कर्णाल : हरयाणा राज्यातील जिल्ह्याचे ठाणे, लोकसंख्या ९२,७८४ (१९७१). यमुनेच्या जुन्या प्रवाहाकाठी हे होते परंतु सध्याचा प्रवाह ११ किमी. दूर गेलेला आहे. हे उत्तर रेल्वेच्या दिल्ली-अंबाला मार्गावर दिल्लीच्या उत्तरेस १२० किमी. आहे. महाभारतातील  कर्णावरून हे नाव पडल्याची आख्यायिका आहे. १७३९ मध्ये नादिरशाहाने दिल्लीच्या महंमुदशाहाचा पराभव येथेच केला होता. १८४१ पर्यंत ब्रिटिशांची छावणी येथे असे. घियासुद्दीन तुघलकाने बांधलेली संत बू अली कलंदर याची संगमरवरी कबर, ही येथील प्रेक्षणीय इमारत आहे. पश्चिम यमुना कालवा जवळून गेल्यामुळे ही शेतमालाची बाजारपेठ आहे. शेती अवजारे, धातुकाम, गुंड्या, मद्य व अत्तरे बनविण्याचे विविध उद्योगधंदे शहरात चालतात. जिल्हा कचेऱ्‍या, शिक्षणसंस्था, रुग्णालय यांखेरीज कृषिक्षेत्र, पशुसंवर्धन, कृषिशिक्षणशाळा इ. येथे आहेत.

ओक, शा.नि.