स्कोप्ये : मॅसिडोनिया प्रजासत्ताकाची राजधानी व प्रमुख राजकीय, औद्योगिक, व्यापारी व प्रशासकीय ठिकाण. लोकसंख्या ४,८६,६०० (२००८). हे बेलग्रेडच्या दक्षिणेस ३३८ किमी. वार्दर नदीकिनारी वसलेले आहे. हे दळणवळणाचे प्रमुख केंद्र असून लोहमार्ग व रस्त्यांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. येथे आधुनिक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.

प्राचीन काळी ग्रीक व रोमनांमध्ये हे स्क्यूपाइ या नावाने ओळखले जात होते. चौथ्या शतकात सम्राट डायक्लीशनच्या कारकिर्दीत दार्दा- नियाची राजधानी येथे होती. इ. स. ५१८ मध्ये झालेल्या भूकंपामुळे शहराचे नुकसान झालेले होते. सातव्या शतकात स्लाव्हांनी यावर हल्ला केला होता. नवव्या व दहाव्या शतकात शहराची जलद गतीने भरभराट झाली. सर्बांनी ११८९ मध्ये यावर अंमल प्रस्थापित केला होता. तुर्कांनी मॅसिडोनियाचा ताबा घेतल्यानंतर १३९२ मध्ये येथे तात्पुरती राजधानी केली. १६८९ मध्ये कॉलराच्या साथीमुळे शहराचा र्‍हास झाला. तद्नंतर एकोणिसाव्या शतकात बेलग्रेड ते थेसालोनायकी लोहमार्ग बांधल्यानंतर या शहराचा विकास झाला. १९१३ मध्ये हे सर्बीयात समाविष्ट झाले व १९१८ मध्ये यूगोस्लाव्हियाचा भाग बनले. १९४१ मध्ये दुसर्‍या महायुद्धात जर्मनांनी हे जिंकले होते. १९४४ मध्ये ते स्वतंत्र झाले. १९४५ मध्ये मॅसिडोनियाची राजधानी येथे झाली. २६ जुलै १९६३ मध्ये झालेल्या भूकंपामुळे शहराच्या ८०% भागाचा विनाश झालेला होता. यावेळी १,०७० लोक मृत्युमुखी पडले व सु. १,२०,००० पेक्षा जास्त लोक बेघर झाले होते. या भूकंपपीडितांना जगातील ७८ देशांनी वैद्यकीय, अभियांत्रिकीय, आर्थिक इ. मदत केली. त्यामुळे स्कोप्ये हे आंतरराष्ट्रीय ऐक्याचे शहर म्हणून ओळखले जात होते. या ठिकाणी भूकंपप्रतिरोधक इमारत बांधकामाचे नियोजन करण्यात आलेले आहे.

स्कोप्ये हे औद्योगिक केंद्र आहे. येथे रसायने, सिमेंट, कृषी अवजारे, विद्युत्साहित्य, काच, मृत्तिकाशिल्पे, बीर, स्पिरीट, फळे व भाजीपाला डबाबंद करणे, तंबाखू , चामडे प्रक्रिया, लाकूडकाम, क्रोम शुद्धीकरण, पोलाद इ. उद्योग चालतात.

येथे आकाशवाणी, दूरचित्रवाणी केंद्रे आहेत. येथे विद्यापीठ (१९४९) व अभियांत्रिकी शाळा, मॅसिडोनियन ॲकॅडेमी ऑफ सायन्स अँड आर्ट आहे. येथील मध्ययुगीन नेरेझी मठ (११८४), तुर्कीश इन, कुर्सूम्ली हान यांसह मुस्तफा पाशा व सुल्तान मुराद यांच्या मशिदी तसेच वार्दर नदीवरील स्टीव्हान दूशान पूल, सेंट पँटॅलिमोन चर्च इ. पर्यटकांची आकर्षणे आहेत.

गाडे, ना. स.