कील : पश्चिम जर्मनीच्या श्लेस्विग-होलस्टाईन प्रांताचे मुख्य शहर. लोकसंख्या २,७१,७१९ (१९७०). दुसऱ्या महायुध्दापूर्वी जर्मनीचा बाल्टिकवरील मोठा नाविक तळ येथे होता. याच नावाच्या फिओर्डवर कील कालव्याच्या पूर्वमुखावर हे वसले आहे. गेल्या शतकाच्या शेवटी जर्मनीने नौदलाची वाढ केली व कीलची भरभराट सुरू झाली. रुंद, खोल आणि भरती ओहोटीपासून सुरक्षित फिओर्डवर वसल्याने व कालव्याच्या वाहतुकीची भर पडल्याने लष्करी महत्त्व आले. यामुळेच गेल्या महायुद्धात दोस्तांच्या बाँबवर्षावाने हे जमीनदोस्त झाले होते. १६६५ मध्ये स्थापन झालेले विद्यापीठ येथे असून जहाजबांधणी, कापड, कपडे, चामड्याच्या वस्तू, काचसामान इ. उद्योग आहेत.

शहाणे, मो. ज्ञा.