिक गांडा लोकांचे आधिक्य असलेला डेमॉक्रॅटिक पक्ष व केवळ गांडा लोकांचा कबाक येक्का पक्ष असे तीन राजकीय पक्ष होते. ९ ऑक्टोबर १९६२ रोजी युगांडा स्वतंत्र होऊन यूपीसी पक्षाचा नेता मिल्टन ओबोटे हा पंतप्रधान बनला. त्यावेळी बुगांडाला पुरेशी स्वायत्तता देण्यात आली. १९६३ मध्ये युगांडा प्रजासत्ताकाची स्थापना होऊन बुगांडाचा राजा दुसरा मुटेसा याची पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. स्वतंत्र युगांडाच्या सुरुवातीच्या काळात मध्यवर्ती शासन व बुगांडा यांच्यात बरेच तंटे झाले. १९६६ मध्ये ओबोटे शासनाने नवीन राज्यघटना स्वीकारली. तीनुसार बुगांडाची स्वायत्तता संपुष्टात आणून तेथे केंद्र शासनाची सत्ता आणली. युगांडाच्या लष्कराने राजाचा वाडा ताब्यात घेतला, तेव्हा तो देशाबाहेर पळून गेला. त्यामुळे गांडा लोकांचा तीव्र प्रतिकार संपुष्टात आला. १९६७ मध्ये नवे संविधान अंमलात आले. २५ जानेवारी १९७१ रोजी ओबोटे परदेशात असताना मेजर जनरल ईदी अमीन यांनी लष्करी कारवाई करून ओबोटे यांना काढून टाकले. १७ मार्च १९७१ रोजी दुसऱ्या युगांडा प्रजासत्ताकाची स्थापना करून राष्ट्राध्यक्षपद अमीन यांनी स्वतःकडे घेतले. सुरुवातीला ओबोटे यांना सहानुभूती असणाऱ्या लष्करातील अधिकारी व सैन्याकडून अमीनला विरोध झाला, तरी अल्पावधीतच अमीनने लष्करावर व देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली. गांडा लोकांशी त्याने चांगले संबंध ठेवले. ऑगस्ट १९७२ मध्ये ‘आर्थिक युद्धा’ची घोषणा करून अमीन राजवटीने युगांडाचे नागरिक नसलेल्या सर्व आशियाई लोकांना देश सोडून जाण्याचा आदेश दिला. त्यामुळे तीन महिन्यांच्या कालावधीत सु. ६०,००० लोक देश सोडून गेले. १९७१ ते १९७३ या काळात युगांडाचे टांझानियाशी सरहद्दीबाबत अनेकदा तंटे झाले. १९७६ मध्ये अमीनने केन्याच्या पश्चिमेकडील विस्तृत प्रदेशावर आपल्या देशाचा हक्क सांगितला. १९७८ मध्ये टांझानियाच्या फौजांनी युगांडावर यशस्वी हल्ला चढविला. कांपाला शहर जिंकले. युगांडाचा पराभव होत असल्याचे दिसताच स्वतः अमीनने लिबियाकडे पलायन केले. एप्रिल १९७९ मध्ये तात्पुरत्या शासनाची स्थापना करून युसूफ लुले यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. लुले यांच्यानंतर गॉडफ्री बिनाइसा हे राष्ट्राध्यक्ष झाले. १९८० मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक काँझर्न्व्हेटिव्ह पार्टी (सीपी), डेमॉक्रॅटिक पार्टी (डीपी), नॅशनल लिबरल पार्टी व युगांडा पीपल्स काँग्रेस (यूपीसी) या प्रमुख चार पक्षांनी लढविली. तीत युगांडा पीपल्स काँग्रेस पक्षाने बहुमत मिळविले व अपोलो मिल्टन ओबोटे पुन्हा राष्ट्राध्यक्ष बनले. अमीन राजवटीत सर्व राजकीय पक्षांवर बंदी घालण्यात आली होती.

युगांडाच्या राज्यसभेत १३६ सभासद असतात. त्यांपैकी १२६ सार्वत्रिक प्रौढ मतदानाने निवडलेले व १० लष्करी प्रतिनिधी म्हणून नामनिर्देशित केलेले असून वैधानिक अधिकार राज्यसभेकडे असतात. राष्ट्राध्यक्ष बहुमतातील पक्षाचा असतो.

युगांडाच्या उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश व १५ कनिष्ठ न्यायाधीश असतात. दुय्यम न्यायालयात मुख्य दंडाधिकारी न्यायालय तसेच प्रथम वर्ग, द्वितीय वर्ग आणि तृतीय वर्ग दंडाधिकारी न्यायालये असून ती देशाच्या सर्व भागांत आहेत. कोर्ट ऑफ अपील या न्यायालयात उच्च न्यायालयाकडून आलेल्या खटल्यांवर कामकाज चालते. १९८२ ते १९८४ या काळात युगांडात राष्ट्रकुल लष्करी प्रशिक्षण संघाकडून लष्करी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येऊन त्यात सु. ४,००० अधिकारी व इतरांना प्रशिक्षण देण्यात आले. ग्रेट ब्रिटनकडूनही युगांडात असे प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत आहे. युगांडाचे साहाय्य बल १८,००० सैनिकांचे असून पोलीस बलाची संख्या ३,००० आहे (१९८४).


आर्थिक स्थिती : युगांडाची अर्थव्यवस्था कृषिप्रधान असून, सु. ९०% लोकसंख्या शेतीव्यवसायात गुंतलेली आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादन व एकूण निर्यात उत्पन्न यांमधील शेतमालाचा वाट अनुक्रमे ४६% व ६०% वर असतो. देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २९% क्षेत्र शेतीखाली आहे (१९८०). येथे निर्वाह शेती असून एकूण लागवडीखालील जमिनीपैकी ७०% जमिनीत स्थानिक उपभोगाची अन्नधान्यउत्पादने घेतली जातात. केळी, टॅपिओका, नाचणी, रताळी ही येथील प्रमुख खाद्यपिके व कॉफी, ऊस, तंबाखू, चहा, कापूस ही व्यापारी पिके आहेत. कॉफी हे प्रमुख व्यापारी पीक असून निर्यात उत्पन्नात कॉफीचा वाटा सर्वाधिक (सु. ९०%) असतो. रोवस्टा व अरेबिका अशा दोन्ही प्रकारच्या कॉफीचे उत्पादन घेतले जाते. १९८२ मध्ये पुढीलप्रमाणे कृषिउत्पादने झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : केळी ३,३८० टॅपिओका १,४२५ रताळी ६९० बटाटे १९६ बारीक तृणधान्ये ५२८ मका २९३ ज्वारी ४०० द्विदल धान्ये ३६१ भुईमूग ९० गहू ९ तांदूळ १८ कॉफी १५५ ऊस ७०० रूईचा कापूस १८ तंबाखू ४ चहा १४. १९८२ मध्ये कापूस व चहा उत्पादनात दुपटीने, तर कॉफी उत्पादनात ५०%नी वाढ झाली. त्से त्से माशीच्या प्रादुर्भावामुळे पशुपालन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. १९८२ मध्ये देशातील पशुधन पुढीलप्रमाणे होते (संख्या हजारांमध्ये) : गुरे ५,००० मेंढ्या १,०७८ शेळ्या २,१६५ डुकरे २६० गाढवे १६ व कोंबड्या १३,४००. १९८१ मध्ये पुढीलप्रमाणे पशुधन उत्पादने झाली (उत्पादन हजार मे. टनांमध्ये) : गाई-गुरांचे मांस ८३ शेळ्या, मेंढ्या, डुकरे, कोंबड्या इत्यादींचे मांस ६२ गाईचे दूध ३५० कोंबड्यांची अंडी १२ व गुरांची कातडी ११·६. व्हिक्टोरिया, ॲल्बर्ट, जॉर्ज, क्योगा ही सरोवरे व नाईल नदी ही प्रमुख मस्त्यक्षेत्रे असून तेथे व्यापारी तत्त्वावर मासेमारी केली जाते. मासेमारी व त्यांचा व्यापार यांत देशातील बरेच लोक गुंतलेले आहेत. १९८१ मध्ये १,६६,६०० मे. टन मासे पकडण्यात आले. सोरोटी येथील बर्फनिर्मिती कारखान्याचा मासेमारी व्यवसायाला चांगला फायदा झाला आहे. बरेचसे मासे स्थानिक उपयोगासाठी वापरले जातात. वाळविलेले मासे झाईरेला, तर गोठविलेले मासे केन्याला पाठविले जातात. देशातील १५,००,००० हेक्टर क्षेत्र अरण्यांखाली असून १९८२ मध्ये लाकडाचे एकूण उत्पादन २,५४,४१,००० घ. मी. झाले. ९२% लाकूड इंधन म्हणून वापरले जाते. देशात खनिज संपत्तीचा अभाव आहे. केवळ तांब्याचे उत्पादनच महत्त्वाचे असून तेही घटत गेल्याचे दिसते. कीलेंबे हे तांबे उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे. तांब्याचे १९६४ मध्ये असलेले १८,००० टन उत्पादन १९७९ मध्ये ४०० टनांपर्यंत खाली आले. याशिवाय कथिल, टंगस्टन, फॉस्फेट, वैदूर्य, चुनखडक, सोने, बिस्मथ यांचे थोडेबहुत उत्पादन घेतले जाते.

देशात खनिज तेलाचे साठे नसल्यामुळे खनिज तेल उत्पादनांची गरज आयातीमधून भागविली जाते. जलविद्युत्‌शक्ती मात्र मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ती शेजारच्या देशांना निर्यातही केली जाते. बहुतेक वीज ‘जींजा’च्या वायव्येस व्हिक्टोरिया नदीवर असलेल्या १,५०,००० किवॉ. ता. क्षमतेच्या ओएन फॉल्स जलविद्युत्‌ प्रकल्पापासून निर्माण केली जाते. याशिवाय कगेरा नदीवरील माझीबा गॉर्ज व किरूरूमा नदीवरील कीकागाटी येथे जलविद्युत्‌निर्मिती प्रकल्प आहेत. १९८० मध्ये एकूण ६,३७० लक्ष किवॉ. ता. विद्युत्‌निर्मिती करण्यात आली होती.

देशात कापूस, कॉफी, चहा, तंबाखू, ऊस इ. कृषिउत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांचे आधिक्य असून, ते संबंधित कृषिउत्पादक क्षेत्रांत स्थापन झालेले आहेत. १९५९ ते १९६८ या काळात देशाचा औद्योगिक विकास अत्यंत द्रुतगतीने झाला. तथापि राष्ट्राध्यक्ष अमीन यांच्या राजवटीने परकीयांच्या ताब्यातील शेतजमिनी, साखर, चहा, कॉफी व कापूस उद्योग वसाहती यांचे कसल्याही प्रकारची भरपाई न देता राष्ट्रीयीकरण केले. व्यापारात बहुसंख्येने असणाऱ्या आशियाईंच्या संपत्तीचे सैनिकांत व लष्करी पोलीसांमध्ये वितरण करण्यात आले. बहुतेक आशियाई कुशल कामगार देश सोडून गेल्याने कुशल संघटक, प्रवर्तक व परकीय आर्थिक मदतीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे देशाच्या आर्थिक व औद्योगिक विकासावर अत्यंत गंभीर परिणाम झाले. १९७३ मध्ये औद्योगिक उत्पादनांत कमालीची घट झाली. त्यानंतरही ही घट खूपच वेगाने वाढत गेली. १९७९ नंतर मात्र या धोरणात बदल करून परकीय कंपन्यांना युगांडामध्ये शेती आणि उद्योगधंद्यांतील गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याचे व काही ठराविक उद्योगधंदे खाजगी क्षेत्रात चालविण्यास देण्याचे धोरण अवलंबिले गेले. आशियाई प्रवर्तकांना पुन्हा युगांडात येण्याचे आवाहन करण्यात आले. साखरनिर्मिती व चहा प्रक्रिया उद्योग आशियाई आणि ग्रेट ब्रिटनच्या उद्योजकांना संयुक्त जोखीम अटीवर चालविण्यास दिले आहेत. १९८१ मध्ये कच्चा माल व सुट्या भागांची आयात, जुनी व मोडकळीस आलेली यंत्रे बदलण्यासाठी भांडवली साहित्याची आयात इत्यादींसाठी विदेशी चलनाचा खूपच तुटवडा भासला. १९८१ मध्ये दहा किंवा त्यापेक्षा अधिक कामगार असलेल्या ४६४ कारखान्यांपैकी केवळ २८७ कारखाने सुरू होते. १९७१ मध्ये कारखान्यांची संख्या ९७० होती. १९८१ मध्ये काही महत्त्वाची औद्योगिक उत्पादने पुढीलप्रमाणे झाली : कच्ची साखर ४,००० मे. टन बीर ७,००० हेक्टोलिटर सिगारेट २,०५० लक्ष नग पाइपची तंबाखू १२ मे. टन (१९८०). सुती कापड १९० लक्ष चौ. मीटर, साबण ४०० मे. टन (१९८०), सिमेंट ८,००० मे. टन, स्पिरिट ३४,००० मे. टन (१९८०). जींजा, टोरोरो, कांपाला ही उद्योगधंद्यांची मुख्य केंद्रे आहेत. जींजा हे जड उद्योगांसाठी महत्त्वाचे आहे. कांपालाच्या जवळच एन्‌टिडा येथे पश्चिम जर्मनीच्या सहकार्याने मोटारनिर्मितीचा कारखाना सुरू करण्यात आला आहे (१९८३). १९७१ पूर्वी बहुतांश उद्योगधंद्यांना ‘युगांडा विकास महामंडळा’ तर्फे (स्था. १९५२) शासन अर्थसाहाय्य करीत असे.

व्यापार, वाणिज्य व अर्थ : कांपाला हे देशातील प्रमुख व्यापारी केंद्र असून नैरोबी (केन्या) येथे बरीच प्रधान वा प्रादेशिक कार्यालये आहेत. १९६७ च्या व्यापार परवाना कायद्यानुसार युगांडाबाहेरील व्यापाऱ्यांना १९७० पासून विशिष्ट प्रदेशातच व्यापारास परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच मोटारवाहने (प्रत्यक्ष आयातीची वगळता), बीर, तंबाखू, विविध अन्नपदार्थ इ. विशिष्ट वस्तूंच्या व्यापारास फक्त युगांडातील (एतद्देशीय) लोकांनाच परवानगी आहे. युगांडाबाहेरील व्यापाऱ्यांत आशियाईंचे प्रमाण अधिक होते. तथापि अमीन राजवटीत ते देश सोडून गेले वा शासनाने त्यांना देशाबाहेर घालविले (१९७२). परिणामतः अमीन राजवटीत उपभोग्य वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला. बऱ्याचशा वस्तू किरकोळ दुकानांत उपलब्ध नसत, तर त्या केवळ काळ्या बाजारातच मिळत. युगांडाचा व्यापारशेष साधारणतः अनुकूल असलेला दिसतो. १९८० व १९८१ मध्ये मात्र व्यापार बराच तुटीचा झाला. अलीकडील काळात मुख्य निर्यात कॉफीची होत असून तीपासूनच जास्तीतजास्त परकीय चलन उपलब्ध होते. कॉफीशिवाय कापूस, तांबे, चहा, कातडी इत्यादींची निर्यात केली जाते. कागद व कागद उत्पादने, कापड, लोखंड व पोलाद, इतर धातू व धातू उत्पादने, खनिज तेल उत्पादने, रसायने, धान्य, यंत्रे, कृषी अवजारे, वाहतुकीची साधने यांची युगांडा आयात करतो. १९७९ मध्ये ३,२७९.३ द. ल. युगांडा शिलिंग किंमतीची निर्यात व २,४०५.७ द. ल. युगांडा शिलिंग किंमतीची आयात करण्यात आली. १९८० मध्ये मात्र निर्यात २,५८२ द. ल. शिलिंगपर्यंत कमी झाली व आयात ३,७३९.२ द. ल. शिलिंगपर्यंत वाढली. युगांडाचा प्रामुख्याने केन्या, अमेरिकेची संयुक्त संस्थाने, ग्रेट ब्रिटन, प. जर्मनी व फ्रान्स या देशांशी व्यापार चालतो.


‘बँक ऑफ युगांडा’ (स्था. १९६९) ही देशाची मध्यवर्ती बँक व ‘युगांडा कमर्शिअल बँक’ (स्था. १९६५) ही शासकीय बँक आहे. ‘द को-ऑपरेटिव्ह बँक लि.’ व ‘युगांडा डेव्हलपमेंट बँक’ या बँकाही शासनाच्या मालकीच्या आहेत. ‘ईस्ट आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक’ (स्था. १९६७) ही बँक केन्या, युगांडा व टांझानिया या देशांच्या औद्योगिक विकासासाठी आर्थिक व तांत्रिक साहाय्य करते. या तिन्ही देशांचे बँकेत प्रत्येकी ३०·८% समभाग असून उरलेले ७·६% भाग इतर बँकांचे आहेत. याशिवाय बँक ऑफ बरोडा, बर्कलेज बँक ऑफ युगांडा, ग्रिंडलेज बँक इंटरनॅशनल, ग्रिंडलेज बँक (युगांडा), स्टँडर्ड चार्टर्ड बँक युगांडा, लिबियन अरब युगांडा बँक फॉर फॉरिन ट्रेड ॲन्ड डेव्हलपमेंट या परदेशी बँका युगांडामध्ये आहेत. रोखेबाजार मात्र येथे नाही. ईस्ट आफ्रिका जनरल इन्शुअरन्स कं. लि., नॅशनल इन्शुअरन्स कॉर्पोरेशन ऑफ युगांडा (स्था. १९६४) व युगांडा अमेरिकन इन्शुअरन्स कं. लि. (स्था. १९७०) या कंपन्या देशात विमा व्यवसाय करतात.

युगांडा शिलिंग हे देशाचे अधिकृत चलन असून १०० सेंटचा एक युगांडा शिलिंग होतो. ५, १०, २०, १००, ५०० व १,००० शिलिंगच्या नोटा असतात. १ स्टर्लिंग पौंड = ६०२.७ युगांडा शिलिंग, १ अमेरिकी डॉलर = ५२० युगांडा शिलिंग किंवा १,००० युगांडा शिलिंग = १·६५९ स्टर्लिंग पौंड = १·९२३ डॉलर असा विनिमय दर होता (३१ डिसेंबर १९८४).

देशात १ जुलै ते ३० जून असे आर्थिक वर्ष असते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या करांचे प्रमाण अधिक आहे. कॉफी व कापसावरील निर्यात कर, आयात कर, आयकर, नफ्यावरील कर, अबकारी कर, विक्रीकर हे देशाच्या उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आहेत. १९८२-८३ चे अंदाजपत्रक ५६,३७० द. ल. युगांडा शिलिंग उत्पन्नाचे व ५९,७०० द. ल. युगांडा शिलिंग खर्चाचे होते. १९८१-८२ चा विकास खर्च अंदाजे १९,६१६ द. ल. युगांडा शिलिंग होता. वैयक्तिक आयकर किमान १०% व कमाल ६०% आहे. वार्षिक २०,००० युगांडा शिलिंगपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना आयकर भरावा लागत नाही. सर्व नागरी सेवक व अध्यापक यांना आयकरातून वगळण्यात आले आहे.

वाहतूक व संदेशवहन : युगांडा हा खंडांतर्गत देश असल्यामुळे त्यास सागरी वाहतुकीसाठी केन्या व टांझानियावर अवलंबून रहावे लागते. १९७७ मध्ये ‘ईस्ट आफ्रिका कम्यूनिटी’चे कामकाज बंद झाल्यामुळे केन्या व टांझानियातील लोहमार्ग व बंदरे वापरण्याचा हक्क संपुष्टात येऊन विमाने, रेल्वेची एंजिने, डबे वगैरे साहित्याच्या मालकीलाही मुकावे लागले. तसेच १९७८-७९ च्या युद्धात अंतर्गत वाहतुकीची नासधूस व लूट झाली. त्यानंतर ‘युगांडा रेल्वेज कॉर्पोरेशन’ची स्थापना करण्यात आली. देशात १,२८६ किमी. लांबीचे लोहमार्ग होते (१९८२). देशाच्या पूर्व भागातील टोरोरोपासून जींजा, कांपालामार्गे पश्चिमेकडील तांब्याच्या खाणीक्षेत्रातील कीलेंबेपर्यंत बांधण्यात आलेला हा देशातील प्रमुख लोहमार्ग आहे. टोरोरो ते वायव्येकडील पक्वाच यांदरम्यान एक लोहमार्ग असून, दुसरा लोहमार्ग टोरोरोपासून केन्या देशातील हिंदी महासागर किनाऱ्यावरील मोंबासापर्यंत काढण्यात आला आहे. देशातील रस्त्यांची एकूण लांबी २७,३२५ किमी. असून त्यांपैकी ७,७४० किमी. लांबीचे मुख्य रस्ते आहेत. सरोवरांमधून तर किंवा बोटी यांद्वारे जलवाहतूक चालते. युगांडा शासनाने व्हिक्टोरिया सरोवरातून टांझानियाशी फेरी वाहतूक सुरू केलेली आहे. कांपालापासून ४० किमी. व्हिक्टोरिया सरोवराच्या काठावरील एंटेबे येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. युगांडा एअर लाइन्सकडून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुरविली जाते. नभोवाणी कार्यक्रमांचे प्रसारण रेडिओ युगांडा (स्था. १९५४) तर्फे, तर दूरचित्रवाणीचे प्रसारण युगांडा टेलिव्हिजन सर्व्हिस (स्था. १९६२) तर्फे केले जाते. नभोवाणी कार्यक्रम इंग्रजी, फ्रेंच, स्वाहिली व इतर स्थानिक भाषांतून प्रसारित केले जातात. देशात एकूण सु. २,८०,००० रेडिओ व ७६,००० दूरचित्रवाणी संच (१९८५) व ४८,८८४ (१९७८) दूरसंदेशवहन संच होते.

लोक व समाजजीवन : देशात लोकसंख्येची घनता दर चौ. किमी.स ५२·४ होती (१९८०). व्हिक्टोरिया सरोवराच्या उत्तर किनारी प्रदेशात लोकसंख्येची घनता जास्त असून त्या मानाने देशाच्या उत्तर, पूर्व व पश्चिम भागांत ती कमी आहे. १९७५−८० या काळातील वार्षिक सरासरी जन्मप्रमाण हजारी ५०·१ व मृत्युप्रमाण हजारी १६·२ आहे. व्हिक्टोरिया सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावरील प्रदेशात बगांडा वंशाचे लोक रहात असून तोच देशातील सर्वांत मोठा (१६%) वांशिक गट आहे. वेगवेगळे वांशिक गट ढोबळ मानाने त्यांच्या भाषांवरून सांगता येतात. त्या दृष्टीने बांतू, नाइलॉटीक व नाईलो-हॅमाइट हे मुख्य तीन भाषिक गट आहेत. दक्षिण, पश्चिम व पूर्व भागांतील ७०% लोक बांतू भाषिक आहेत. उत्तर, वायव्य व उत्तरमध्य भागांत अंकोले व लांगो हे सूदानिक गटातील नाइलॉटीक भाषिक, तर ईशान्य भागात ईटेसो हे नाइलो-हॅमाइट भाषिक लोक अधिक आहेत. यांशिवाय बुन्योरो, ब्यान्यनकोली, बोटोरो, बासोगा व कारामोजाँग ह्या प्रमुख जमाती आहेत. ईदी अमीन राजवटीत युगांडातील आशियाईंचे (विशेषतः भारतीय व पाकिस्तानी लोकांचे) १९७२ मध्ये सक्तीने स्थलांतर घडवून आणल्याने युगांडातील त्यांची त्यावेळी असलेली ७४,००० ही संख्या १९७५ मध्ये ५०० पेक्षाही कमी झाली. स्थलांतरितांपैकी सु. ६,००० लोक १९८३ मध्ये पुन्हा युगांडात आले. यांशिवाय देशात काही प्रमाणात यूरोपीय व अरब लोक आहेत. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ६३% ख्रिश्चन धर्माचे असून त्यांपैकी ३३% रोमन कॅथलिक व ३०% प्रॉटेस्टंट (मुख्यतः अँग्लिकन) पंथीय आहेत. मुस्लिमांची संख्या ५% ते ६% आहे. उरलेले लोक परंपरागत आफ्रिकी धर्मांचे असून ते प्रामुख्याने देशाच्या उत्तर व पश्चिम भागांत आढळतात. रूआंडा, बुरूंडी, केन्या, झाईरे व सूदान या देशांतून आलेल्या स्थलांतरित कामगारांमुळे युगांडाला मोठ्या प्रमाणावर मजूरपुरवठा झाला असून ते प्रामुख्याने युगांडाच्या शेती क्षेत्रात गुंतलेले आहेत. १९८१ मध्ये १,१३,००० आफ्रिकी निर्वासित युगांडात आले होते. त्यांपैकी ८०,००० रूआंडामधील व ३२,००० झाईरी लोक होते. युगांडात कायमचे वास्तव्य केलेल्या परकीयांची संख्या खूपच मोठी आहे. अमीन राजवट संपुष्टात आल्यावर वेस्ट नाईल जिल्ह्यातील अमीनच्या सु. २,४०,००० लोकांनी झाईरे व सूदानकडे पळ काढला.

युगांडात स्त्रियांना समान हक्क देण्यात आले असले, तरी परंपरांचा पगडा खूपच आहे. शासकीय दवाखाने व रुग्णालये यांत वैद्यकीय सेवा मोफत असल्या, तरी अमीन राजवटीत त्या फारच अपुऱ्या प्रमाणात उपलब्ध होत्या. १९७८-७९ च्या स्वातंत्र्ययुद्धात तर अनेक रुग्णालये औषधे व खाटा यांच्या तुटवड्यामुळे ओस पडली होती. प्रौढांमध्ये गुप्तरोगाचे प्रमाण खूपच आढळते. अस्वच्छ पाणी व आरोग्यविषयक अपुऱ्या सोयी यांमुळे पटकी, आमांश, क्षयरोग, हिवताप, खंडितकायी-कृमिरोग, निद्रारोग, आंत्रज्वर व कुष्ठरोग या रोगांचे प्रमाण बरेच आहे. पौष्टिक आहार, विशेषतः मुलांना, पुरेशा प्रमाणात न मिळाल्याने देशात बऱ्याचशा आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. बालमृत्यूचे प्रमाण हजारी १३६ (१९८०) असून आयुर्मान अंदाजे ५४ वर्षे होते (१९८२). १९७२ मध्ये आशियाईंच्या देशाबाहेरील स्थलांतरामुळे वैद्यकीय सेवेतील लोकांचा खूपच तुटवडा निर्माण झाला होता. १९७० मध्ये डॉक्टरांची एकूण संख्या १,६५० होती, तर १९७९ मध्ये ती केवळ ६२० (२०,३७१ लोकांमागे १ डॉक्टर) व परिचारिकांची संख्या २,४३२ झाली.


इंग्रजी ही अधिकृत भाषा असून इतर स्थानिक भाषा खूपच आहेत. बांतू समूहातील भाषांमध्ये लुगांडा (बगांडा जमातीची भाषा) ही प्रमुख असून ती दक्षिण, मध्य व पश्चिम भागांत अधिक प्रमाणात बोलली जाते. उत्तर व ईशान्य भागांत नाइलॉटीक भाषांचा अधिक वापर केला जातो. स्वाहिली भाषासुद्धा मोठ्या प्रमाणावर बोलली जाते. कांपाला येथून प्रसिद्ध होणारी युगांडा टाइम्स, कांपाला गार्डियन, मुन्नो, एन्‌गाबो, द स्टार, तैफा युगांडा ही दैनिके व इक्वेटर, मुन्नांसी न्यूज बुलेटिन, पीपल, युगांडा पायलट ही साप्ताहिके असून ती मुख्यतः इंग्रजी किंवा युगांडा भाषेतील आहेत. ईस्टर्न आफ्रिका जर्नल ऑफ रूरल डेव्हलपमेंट, लीडरशिप, एम्‌कोंबोझी, मुसिझी, न्यू सेंचरी ही देशातील प्रमुख नियतकालिके आहेत. मॅकरेरे विद्यापीठातील ग्रंथालय हे देशातील सर्वांत मोठे व भव्य ग्रंथालय असून त्यात चार लाखांवर ग्रंथ आहेत. ॲल्बर्ट कुक लायब्ररी ऑफ मेडिसिन ह्या दुसऱ्या महत्त्वाच्या ग्रंथालयात अठरा हजारांवर ग्रंथ आहेत.

देशात शैक्षणिक सुविधा पुरविण्याची जबाबदारी केंद्र शासनाच्या शिक्षण खात्यावर व स्थानिक शासनावर आहे. शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात मिशनऱ्यांनी मोलाची कामगिरी बजावलेली आहे. देशात शिक्षण सक्तीचे नाही. सात वर्षांचे प्राथमिक शिक्षण, चार वर्षांचे कनिष्ठ माध्यमिक व दोन वर्षांचे उच्च माध्यमिक असे शिक्षणाचे स्तर आहेत. १९८४ मध्ये प्राथमिक शाळेत जाऊ शकणाऱ्या ६ ते १२ वर्षे वयोगटातील एकूण मुलांपैकी ५४% मुले व ४२% मुली प्रत्यक्षात शाळेत दाखल झाल्या होत्या. प्रौढ साक्षरतेचे प्रमाण ५३% आहे. देशात ४,२२९ प्राथमिक शाळा, १० तंत्रशाळा, २१० माध्यमिक शाळा (पैकी ९२ खाजगी), ३२ शिक्षक-प्रशिक्षण विद्यालये, ५ तांत्रिक शिक्षण संस्था, ३ महाविद्यालये व एक विद्यापीठ होते (१९७९). १९८२ मध्ये प्राथमिक शाळांत ४४,४२६ शिक्षक व १६,१६,७९१ विद्यार्थी, माध्यमिक शाळांत ६,२८७ शिक्षक व १,३२,०५१ विद्यार्थी, शिक्षक-प्रशिक्षण विद्यालयांत ४९६ शिक्षक व ९,१५७ विद्यार्थी, व्यवयाय शिक्षण संस्थांत २३९ शिक्षक व ४,१८१ विद्यार्थी, विद्यापीठात ३६९ शिक्षक व ४,८५४ विद्यार्थी आणि इतर उच्च शिक्षण संस्थांत २७१ शिक्षक व २,४५८ विद्यार्थी होते. कांपाला येथे मॅकरेरे विद्यापीठ (स्था. १९७०) असून त्यात कला, शास्त्र, कृषी, वैद्यक, शिक्षण, पशुवैद्यक, कायदा इत्यादींच्या उच्च शिक्षणाच्या सोयी आहेत. उच्च शिक्षणासाठी बरेचसे विद्यार्थी परदेशांत जातात. कांपाला येथील युगांडा वस्तुसंग्रहालय (स्था. १९०८), मॅकरेरे विद्यापीठातील प्राणिशास्त्र संग्रहालय, कांपाला येथील दोन ललित कला संग्रहालये ही देशातील उल्लेखनीय वस्तुसंग्रहालये आहेत.

वेगवेगळ्या ललित कलांना उत्तेजन देण्यासाठी तसेच चित्रकार, मूर्तिकार, औद्योगिक कलाकार व नक्षीकार, कलाशिक्षण इत्यादींना प्रशिक्षण देण्याच्या दृष्टीने मॅकरेरे ललित कला विद्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच नृत्य, संगीत, नाट्य इत्यादींना उत्तेजन देण्यासाठी शासनाने सामूहिक विकास व संस्कृती असे खाते स्थापिले आहे. या खात्याने वेगवेगळ्या वांशिक गटांचे प्रतिनिधी घेऊन हार्ट बीट ऑफ आफ्रिका या नृत्य समूहाची स्थापना केलेली आहे. गांडा लोकांची ‘बाकीसिंबा’ व ‘नांकासा’ नृत्ये, अंकोली लोकांची ‘ब्वोला’ व ‘जिंगडिंग’ नृत्ये आणि बुन्योरो व टोरो जमातींच्या लोकांचे ‘लून्येगे’ नृत्य हे नृत्यप्रकार विशेष उल्लेखनीय आहेत. युगांडातील लोकांच्या परंपरागत संस्कृतीच्या महत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा अभ्यास व त्यांचे जतन करण्याबाबतचे संशोधन वेगवेगळे इतिहासतज्ञ, संगीतशास्त्रज्ञ, मानवशास्त्रज्ञ व ईश्वरशास्त्रवेत्ते करीत आहेत.

महत्त्वाची स्थळे : कांपाला हे देशाच्या राजधानीचे तसेच देशातील सर्वांत मोठे शहर (लोकसंख्या ४,५८,४२३−१९८०) असून त्याशिवाय जींजा (४५,०६०), मासाका (२९,१२३), एम्‌बाला (२८,०३९), एम्‌बारारा (२३,१५५) व गूलू (१४,९५८) ही देशातील इतर प्रमुख नगरे आहेत. परदेशी पर्यटकांना पारपत्र मिळविण्याची व पीतज्वराची लस टोचून घेण्याची सक्ती असते. प्रवेशपत्राबाबतच्या नियमांत मात्र वारंवार बदल झालेले आहेत. अरण्यमय प्रदेश, त्यांतील वन्य प्राणी, सरोवरे व पर्वतीय प्रदेश ही पर्यटकांची मुख्य आकर्षणे आहेत. १९७१ मध्ये ८८,६३० पर्यटकांनी युगांडाला भेट दिली. परंतु अमीन राजवटीत पर्यटन व्यवसायात कमालीची घट झाली. १९८१ मध्ये केवळ ३,६०० पर्यटकांनी युगांडाला भेट दिली. १९८२ पासून पर्यटकांच्या संख्येत वाढ होत गेली. १९८२ मध्ये ८,६२२ पर्यटक (मुख्यतः इटलीतील व स्कँडिनेव्हियातील), तर १९८३ मध्ये १२,७८६ पर्यटक देशात आले. १९८२ मध्ये पर्यटन व्यवसायापासून २१ लक्ष अमेरिकी डॉलर उत्पन्न मिळाले. पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी राष्ट्रीय उद्याने, हॉटेले, निवासालये, वाहतुकीची साधने यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न चालू आहेत. (चित्रपत्र २).

संदर्भ : 1. Apter, David E. Political Kingdom in Uganda, Princeton, N. J. 1967.

    2. Collison, R. L. Uganda, Oxford, 1981.

    3. Elkan, Walter, Migrants &amp Proletarians: Urban Labour in the Economic Development of Uganda, New York, 1960.

   4. Ingham, Kenneth, The Making of Modern Uganda, New York, 1958.

   5. Jorgensen, J. J. Uganda : A Modern History, London, 1981.

चौधरी, वसंत


युगांडा देशाचा नकाशा

देशातील प्रमुख नगदी पीक असलेल्या कॉफी बियांचे वाळवणकापसाची शेती : देशातील महत्त्वाचे उत्पादन.राजधानी कांपालापामवृक्षांचे लाकूड व पपायरस वापरून बांधलेले चर्च