सुबनसिरी नदी : तिबेट व भारताच्या अरुणाचल प्रदेश व आसाम या राज्यांमधून वाहणारी व ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी. लांबी ४८२ किमी. त्यांपैकी तिबेटमध्ये १०० किमी. व भारतात ३८२ किमी. पाणलोटक्षेत्र ३२,६४० चौ. किमी. हिच्या उगमाबाबत पुरेसे सर्वेक्षण झालेले नाही मात्र तिबेटमधील सिकुंगचू या पर्वतातून येणारा पाण्याचा मोठा प्रवाह व तशाच प्रकारचे मिळालेले अनेक प्रवाह व त्सारी चू या प्रवाहाच्या संगमानंतरचा प्रवाह सुबनसिरी मानला जातो. तिला सुवर्णश्री, आवानारी व संगमाकडील भागास लोहित म्हणतात. उगमानंतर ती पूर्ववाहिनी होते. नंतर दक्षिणेकडे वाहत जाऊन मिटी टेकड्यांमधून वाहते. पुढे उफला टेकड्यांतील बालीपारा सीमाप्रदेश व अबोर टेकड्यांतील सारिया सीमाप्रदेश यांमधील सीमेवरुन वाहत दुलूगमुखजवळ सखल प्रदेशात येते. नंतर दक्षिणेकडे तर कधी पश्चिमेकडे वाहत धनश्रीमुख समोर ब्रह्मपुत्रा नदीला मिळते. सुबनसिरी व ब्रह्मपुत्रा संगमाजवळ नदीपात्रात माजुली हे १,२६१ चौ. किमी. क्षेत्रफळाचे बेट आहे. कमला, दिकरंग, रंगा, जियाढाळ या हिच्या उपनद्या आहेत. सुबनसिरी मुख ते चौलधुवाघाट या १४३ किमी. क्षेत्रामध्ये बोटींच्या साहाय्याने वर्षभर जलवाहतूक चालते.

गाडे, ना. स.