रैवतक : भारतातील एक प्राचीन पर्वत. या पर्वताच्या स्थाननिश्चितीविषयी अद्याप एकमत नाही. पुराणांतील वर्णनांवरून हा पर्वत सांप्रतच्या गुजरात राज्यात होता असे दिसते. वसुदेवपुत्र कृष्णाने द्वारका नगरी याच्या पायथ्याशी वसविली, असा महाभारतात उल्लेख आहे. परंतु ती गुजरात राज्याच्या जामनगर आणि जुनागढ जिल्ह्यांत अशा दोन ठिकाणी दर्शविली जाते. त्यामुळे प्राचीन रैवतक पर्वताचेही स्थान अनिश्चित आहे.

पार्जिटरच्या मते जामनगर जिल्ह्यातील सांप्रतच्या द्वारका शहराजवळील हालार टेकडी म्हणजे पूर्वीचा रैवतक पर्वत होय तर काही तज्ञांच्या मते जुनागढ जिल्ह्यातील गिरनार पर्वत म्हणजे रैवत अथवा रैवतक होय. परंतु महाभारताच्या मौसल पर्वातील द्वारकेच्या वर्णनाप्रमाणे गिरनारला समुद्रसांनिध्य नाही. हा पर्वत ⇨आनर्त देशात असल्याचा महाभारतात उल्लेख सापडतो. वैवस्वत मनूचा पौत्र आनर्त याच्या रेवत नावाच्या मुलाने या पर्वताच्या पायथ्याशी कुशस्थली नावाची नगरी वसविली व त्याच्या नावावरून या पर्वताला रैवतक हे नाव मिळाले असावे, असे मानतात. कृष्णाने मथुरेहून स्थलांतर केले व कुशस्थली या त्यावेळी ओसाड बनलेल्या नगरीच्या जागी द्वारका नगरी वसवून जवळच्या रैवतक पर्वतावर एक किल्ला बांधला, असा पुराणांत उल्लेख आहे. आजही गिरनारच्या शिखरावर एक जुना कोट दिसतो, त्याला उग्रसेनगड म्हणतात.  त्यामुळे गिरनारचा प्राचीन रैवतकशी संबंध असावा असे मानतात. रैवतक पर्वत द्वारकेतील लोकांचे क्रीडास्थळ होते आणि द्वारकावासी त्या पर्वतावर जाऊन गिरिमह व रैवतकमह हे उत्सव नृत्यगायनादी कार्यक्रम करून साजरे करीत, अशी वर्णने महाभारतात व पुराणांत आढळतात. दोहद येथील एका शिलालेखात रैवतक पर्वतावर मंदिरे असल्याचा उल्लेख मिळतो. बृहत्संहितेतील उल्लेखावरून रैवतक व ऊर्जयता ही गिरनार पर्वतातील दोन टेकड्यांची नावे आहेत.

पहा : गिरनार द्वारका.  

देशपांडे, सु. चिं.