न्वाकशॉट : पश्चिम आफ्रिकेतील मॉरिटेनिया या इस्लामी प्रजासत्ताकाची राजधानी. लोकसंख्या १,०३,५०० (१९७५ अंदाज). न्वाकशॉट म्हणजे ‘हवेशीर ठिकाण’. हे डाकारच्या उत्तर वायव्येस ४३५ किमी. व सेनेगेल नदीमुखखाडीच्या उत्तरेस सु. ३१९ किमी.वर अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसले आहे. हे नैर्ऋत्य-ईशान्य राजरस्त्याने कृषिउत्पादनात अग्रेसर व लोकवस्तीने दाट असलेल्या दक्षिणेकडील भागाशी व लोकवस्तीने विरळ परंतु खनिजांबाबत समृद्ध अशा उत्तरेकडील भागाशी जोडले आहे. १९५८ मध्ये राजधानी होईपर्यंत हे लहानसे कारभार केंद्र होते. सुसह्य हवामान, देशातील मुख्य रस्त्यावर तसेच खाण व कृषिक्षेत्राजवळ वसलेले असल्यामुळे ही देशाची राजधानी करण्यात आली. फ्रेंचांच्या मदतीने याचे आधुनिक शहरात रूपांतर झाले आहे. येथील बंदराचाही विकास करण्यात येत असून येथे एक विमानतळ आहे. हे सहारा वाळवंटात वसलेले असले, तरी समुद्रसान्निध्यामुळे याचे हवामान सौम्य आहे. याच्या परिसरात ज्वारी व मका ही पिके होतात. डिंक गोळा करणे, गुरे पाळणे इ. व्यवसाय चालतात. हे व्यापारकेंद्र असून डिंक, खनिज तेल, तांबे यांची येथून निर्यात होते. येथे सागरी पाण्यापासून गोडे पाणी तयार करण्याचा आफ्रिकेतील पहिला प्रकल्प १९६९ साली सुरू झाला.

गाडे, ना. स.