बेऱ्हमपूर :(१) बेहरामपूर. भारताच्या पश्चित बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद जिल्ह्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या उपनगरांसह ९४,९०७ (१९८१). भागीरथीच्या डाव्या तीरावर, मुर्शिदावाद शहराच्या दक्षिणेस सु. ८ किमी. अंतरावर हे वसले आहे. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने लष्करी छावणीसाठीच हे शहर वसविले (१७३५). १८७० पर्यंत येथे लष्करी वसाहत होती. १८७६ च्या उठावास प्रामुख्याने येथेनच सुरूवात झाली. १८७६ मध्ये येथे नगरपालिका स्थापन झाली. शहराच्या मध्यभागी भव्य नालाकृती सरोवर आहे. बेऱ्हमपूरचे सध्याचे औद्योगिक उपनगर कासीम बाझार हे १८ वया शतकात रेशीम उद्योगकेद्र म्हणून प्रसिद्ध होते. येथेच कासीम बाझारच्या महाराजांचा प्रासाद आहे.

आसमंतातील शेतमालाची, विशेषतः ताग आणि भात यांची, ही प्रमुख बाजारपेठ असून भात सडणे, तेल गाळणे, कासे तयार करणे इ. व्यवसाय येथे चालतात. रेशमी वस्त्रे विणणे, हस्तिदंती कोरीवकाम, सोन्या-चांदीचे दागिने इ. साठी बेऱ्हमपूर पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. शहरात `बेंगॉल सिल्क टेक्नॉलॉजिकल’ व कलकत्ता विद्यापीठाशी संलग्न असलेली तीन महाविद्वालये असून इतरही शैक्षणिक संस्था आहेत.

(२)भारताच्या ओरिसा राज्याच्या गंजाम जिल्ह्यातील एक शहर, लोकसंख्या १,६२,४०७ (१९८१). हे कटकच्या नैऋत्येस सु. ४९६ किमी. आणि बंगालच्या उपसागरापासून १४ किमी. वर कलकत्ता-मद्रास राष्ट्रीय हमरस्त्यावर तसेच कलकत्ता-मद्रास आग्नेय लोहमार्गावर वसले आहे.

ऊस, तांदूळ व जिल्ह्यातील इतर शेतमाल यांची ही प्रमुख बाजारपेठ असून रेशमी व टसर कापडासाठी पूर्वीपासून विख्यात आहे. येथे १८७८ मधील एक महाविद्यालय, बेऱ्हमपूर विद्यापीठ (१९६७), अभियांत्रिकी विद्यालय, शिक्षक प्रशिक्षण विद्यालय, स्त्रियांसाठी महाविद्यालय यांसारख्या शैक्षणिक सुविधा आहेत.

कापडी, सुलभा