टाँकिन : व्हिएटनामच्या उत्तर विभागाचे जुने नाव. क्षेत्रफळ सु. १,१६,३७६ चौ. किमी. लोकसंख्या सु. १,२०,००,००० (१९६०). हानोई शहराचे प्राचीन नाव डाँग किन्ह याचा टाँकिग हा चिनी अपभ्रंश होय. याचा उल्लेख पंधराव्या व सोळाव्या शतकांतील पाश्चात्त्य पाद्र्यांच्या पत्रांतून देशनिदर्शक झाल्याने तेच नाव त्यांच्या इतिहास-भूगोलात पक्के झाले. व्हिएटनामी नाव बॅक बो आहे.

याच्या उत्तरेस चीन, पूर्वेस टाँकिनचे आखात, दक्षिणेस व्हिएटनामचा टान्यह्वा हा प्रांत व पश्चिमेस लाओस आहे. लाल नदी या प्रदेशाची जीवनदात्री होय. तिचे खोरे सुपीक असून तेथे तांदूळ, मका, आरारूट, ऊस, चहा, तंबाखू, फळे पिकतात व कच्चे रेशीम होते. इतर भाग डोंगराळ असल्याने खोरे व विशेषतः त्रिभुज प्रदेश अत्यंत दाट वस्तीचा आहे. लोखंड, कोळसा व इतर खनिजे असल्याने व्हिएटनामचे बहुतेक उद्योग याच भागात आहेत. डोंगरामध्ये थाई, मेओ वगैरे डोंगरी जमाती आहेत.

१९५४ मध्ये फ्रेंचांविरुद्धचे स्वातंत्र्ययुद्ध जिनीव्हा कराराने स्थगित झाले, त्याच कराराने व्हिएटनामची तात्पुरती विभागणी होऊन हा भाग कम्युनिस्ट नेत्यांकडे गेला व आता टाँकिन हे नाव फक्त ग्रंथांतच राहिले आहे.

शहाणे, मो. ज्ञा.