फेदेर्ब, ल्बी : (३ जून १८१८-२९ सप्टेंबर १८८९). फ्रेंच सेनानी व प. आफ्रिकेतील फ्रेंच वसाहतींचा एक संस्थापक. जन्म फ्रान्समधील लील येथे. तो अभियांत्रिकीमधील पदवीधर होता. अल्जीरिया आणि ग्वादलूप या वसाहतींमधील फ्रेंच लष्कराच्या अभियांत्रिकी विभागात त्याने दीर्घकाळ काम केले. तेथील निग्रो गुलामांच्या मुक्ततेसाठी झालेल्या प्रयत्‍नांत तो सहभागी होता (१८४८). १८५२ मध्ये त्याची नेमणूक सेनेगलमध्ये झाली. अभियांत्रिकीय सर्वेक्षणाच्या निमित्ताने त्याला या प्रदेशाचा जवळून परिचय झाला. १८५४-६१ व पुन्हा १८६३-६५ या प्रदीर्घ काळात तो सेनेगलचा गव्हर्नर होता. या काळात त्याने पू. आफ्रिकेतील स्थानिक जमातींना लष्करी कारवाया किंवा वाटाघाटी या मार्गांनी आपलेसे करून घेतले. प. आफ्रिकेत याच सुमारास अल् हज ओमर या सुशिक्षित व समर्थ इस्लामी नेत्याच्या नेतृत्वाखालील धार्मिक-राजकीय संघटना आफ्रिकेत इस्लामी साम्राज्य उभारण्याचा प्रयत्‍न करीत होती. ओमरचा पाडाव करण्यासाठी फेदेर्बने सेनेगलमध्ये स्थानिक लोकांचे लष्करी दळ उभारले. प्रशासनव्यवस्थेत त्याने स्थानिक लोकांना सहभागी करून घेतले. जमातप्रमुखांच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. त्याचप्रमाणे स्थानिक लोकांना व्यापारात संधी दिली. यासाठी सेनेगलमधील ⇨ डाकार बंदराचा विकासही घडवून आणला. ⇨ फ्रँकोप्रशियन (जर्मन) युद्धात (१८७०-७१) त्याने उत्तर आफ्रिकेतील फ्रेंच सेनेचे नेतृत्व केले. १८७२ मध्ये ईजिप्तमधील पिरॅमिडसारख्या प्राचीन वास्तूंचा अभ्यास करण्यासाठी योजिलेल्या फ्रेंच सरकारच्या मोहिमेचे नेतृत्व फेदेर्बनेच केले होते. आपल्या अनुभवांच्या आधारे त्याने विद्यमान अल्जीरियात अंतर्भूत असलेल्या न्युमिदिया या प्राचीन देशातील न्युमिदियन कोरीव लेख तसेच उ. आफ्रिकेतील फ्रेंच सैन्याच्या मोहिमा, सेनेगली भाषा आणि प्रदेश यांसंबंधी पुस्तके लिहिली. प. आफ्रिकेतील फ्रेंच साम्राज्याचा पाया घालण्याचे काम फेदेर्बनेच केले असे मानले जाते. पॅरिसमध्ये तो निधन पावला.

संदर्भ: Fage, J. D. An Introduction to the History of West Africa, Cambridge, 1962.

जाधव, रा. ग. चौधरी, वसंत