कान्सू: चिनी गान्सू, वायव्य चीनमधील एक प्रांत, क्षेत्रफळ ३,६६,५००चौ. किमी. लोकसंख्या१,३०,००,०० (१९६८ अंदाज). पूर्वेस शानसी, ईशान्येस इनर मंगोलिया, वायव्येस सिंक्यांग उइघर स्वायत्त विभाग व पश्र्चिमेस चिंगहाई प्रांत आहेत. लानजो या राजधानी व्यतिरिक्त यिनच्यान व वूचुंग ही प्रांतातील प्रमुख शहरे होत. उत्तेरकडील निंगशिआचे मैदान व आलाशान वाळवंट आणि दक्षिण भागातील लोएसयुक्त पठार असे याचे सपष्ट भौगोलिक भाग पडतात. येथील हवामान पूर्वेकडे मोसमी प्रकारचे असून ते वायव्येस वाळवंटी स्वरूपाचे होत जाते. उत्तर भागातून एत्सीन गोल नदी व पीत नदीचा काही भाग वाहतो. या भागातील कालव्यांवर बरीच शेती होते व वाळवंटातील सरोवरांत मीइ मिळते. या भागात वस्ती तुरळक असून दळणवळणाच्या सोयी अपुऱ्या आहेत. दक्षिण भाग उंच-सखल डोंगराळ असला, तरी यातील लोएस जमिनी फार सुपीक आहेत. मात्र पाऊस बेताचा असल्याने शेती पीत व वी नद्यांच्या खोऱ्यांतच विशेष होते. गहू, काही भरउ धान्ये, कापूस व तंबाखू ही येथील मुख्ये पीके होत. कम्युनिस्ट राजवटीत उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न झाले. पीत नदीवरील धरण हा त्यापैकी एक होय. तेल, कोळसा, लोखंड व सोने इ. खजिने या भागात आहेत. पण युमेन शहराच्या परिसरात तेल व लानजोजवळ कोळसा सोडता, यांचे लाभदायी उत्खनन अद्याप झालेले नाही. लामजो-युमेन परिसरातील खाणींमुळे अलीकडे या भागात लोहमार्ग व सडका बांधून वाहतुकीच्या सोयी वाढविण्यात आल्या आहेत.

केंद्र सत्तेपासून दूर असल्याने हा भाग अनेक शतके जवळजवळ स्वतंत्रच राहिला. दक्षिण भागातील 1,000-1,200 मी. उंचीचे पठार हा चीन व मध्ये आशिया यांना जोडणारा रस्ता पूर्वीपासून होता. 3,000 मी. उंचीची हो-ली पर्वतश्रेणी व 5,500 मी. उंचीचा नानशान यांमधील चिंचोळा रस्ता हा पूर्वीचा रेशीम मार्ग होता. तिसऱ्या शतकापासून चीनच्या सुप्रसिद्ध भिंतीचे काही भाग या प्रांतातील युमेनपर्यंत बांधण्यात आले. तेराव्या शतकात मुसलमानांचा प्रभाव येथे वाढला व येथील मुसलमानांच्या बंडाळीमुळे केंद्र शासन त्रस्त झाले. सिंक्यांग, मंगोलिया व रशियाच्या वाहतूक मार्गावर असल्याने कान्सूचे महत्व अलीकडे पुष्कळच वाढले आहे. कान्सूमध्ये सु. 85 टक्के चिनी लोक असून बाकीच्यात अल्पसंख्याकांचे अकरा गट आहेत. पैकी मुसलमान आणि मंगोल प्रमुख होत. 1958 मध्ये कान्सूतील निंगशिआ विभागाचा स्वतंत्र स्वायत्त विभाग करण्यात आला.  

ओक, द. इ.