एअर सरोवर : दक्षिण ऑस्ट्रेलियातील खाऱ्या’पाण्याचे सरोवर २८३०’ द. व १३७१५’ पू. लांबी २०८ किमी. रुंदी ३२–६४ किमी. व क्षेत्रफळ सु. ९,०६५ चौ. किमी. एअर सरोवर ॲडिलेडच्या उत्तरेस ६०१ किमी. अंतरावर आहे. एडवर्ड एअर या इंग्रज समन्वेषकाने १८४० मध्ये हे शोधले त्यावरून त्याच्या नावानेच ते प्रसिद्ध आहे. सरोवराचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग असून ते समुद्रसपाटीपासून सरासरी १२–१८ मी. खोल आहे. वॉरबर्टन, बार्कू, डग्‍लस, पीक, नील्स या नद्या सरोवरास मिळत असल्या, तरी वर्षातील बराच काळ त्या कोरड्या असतात. पावसाची वार्षिक सरासरी १२·७ सेंमी. व बाष्पीभवन मात्र २५४ सेंमी. असल्याने क्षारांचे प्रमाण अधिक होऊन सरोवरात मीठ तयार होते.

गद्रे, वि. रा.