द्रावा नदी दक्षिणमध्य यूरोपमधील डॅन्यूबला उजवीकडून मिळणारी एक नदी. ही दोबियाक्कोजवळ इटली व ऑस्ट्रिया यांच्या सरहद्दीवर कार्निक आल्प्स पर्वतात उगम पावते. उगमानंतर ऑस्ट्रिया, यूगोस्लाव्हियामधून व यूगोस्लाव्हिया-हंगेरी यांच्या सीमेवरून वाहत जाऊन ऑसियेकच्या पूर्वेस सु. १८किमी. वर डॅन्यूबला मिळते. हिची लांबी सु. ७२५ किमी. आहे. लेग्रातजवळ तिला मूर नदी मिळते. हिच्या मध्यभागात अनेक जलविद्युत केंद्रे आहेत. ही नदी हंगेरी आणि यूगोस्लाव्हिया याच्या सरहद्दीवर असल्याने जलवाटपाचे प्रश्न वरचेवर सोडवावे लागतात. द्रावा नदीच्या खोऱ्यातील लोक कृषी व्यवसायात गुंतले असून नदी खोऱ्यात बीट, गहू, राय, ओट, मका, द्राक्षे, पीअर इत्यादींचे उत्पादन होते. मुखाशी हिची रुंदी ३२२ मी. असून खोली सु, ६ मी. आहे. ही बॉर्च व ऑसियेकपासून अनुक्रमे माल व प्रवासी वाहतुकीस उपयुक्त आहे. हिच्या खोऱ्यात क्लॅगनफर्ट, ग्रात्स, मारीबॉर, ऑसियेक इ. शहरे आहेत.

यार्दी, ह. व्यं. गाडे ना. स.