माँपेल्ये : फ्रान्समधील दक्षिण किनाऱ्यालगत लेल्ये नदीवर वसलेले शहर व एरो या शासकीय विभागाचे मुख्य ठिकाण. हे भूमध्य समुद्र किनाऱ्यापासून १० किमी. आणि मार्से शहरापासून पश्चिमेस सु. ७५ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,९५,६०३ (१९७५). लात्ते या जवळच असलेल्या बंदरामुळे माँपेल्ये दहाव्या शतकात व्यापारी केंद्रे म्हणून उदयास आले. पण पंधराव्या शतकाच्या शेवटी लात्ते बंदराची उथळ खाजण कोरडी पडल्याने माँपेल्ये व्यापारी दृष्ट्या मागे पडले.

आठव्या शतकात हे जहागिरीचे गाव होते. १३४९ मध्ये हे शहर फ्रेंच राजवटीत समाविष्ट झाले. पुढे सोळाव्या शतकातील कॅथलिक व प्रॉटेस्टंट पंथांतील संघर्षामुळे प्रॉटेस्टंट (ह्यूगनॉट) पंथीयांचा बालेकिल्ला म्हणून माँपेल्ये प्रसिद्धीस आले. येथील कॅथीड्रल, विद्यापीठ व इतर जुन्या वास्तू यांमध्ये शहराचा इतिहासच समाविष्ट आहे. माँपेल्ये विद्यापीठाची स्थापना १२२० मध्ये झाली असली, तरी चौथ्या निकोलस पोपने आपल्या जाहीर पत्राने त्याला १२८९ मध्ये मान्यता दिली. या विद्यापीठातील वैद्यकीय विद्याशाखा मात्र दहाव्या शतकापासूनच कार्यशील होती. नामांकित फ्रेंच लेखक आणि वैद्य राब्ले (१४९०–१५३३). हा या विद्यापीठाचा विद्यार्थी होता. माँपेल्येतील कृषी-विद्यालय व सैनिकी शाळा याही प्रसिद्ध आहेत. पण या सर्वांपेक्षा नावाजलेले म्हणजे चौथ्या हेन्रीने स्थापिलेले वनस्पतिउद्यान (१५९३) होय. तेथील विविध व दुर्मिळ वनस्पतींच्या अभ्यासासाठी अनेक जागतिक शास्त्रज्ञ तेथे जातात. माँपेल्ये विद्यापीठाची वनस्पतिशास्त्राविषयी आंतरराष्ट्रीय ख्याती झाली आहे.

आधुनिक माँपेल्ये शहर अनेक कारखान्यांनी गजबजलेले आहे. अन्नप्रक्रिया, मीठ, रसायने, तलम कापड, मुद्रण, धातूंच्या वस्तू इत्यादींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात येथे होते. फ्रान्सचा हा भाग द्राक्षांपासून तयार केलेल्या अनेक जातींच्या मद्यांविषयी सुप्रसिद्ध आहे. या मद्यांची व्यापारपेठ म्हणून माँपेल्ये ओळखले जाते. येथील ‘एफ्‌ एक्स फाब्र संग्रहालया’त आजतागायतच्या फ्रेंच चित्रकला कृतींचा समृद्ध संग्रह आहे. अल्जीरियाच्या स्वातंत्र्यानंतर (३ जुलै १९६२) तेथील फ्रेंच लोक येथे स्थानिक झाल्याने माँपेल्येची लोकसंख्या झपाट्याने वाढली.

देशपांडे, चं. धुं.