पूरम् उत्सव, त्रिचूर.

त्रिचूर : केरळ राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे, तालुक्याचे मुख्य ठिकाण व एक प्राचीन तीर्थक्षेत्र. लोकसंख्या ७६,२४१ (१९७१). हे मलबार किनाऱ्यावर एर्नाकुलम्‌च्या उत्तरेला ६० किमी. वर वसले आहे. या शहराच्या स्थापनेबाबत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. त्याची स्थापना परशुरामाने केली असे म्हणतात. येथे सोळाव्या शतकात कोचीनचे राजे रहात. सामुरी, हैदर, टिपू यांनी अनुक्रमे १७६०, १७७६ आणि १७८९ मध्ये या शहरावर स्वाऱ्‍या केल्या. १७७४ मध्ये शहराला तटबंदी केली होती. हे शहर रेल्वेस्थानकामुळे व्यापारी पेठ बनले. येथे कापड–लाकूड उद्योग, विटा–कौले बनविणे इ. व्यवसाय चालतात. तसेच ॲल्युमिनियम व सिमेंटचे कारखाने, चर्च, महाविद्यालये, मठ, दवाखाने, सरकारी कचेऱ्‍या आहेत. येथील पुथेनपल्ली चर्च भारतात मोठे समजतात. शहराच्या मध्यभागी केरळी शिल्पशैलीचे ‘वदकुन्नाथन’ नावाचे शिवमंदिर आहे. वैशाखामध्ये येथे ‘पूरम्‌’ उत्सव होतो.

सावंत, प्र. रा.