आयंझीडेल्न : मध्य स्वित्झर्लंडच्या पूर्व भागातील श्वीत्स कँटनमधील प्राचीन शहर व यूरोपातील एक धर्मक्षेत्र. लोकसंख्या १०,०२० (१९७०). हे झुरिकपासून सडकेने ४१ किमी. नैर्ऋत्येस आहे. आठव्या शतकातील हुतात्मा सेंट माइनराड याच्या राहत्या जागी दहाव्या शतकात बेनिडिक्टिन मठ उभारण्यात आला. तेव्हापासून हे तीर्थक्षेत्र बनले आहे. मठातील व्हर्जिनचा पुतळा मेणबत्त्यांच्या धुरामुळे काळा पडला म्हणून त्यास ‘ब्लॅक मॅडोना’ म्हणतात. अठराव्या शतकात मठाचा जीर्णोद्धार झाला. ही नवीन वास्तू बरोक शैलीचा उत्तम नमुना आहे. येथे एक ग्रंथालय व वस्तुसंग्रहालय आहे. प्रतिवर्षी १४ सप्टेंबरला येथे मोठा उत्सव भरतो. येथील नागरिक दरवर्षी काल्देरॉनकृत द ग्रेट वर्ल्ड थिएटर या नाटकाचा प्रयोग करतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ पॅरासेल्ससची जन्मभूमी व धर्मसुधारक झ्विंग्लीची ही कर्मभूमी होय.

ओक, द. ह.