शाहाबाद : कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्याच्या चितपूर तालुक्यातील शाहाबादी खडक व सिमेंट उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले एक नगर. चेन्नई–मुंबई या मध्य रेल्वेमार्गावरील हे एक स्थानक आहे. शाहाबाद नावाने ओळखल्या जाणाऱ्या पत्रित चुनखडकाचे विस्तृत साठे या नगराच्या आसमंतात असून त्याचे उत्खननही येथे मोठ्या प्रमाणावर केले जाते. १९२५ मध्ये येथे एका सिमेंट कारखान्याची स्थापना करण्यात आली. या कारखान्याची मालकी १९३६ मध्ये असोसिएटेड सिमेंट कंपनीज लि. (एसीसी) या प्रसिद्ध कंपनीकडे आली. अलीकडच्या काळात इतरही काही उद्योगधंदे येथे सुरू झाले असून त्यांमुळे नगरातील कामगार – वस्तीचे प्रमाण अधिक आहे. नगराच्या मध्यभागात चिरेबंदी भिंतीचे कुंपण असून आतल्या भागात एक मोठी मशीद व विहीर आढळते. ही चिरेबंदी भिंत जुन्या राजवाड्याची तटबंदी असावी. १९५२ मध्ये शाहाबाद नगरपालिकेची स्थापना झाली.

चौधरी, वसंत