डेब्रेत्सेन : पूर्व हंगेरीतील एक महत्त्वाचे शहर. लोकसंख्या १,७०,००० (१९७२ अंदाज). हे बूडापेस्टच्या पूर्वेस २२५ किमी. तृण प्रदेशाच्या सीमेवर शेतीप्रधान प्रदेशात असून तंबाखूची गुदामे, खत कारखाने, दारू गाळणे, कातडी कमावणे, यंत्रे, मातीची भांडी, पादत्राणे, हस्तव्यवसाय, औषधी, फर्निचर, बॉल बेअरिंग इ. उद्योग व कारखाने येथे आहेत. हे धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक केंद्रही आहे. येथे हंगेरीतील सर्वांत जुना (१५६१) छापखाना व १५५० मधील प्रॉटेस्टंट कॉलेज आता लॉयोश कॉसूथ विद्यापीठ असून त्यातील विधी, वैद्यक व धर्मशास्त्र या विद्याशाखा विख्यात आहेत. कॉसूथने १८४९ मध्ये हंगेरीच्या स्वातंत्र्याची घोषणा येथे केली परंतु रशियन सैन्याच्या हस्तक्षेपामुळे या उठावाचा पाडाव झाला. १९४४-४५ मध्ये हे अल्पकाळ हंगेरीची अंतरिम राजधानी होते. शहरात डेरी वस्तुसंग्रहालय, मिहाली सोकोनाय नाट्यगृह, अनेक जुनी चर्चे, वसतिस्थाने व एक मोठे स्नानगृह आहे. येथे विमानतळ असून ते अनेक सडका व लोहमार्गांचे केंद्र आहे.

लिमये, दि. ह.