पोर्ट हारकोर्ट : विहंगम दृश्य

पोर्ट हारकोर्ट : नायजेरियातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बंदर, प्रमुख औद्योगिक शहर, तसेच रिव्हर्स राज्याचे व पोर्ट हारकोर्ट प्रांताचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या २,४२,००० (१९७५ अंदाज). हे बॉनी या नायजर नदीच्या त्रिभुज प्रदेशातील पूर्वेकडील शाखेवर, अंटलांटिक महासागर किनाऱ्यापासून आत सु. ६६ किमी. अंतरावर वसले आहे. हवामान उष्ण व दमट. वार्षिक सरासरी पर्जन्य २३७ सेंमी आहे. याच्या आसमंतात कच्छ वनश्री व वर्षारण्ये आहेत. पूर्वीच्या ओबोमोटूनामक उजाड गावाच्या जागेवर १९१२ मध्ये उडी कोळसा क्षेत्रांचे बहिर्द्वार म्हणून ब्रिटिशांनी याची स्थापना केली तथापि १९१६ मध्ये एनूगू कोळसा खाणींशी जोडणाऱ्या लोहमार्गामुळे त्याचा विकास झाला. तत्कालीन ब्रिटीश वसाहतीचा सचिव लूइस हारकोर्ट याच्या स्मृतिप्रीत्यर्थ याला पोर्ट हारकोर्ट हे नाव मिळाले.

उत्तरेस सहा किमी.वरील ट्रान्स-आमाडी या १,००० हे. क्षेत्राच्या औद्योगिक वसाहतीत टायर, ॲल्युमिनियम उत्पादने, कागद, काचेच्या बाटल्या बनविणे इ. उद्योग तर शहरात सिमेंट, सिगारेटी, धातूच्या खिडक्या व दारे, रंग, प्लॅस्टिके, कापड, लाकडी वस्तू, बोटी बांधणे, तेलशुद्धीकरण इ. उद्योगधंदे चालतात. आसमंतातील ताड तेल, खोबरे, कोळसा, कोको, कथिल, कोलंबाइट, खनिज तेल, इमारती लाकूड, वाटाणे इ. उत्पादनांची येथून निर्यात केली जाते. हे बंदर ताड तेल व खनिज तेल साठविण्याच्या सोयींनी युक्त आहे. नळांद्वारे आसमंतातील तेल व नैसर्गिक वायू शहरात आणलेला आहे. रस्त्यांनी व लोहमार्गांनी महत्त्वाच्या ठिकाणांशी हे शहर जोडले असून, ईशान्येस ११ किमी.वर विमानतळ आहे. ‘सर्कल नावाने ओळखल्या जाणाऱ्या शहराच्या मध्यभागातील जूबिली मेमोरियल पार्क, खेळांचे प्रेक्षागार व गोल्फ मैदान असेच रुग्णालये, दूरचित्रवाणी केंद्र, तांत्रिक व व्यापारी संस्था, रोमन कॅथलिक, बॅप्टिस्ट, अँग्लिकन व मेथडिस्ट मिशन आणि त्यांची विद्यालये इ. सुविधा येथे आहेत.

चौधरी, वसंत