सिमला : शिमला. भारतातील हिमाचल प्रदेश राज्याची राजधानी व एक प्रसिद्घ पर्यटनस्थळ. लोकसंख्या १,७१,८१७ (२०११). लेसर हिमालयाच्या वायव्य भागातील एका वनाच्छादित कटकावर, सस.पासून २,२०० मी. उंचीवर सिमला वसले आहे. हे शहर दिल्लीच्या साधारण उत्तरेस सु. २७० किमी.वर, तर चंडीगढपासून ईशान्येस सु. १०० किमी. अंतरावर आहे. सिमलाचे हवामान समशीतोष्ण कटिबंधीय प्रकारचे आहे. येथे हिवाळ्यातील जानेवारी-फेबुवारी महिन्यांत किमान सरासरी तापमान ६ से., तर उन्हाळ्यातील जूनचे कमाल सरासरी तापमान २० से. असते. सरासरी पर्जन्यमान १८३ सेंमी. असून पाऊस प्रामुख्याने उन्हाळ्यात पडतो. हिवाळ्यात हिमवृष्टी होत असते.

सिमला

सिमल्यापासून २ किमी. अंतरावर असलेली जाखू टेकडी हे सिमल्यातील सर्वोच्च (२,४५४ मी.) शिखर आहे. या टेकडीच्या माथ्यावर जुने हनुमान मंदिर आहे. या टेकडीवरुन सिमला शहराचे विहंगम दृश्य तसेच सभोवतालच्या हिमालयातील हिमाच्छादित टेकड्यांचे मनोहारी दृश्य दिसते. काली या हिंदू देवतेचा अवतार असलेल्या शामला देवीचे मंदिर सिमल्यात आहे. त्यावरुनच या ठिकाणाला सिमला हे नाव पडले असावे. सिमल्यास ब्रिटिश लोक ‘क्विन ऑफ हिल्स’ असे संबोधत. गुरखा सैन्याने १८१४ मध्ये येथील प्रदेशावर आक्रमण करुन बराच प्रदेश काबीज केला होता परंतु सुगौली करारानुसार गुरखा सैन्याने सिमल्यासह जिंकलेला सर्व प्रदेश ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केला. त्यावेळी सिमला हे ठिकाण शामला मंदिरासाठी प्रसिद्घ होते. ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी येथील समशीतोष्ण कटिबंधीय हवामान व विलोभनीय सृष्टिसौंदर्याचा विचार करुन सिमल्याच्या विकासास सुरुवात केली. ब्रिटिश निवासस्थान मृमून हा येथील पहिला बंगला १८२२ मध्ये बांधण्यात आला. बंगालचा गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲमहर्स्ट (कार. १८२३— २८) याने १८२७ मध्ये येथे एक उन्हाळी कँप घेतला होता. त्यावेळी येथे हा एकमेव बंगला होता. त्यानंतरच्या दहा वर्षांतच येथे जवळजवळ शंभर बंगले बांधले गेले. सुरुवातीला ब्रिटिशांनी याचा उपयोग सैन्याच्या विश्रांतीसाठी केला होता. थंड हवामान आणि मनोहारी सृष्टिसौंदर्यामुळे अल्पावधीतच हे देशातील एक ख्यातनाम गिरिस्थान व पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्घीस आले. १८६५— १९३९ या कालावधीत हे भारताच्या ग्रीष्मकालीन राजधानीचे ठिकाण होते. पंजाबची राजधानी म्हणून चंडीगढची उभारणी पूर्ण होण्यापूर्वी (१९४७— ५३) सिमला ही पंजाबची राजधानी होती. १८५१ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. भारतीय वातावरणवैज्ञानिक खात्याची स्थापना १८७५ मध्ये सिमला येथे करण्यात आली होती. तिबेटचा दर्जा व त्याच्या सरहद्दींबाबत विचारविनिमय करण्यासाठी १९१४ मध्ये चीन, तिबेट व ग्रेट ब्रिटन यांच्या प्रतिनिधींची संयुक्त परिषद येथे झाली होती. १९७१ मधील भारत-पाकिस्तान युद्घामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १९७२ मध्ये या दोन देशांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक येथे झाली होती.

शहरात हलक्या वस्तूंची निर्मिती, मद्यार्क निर्मिती, हस्तव्यवसाय, हातमागावर कापड विणणे हे उद्योग चालतात. पाइन, देवदार, ओक व ऱ्होडोडेंड्रॉन वृक्षांनी वेढलेला परिसर, सभोवतालची हिमाच्छादित शिखरे, स्केटिंग क्लब, वसाहतकालीन देखणी वास्तुशिल्पे, ख्रिस्ती चर्च तसेच जाखू हे पहाडी शिखर ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. पर्यटकांसाठी सुखसोयींनीयुक्त उपाहारगृहे, निवासस्थाने व क्लब आहेत. येथील राष्ट्रपती भवन (पूर्वीचे ब्रिटिश व्हाइसरॉयचे निवासस्थान) प्रसिद्घ आहे. १९६४ पासून या वास्तूत भारतीय प्रगत अध्ययन संस्थेचे कामकाज चालते. शहरात आरोग्यभुवने, रुग्णालये, हिमाचल प्रदेश विद्यापीठ (स्था. १९७०), महाविद्यालये, राज्य वस्तुसंग्रहालय व बाजारपेठ आहे. एक स्वास्थ्य केंद्र म्हणूनही या शहरास विशेष महत्त्व आहे.

हिमालयाच्या उतारांवर पायऱ्यापायऱ्यांचे टप्पे तयार करुन त्यांवर शहर वसविले आहे. सिमला येथील पर्वतीय प्रदेशाच्या पायथ्यालगत कालका हे ठिकाण आहे. कालका ते सिमला यांदरम्यान ९६ किमी. लांबीचा लोहमार्ग असून तो अनेक ठिकाणी पुलांवरुन व बोगद्यांधून जातो. या लोहमार्गाने प्रवास करणे, हेही पर्यटकांचे आकर्षण असते. म्हणून २००८ मध्ये हा डोंगरी लोहमार्ग जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. लोहमार्गाला समांतर असा रस्ताही आहे. दिल्लीवरुन कालकापर्यंत रस्ते व लोहमार्गाने जाता येते.

चौधरी, वसंत