स्यूदाद ह्वारेस : ( ह्वारेस ). मेक्सिकोच्या किवाबू राज्यातील प्रमुख शहर व व्यापारकेंद्र. लोकसंख्या १३,२१,००४ (२०१०). हे रिओ ग्रांदे नदीकिनारी, अमेरिकेच्या टेक्सस राज्यातील एल् पॅसोच्या दक्षिणेस वसलेले आहे. अमेरिका व मेक्सिको यांच्या सरहद्दीवरील शहर म्हणून यास महत्त्व असून मेक्सिकोचे हे प्रवेश बंदर आहे. मेक्सिकोच्या राष्ट्रीय लोहमार्गावरील हे अंतिम स्थानक आहे. हे शहर मेक्सिको सिटीशी लोहमार्ग, रस्ते व हवाईमार्गाने जोडलेले आहे. याचा एल् पॅसोशी तीन आंतरराष्ट्रीय पुलांद्वारे संपर्क होतो.

हे शहर सतराव्या शतकात वसविण्यात आले असून ते ‘ एल् पॅसो देल नॉर्ते ’ म्हणून ओळखले जात होते. हे अमेरिका-मेक्सिको यांच्या सरहद्दीवरील वसाहतींच्या वादातील शहर होते. १८४८ मध्ये ग्वादालूपे ईदाल्गो तहान्वये मेक्सिकन युद्धाचा शेवट झाला व या शहराचे विभाजन झाले. तसेच १८६३ मध्ये येथे अमेरिका व मेक्सिको यांमधील सीमावादाचे निराकरण झाले. १८८८ पासून मेक्सिकन राष्ट्राध्यक्ष बेनितो ह्वारेस याच्या नावावरून यास ह्वारेस असे संबोधले जाते. फ्रेंचविरोधी संघर्षाच्या वेळी येथे बेनितो ह्वारेस याचे मुख्यालय होते ( १८६५–६६ ). १९२० मध्ये येथील सेवाकेंद्राची भरभराट झाली. १९३० च्या मंदीच्या वेळी शहरास कामगारांच्या प्रश्नांस सामोरे जावे लागले होते. विसाव्या शतकात येथे मिळणारे चांगले वेतन व अमेरिकेचे सान्निध्य यामुळे या शहराचे कामगारांना विशेष आकर्षण होते. 

आसमंतातील उत्पादित कापसाचे संस्करण व व्यापार केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. हे औद्योगिक दृष्ट्या विकसित झालेले शहर आहे. उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार ( नाफ्ता ) १९९४ पासून अंमलात आला, तेव्हापासून या शहराची विशेष औद्योगिक व व्यापारी भरभराट झाली. मादक पदार्थांची तस्करी करणार्‍या घुसखोर लोकांच्या थांब्याचे ठिकाण म्हणून हे शहर कुप्रसिद्ध आहे. 

येथील बैल झोंबी व शिकारी कुत्र्यांच्या शर्यती प्रसिद्ध आहेत. येथील स्यूदाद ह्वारेस मुक्त विद्यापीठ, ग्वादालूपे मिशन (१६६२), सीमा शुल्क कार्यालय ( १९ वे शतक ), सेंट्रल पार्क, ओल्ड सिटी हॉल, इन्बा संग्रहालय इ. विशेष प्रसिद्ध आहेत.

गाडे, ना. स.